जयपूर येथे ‘एच्.एस्.एस्.एफ्.’ संस्थेच्या जत्रेमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून हिंदूंवरील आघातांविषयी जनजागृती

राजस्थान सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना जत्रा पहाण्याचा आदेश

जयपूर – समाजोपयोगी उपक्रमांना प्रेरणा देणार्‍या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘हिंदु स्पिरॅच्युअल अ‍ॅण्ड सर्व्हिस फेअर’ (एच्.एस्.एस्.एफ्.) या संस्थेच्या वतीने येथे नुकत्याच ५ दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेने जयपूरमध्ये जत्रा आयोजित करण्याची ही तिसरी वेळ आहे. ‘या जत्रेस जयपूरमधील सरकारी आणि खासगी शाळांतील विद्यार्थी अन् शिक्षक यांनी भेट द्यावी’, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. यास जयपूरचे अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकारी दीपक शुक्ला यांनी दुजोरा दिला. जत्रेच्या आयोजकांना साहाय्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना तेथे नेण्याचा आदेश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

१. या जत्रेच्या आयोजनसाठी ‘एच्.एस्.एस्.एफ्.’ ही संस्था स्वत:हून सरकारी आणि खासगी शाळांशी संपर्क साधते; मात्र सरकारी शाळांमध्ये गेल्यानंतर सरकारच्या अनुमतीचे कारण सांगून विद्यार्थ्यांना जत्रेला पाठवण्यास असमर्थता व्यक्त केली जाते. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना जत्रेला नेण्याचे आदेश दिल्याचे शुक्ला यांनी सांगितले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

२. ‘जत्रेला शिक्षकांनीही भेट दिली पाहिजे. त्यामुळे आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेतील किमान २ ते ३ शिक्षकांनाही या जत्रेला जाण्यास सांगितले’, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.

३. आम्ही देशभरात ३१ दिवसांची मोहीम राबवणार आहोत. यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या प्रमुख राज्यांच्या समावेश असल्याची माहिती ‘एच्.एस्.एस्.एफ्.’चे प्रचारमंत्री पुष्पेंद्र सिंह यांनी दिली.

हिंदु संघटनांच्या ‘स्टॉल’वरून हिंदूंवरील आघातांविषयी जनजागृती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रचार

१. या जत्रेत विश्‍व हिंदु परिषदेनेही ‘स्टॉल’ लावला होता. त्यांच्या ‘स्टॉल’वर लव्ह जिहाद, तसेच धर्मांतर यांसाठी ख्रिस्त्यांंकडून करण्यात येणारी कारस्थाने यांविषयी जनजागृती करण्यात आली.

२. विहिंपच्या ‘स्टॉल’वर येणार्‍या विद्यार्थ्यांना ‘अभिनेता सैफ अली खान आणि आमीर खान यांनी त्यांच्या हिंदु पत्नींशी घटस्फोट घेतला अन् पुन्हा नव्या हिंदु महिलांना जाळ्यात अडकवले’, अशी माहिती दिली गेली.

३. ‘दबावाखाली येऊन दुसरा धर्म स्वीकारण्यापेक्षा स्वधर्मात असतांना मरण पत्कारणे श्रेयस्कर असते’, असा जागृतीपर संदेश असलेली पत्रके या ठिकाणी वाटली जात होती.

४. ‘ब्युटी पार्लर, ‘मोबाईल रिचार्ज’ची दुकाने, ‘लेडीज टेलर’ची दुकाने आणि मुसलमान विक्रेते अशा ठिकाणी हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी वावरतांना काळजी घ्यावी’, असेही या पत्रकांद्वारे सतर्क केले गेले.

५. अन्य एका पत्रकामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतरासाठी अवलंबल्या जाणार्‍या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला होता. नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये ३ लाख ख्रिस्ती प्रचारक ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत आहेत. त्यांना युरोप आणि अमेरिका येथून अर्थसाहाय्य पुरवले जात असल्याची माहिती पत्रकांत दिली होती.

६. ‘देशात मुसलमान प्रचारकांची संख्या ५ लाख इतकी आहे, तसेच देशात २५० आतंकवादी केंद्रे आहेत’, असा उल्लेखही एका पत्रकात करण्यात आला होता.

७. या जत्रेत ‘भारतीय हिंदु सेने’च्या ‘स्टॉल’वर पूर्ण भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याची, तसेच अयोध्येत राममंदिर बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगण्यात आले.

८. ‘बाबा जयगुरु धर्म विकास संस्थान’ या संस्थेकडून विद्यार्थ्यांना शाकाहाराचे पालन करण्याची शपथ देण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात