हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी भोसरी (जिल्हा पुणे) येथे वाहनफेरी

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या उद्घोषाने भोसरी परिसर दुमदुमला !

भोसरी – इंद्रायणीनगर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेली भव्य वाहनफेरी उत्साहात पार पडली. दुचाकींवर लावलेले भगवे ध्वज, पारंपरिक वेशात सहभागी हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्वाचा अभिमान जागृत करणार्‍या घोषणा, फेरीवर झालेली पुष्पवृष्टी आणि स्वागत यांमुळे संपूर्ण वातावरणच हिंदुत्वमय झाल्याचे पहायला मिळाले. २६ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेच्या मैदानात ही धर्मजागृती सभा होणार आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजसिंह, हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये धर्मसभेला संबोधित करणार आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक श्री. विश्‍वनाथ टेमगिरे, हिंदु प्रतिष्ठानचे श्री. गणेश फुगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पन्नालाल जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी, सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, आदी मान्यवरांसह १५० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू वाहनफेरीला उपस्थित होते. सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचीही वाहनफेरीला वंदनीय उपस्थिती लाभली.

शंखनाद आणि धर्मध्वजाचे पूजन करून वाहनफेरीला प्रारंभ करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विष्णू जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळा – भाजी मंडई- वैष्णव देवी मंदिर – गव्हाणे वस्ती – पुणे नाशिक रस्ता – भोसरी आळंदी रस्ता -दिघी रस्ता मार्गे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (लांडेवाडी) येथे फेरीचा समारोप झाला. समारोपप्रसंगी फेरीचे सभेत रूपांतर झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणाऱ्या हिंदु धर्मजागृती सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात