देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाचा ‘न भूतो न भविष्यति’ असा झालेला अद्वितीय भावसोहळा !

आत्मप्रगती प्रदर्शित करणारा दिवस म्हणजे ‘आत्मगौरव दिवस’ ! – परात्पर गुरु पांडे महाराज

‘वाढदिवस म्हणजे शरिराची वाढ झाली, तो दिवस’, असे आपण म्हणतो; पण लयाकडे जाणार्‍या दिवसांत आपण किती आत्मप्रगती केली, हे प्रदर्शित करणारा दिवस म्हणजे वाढदिवस ! म्हणूनच यालाच ‘आत्मगौरव दिवस’ असे म्हणतात. आपला लय (मृत्यू) कधी होणार, हे ठाऊक नसल्याने आतापर्यंत आपण किती प्रगती केली, हे पहाण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस ! आपण आपल्या आत्म्यावरील आवरण किती काढले, हे पहाण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस !’

परात्पर गुरु पांडे महाराज

देवद (पनवेल)  – ज्ञानयोगी, कृपावत्सल, क्षणोक्षणी प्रत्येक जिवाचे हित चिंतणारे आणि आबालवृद्धांवर भरूभरून प्रीती करणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा ९० वा वाढदिवस (आत्मगौरव दिन) भावसोहळा म्हणून साजरा करण्याचे महद्भाग्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना लाभले. भगवंतानेच सर्व साधकांकडून या भावसोहळ्याची सिद्धता भावपूर्ण करवून घेतली. जणू ‘अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु ।’ या उक्तीचीच प्रचीती साधकांनी घेतली !

 

भावसोहळ्याचे भावपुष्परूपी वृत्त परात्पर गुरु पांडे महाराजांच्या चरणी सविनय अर्पण !

१. आश्रमातील साधकांनी अनुभवला जणू दिवाळीचाच आनंद !

आश्रमातील साधकांना ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाची तिथी यंदा १९ नोव्हेंबर या दिवशी आहे’, हे २ दिवसांपूर्वीच समजले. तेव्हापासूनच सर्वांच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उमटत होते. ‘आश्रमातील निर्जीव वस्तूही आनंदाने डोलत आहेत’, असे जाणवत होते. त्या २ दिवसांत आश्रमातील चैतन्यातही पुष्कळ वाढ झाल्याने ‘आश्रमामध्ये जणू दिवाळीच आहे’, असे वाटत होते. सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला होता. उत्साह, आनंद, चैतन्य यांत वृद्धी होण्याचे एकमेव कारण म्हणजे सर्वांनाच आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारे परात्पर गुरु पांडे महाराज ! त्यांचे चैतन्य आणि साधकांवरील प्रीती यांमुळे सर्वच साधक या भावसोहळ्याच्या सिद्धतेत स्वतःहून सहभागी होत होते.

२. भगवंतरूपी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आगमनासाठी पायघड्यांच्या स्वरूपात आतुर झाली धरणीमाता !

भावसोहळ्याच्या आदल्या रात्री काही साधक सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेची सेवा करत होते. रात्री २ – ३ वाजले, तरीही सर्वांच्याच तोंडवळ्यावर आनंद आणि परात्पर गुरु बाबा यांच्याप्रतीचा भावच दिसत होता. ‘परात्पर गुरु बाबांना आनंद देण्यासाठी प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण अशीच करायची आहे’, याचा ध्यास सर्वांच्याच मनामध्ये होता. मध्यरात्री वातावरण जरी स्तब्ध असले, तरी दुसर्‍या दिवशीच्या भावसोहळ्याच्या आनंदलहरी तेव्हापासूनच जाणवत होत्या. परात्पर गुरु पांडे महाराज सोहळ्याच्या स्थळी येणार असल्याने पायघड्या घातल्या होत्या. ‘धरणीमाताही जणू भगवंतरूपी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आगमनासाठी आतुर आहे’, असे जाणवत होते.

३. उजाडला भावसोहळ्याचा दिवस !

दोन दिवसांपासून साधकांना ओढ लावणारा तो आनंदमयी दिवस अखेर उजाडला ! मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या तिथीस प्रारंभ झाला ! आश्रमातील चैतन्यात आणखीनच वाढ झाली होती. प्रत्येक साधक आपापल्या भावानुसार वेगळ्याच भावविश्‍वात जाऊन सोहळ्याचा आनंद अनुभवत होते. ‘आपण पृथ्वीवर नसून कोणत्यातरी वेगळ्याच उच्च लोकामध्ये आहोत’, असे जाणवत होते.

४. …आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांचे आगमन झाले !

परात्पर गुरु पांडे महाराज सोहळ्याच्या स्थळी येण्याच्या मार्गावर पायघड्या अंथरलेल्या होत्या. पायघड्यांच्या दोन्ही बाजूंना फुले मांडली होती. ‘आश्रमातील साधक आणि संत यांच्या मनात परात्पर गुरु पांडे महाराज यांचे दर्शन कधी होणार’, ही उत्सुकताही होती ! परात्पर गुरु पांडे महाराज यांचे आगमन झाले. दुतर्फा उभे असणार्‍या साधक-साधिकांनी त्यांच्यावर भावपूर्णरित्या पुष्पवृष्टी केली. या वेळी मंत्रपठण चालू होते. सुवासिनींनी हातात दीप घेऊन आणि संतांनी नमस्काराच्या मुद्रेत परात्पर गुरु बाबांचे दर्शन घेतले. त्यांना पाहून कुणाच्या अंगावर रोमांच आले, तर कुणाला भावाश्रू आले ! परात्पर गुरु बाबांचे ते चैतन्यदायी रूप प्रत्येकानेच नेत्रांत साठवले !

परात्पर गुरु महाराजांच्या आगमनाने सभागृह चैतन्याने भारित झाले. ते व्यासपिठावर चढत असतांना शंखनाद झाला. परात्पर गुरु बाबा व्यासपिठावर बसल्यानंतर जणू उच्च लोकातील जीव आणि ऋषिमुनी हेही तेथे उपस्थित असून ‘देवताही परात्पर गुरु बाबांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे वाटत होते. यानंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी परात्पर गुरु पांडे महाराज आणि त्यांचे कुटुंबीय (परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पुत्र श्री. अमोल, स्नुषा सौ. देवयानी, नात कु. गौरी आणि नातू श्री. सौरभ) यांचा परिचय करून दिला.

५. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन !

एकमेवाद्वितीय अशा परात्पर गुरु पांडे महाराजांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले. या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांची भावस्थिती पाहून तो अनमोल क्षण सर्वांनीच आपल्या मनमंदिरामध्ये साठवून ठेवला ! परात्पर गुरु पांडे महाराजांचा प्रथम संपर्क २००५ मध्ये झाल्यानंतर लगेचच ते सनातनशी एकरूप झाले. त्यांनी सनातनला आणि साधकांना केलेल्या साहाय्याविषयीचे अनुभवलेले अमूल्य क्षण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संदेशात दिले होते.

६. गुरुमाऊलींचे प्रतिरूप असणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पाद्यपूजेची सुवर्णसंधी लाभली !

मंत्रोच्चार आणि सनईच्या मधुर स्वरात अत्यंत भावपूर्णरित्या आश्रमातील साधक दांपत्य श्री. निनाद गाडगीळ आणि त्यांची पत्नी सौ. तनुजा गाडगीळ यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पाद्यपूजन केले. गुरुमाऊलींचे प्रतिरूप असणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पाद्यपूजेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. हा क्षण स्थुलातून अनुभवायला मिळाल्यामुळे सर्वांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

७. सनातनचे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या हस्ते परात्पर गुरु पांडे महाराज यांचा सन्मान

सनातनचे पू. सदाशिव (भाऊ) परब यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली भेटवस्तू देऊन सन्मान केला. पू. भाऊकाकांनी त्यांना नमस्कार केल्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनीही त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.

८. सुवासिनींकडून कणकेच्या ९१ दिव्यांनी परात्पर गुरु बाबांचे औक्षण !

आश्रमातील साधिका सौ. तनुजा गाडगीळ, सौ. स्मिता नाणोसकर, सौ. राधा साळोखे आणि सौ. नम्रता दिवेकर यांनी धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कणकेच्या ९१ दिव्यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे औक्षण केले. या वेळी ‘औक्षण करतांना पंचप्राणांनी आत्मज्योतीचे पूजन करत आहोत’, असा सर्व साधकांचा भाव होता. सर्वांनी मानसरित्या स्वतःही एकाप्रकारे पूजन अनुभवले.

९. नातीने सिद्ध केलेली परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या जीवनपटाचेे दर्शन
घडवणारी चित्रफीत आणि सनातन संस्थेने सिद्ध केलेली कृतज्ञतारूपी ध्वनीचित्र-चकती सर्वांना दाखवली !

परात्पर गुरु पांडे महाराज यांची नात कु. गौरी हिने त्यांच्या जीवनपटाची ओळख होण्यासाठी सिद्ध केलेली चित्रफीत, तसेच त्यांच्या जीवनातील साधनाप्रवास आणि त्यातील अमूल्य क्षण यांसंदर्भात सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध केलेली ध्वनीचित्र-चकतीही या वेळी दाखवण्यात आली. चित्रफीती पहातांना सर्वांची भावजागृती झाली. कु. गौरी हिने सिद्ध केलेली चित्रफीत पहातांना ही केवळ परात्पर गुरु बाबांची माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती नसून त्यातून तिचा परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयीचा भावच प्रतीत होता.
‘परात्पर गुरु पांडे महाराज यांना मी काहीच देऊ शकत नाही. त्यांच्या आठवणी सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी मी छोटासा प्रयत्न केला आहे. ही ध्वनीचित्र-चकती सिद्ध करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला साहाय्य केलेले आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता !’, अशा शब्दांत कु. गौरी हिने या वेळी कृतज्ञताही व्यक्त केली.

१०. क्षणचित्रे

अ. भावसोहळ्यानंतर आश्रमातील वातावरण पुष्कळच हलके आणि शांत झाले होते.

आ. भावसोहळ्यात साधकांना आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.

इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या भावस्थितीच्या वेगवेगळ्या मुद्रा आणि अद्वितीय अवस्था सर्वांनाच अनुभवायला मिळाल्या.

ई. भावसोहळा पाहून पांडे कुटुंबियांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव जागृत होऊन त्यांना गहिवरून आले.

उ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी भावसोहळ्याचे सूत्रसंचालन केल्याने सर्वांनाच त्यांच्या चैतन्यदायी वाणीचा लाभ झाला.

ऊ. सौ. तनुजा गाडगीळ यांनी मधे मधे भावपूर्णरित्या भावप्रयोग सांगितल्याने सर्वच जण भावविभोर अवस्थेत गेले, तसेच सौ. तनुजा यांनाही भावाश्रू आले.

ए. व्यासपिठावरून खाली उतल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सनातनच्या संतांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.

 

कुटुंबीय आणि सद्गुरु यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी बोलण्यास
शब्दच अपुरे आहेत ! – श्री. अमोल पांडे (परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पुत्र)

श्री. अमोल पांडे

अ १. भगवंतभक्तीत रममाण झालेले परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज यांना प्रारंभीपासून अध्यात्म आणि नामजप यांची आवड होती. त्यांनी मला ‘तू कसा आहेस’, असे कधीच विचारत नाहीत, तर प्रत्येक वेळी ‘नामस्मरण चालू आहे का’, असेच विचारतात. सर्वांनाच ते नामस्मरणाचे महत्त्व सांगतात. त्यांची भगवंतावरील श्रद्धा दृढ आहे. ते भगवंताच्या भक्तीत रममाण असतात. भगवंताकडे जाण्याची तळमळही त्यांच्यामध्ये पुष्कळ आहे.

अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा !

या वयातही त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. त्यांचे हस्ताक्षरही सुवाच्च आहे. त्यांची अजूनही लिखाण आणि वाचन करण्याची क्षमता दांडगी आहे. ‘हे सर्व तुम्ही कसे करता’, असे त्यांना विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘हे मी करत नसून परात्पर गुरु डॉक्टरच माझ्याकडून करवून घेतात.’’ त्यांची गुरुमाऊलींवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांना देवाचा आशीर्वादही लाभत असल्यानेच हे सर्व करणे शक्य होत आहे.

अ ३. मोकळेपणाने आणि आनंदाने हसणारे प.पू. बाबा !

ते नेहमी आनंदातच असतात. ते सर्वांसमवेत मोकळेपणाने आणि आनंदाने हसतात. मलाही अजून त्यांच्या इतके मोकळेपणाने हसता येत नाही.

 

श्री. अमोल यांचा कंठ दाटून आला !

आज आई (कै. आशा पांडे आजी) असती, तर तिलाही पुष्कळ आनंद झाला असता. ती काय बोलली असती, हे शब्दही आता माझ्या कानावर पडत आहेत’, असे सांगतांना त्यांचा कंठ दाटून आला. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेल्या साधनेचे फळ मी, आई आणि माझे कुटुंब यांना मिळतच आहे. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो’, ही प्रार्थना !

ईश्‍वररूपी गुणांची खाण असलेली आणि दैवी सत्संग
देणारी असामान्य विभूती म्हणजे परात्पर गुरु पांडे महाराज ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

परात्पर गुरु पांडे महाराज म्हणजे गुणांची खाण आहेत. मी त्यांच्याविषयी सांगायचे म्हणजे ‘हिमालयासमोर ढेकूळ’, अशी माझी अवस्था आहे. ते सर्वगुणसंपन्न असल्यामुळे ईश्‍वराच्या जवळ पोहोचले आहेत. मध्यंतरी गोवा येथे एका साधकाला अनेक व्याधी झाल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याच्या आजारासाठी मंत्र शोधणे आणि ते म्हणणे असे त्यांनी पुष्कळ तळमळीने केले. या प्रसंगातून त्यांचे नेतृत्वगुण, प्रेमभाव, गांभीर्य, दायित्व, तळमळ असे अनेक गुण अनुभवायला मिळाले.

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे ।’ या उक्तीने ते कृती करतात. पहाटे ५ वाजल्यापासून त्यांची ज्ञानगंगा चालू होते. ते सांगत असलेले ज्ञान ऐकतांना त्यांचा उत्साह आणि आनंद पाहूनच आपल्यालाही पुष्कळ आनंद मिळतो.

त्यांच्यामध्ये प्रीती, सातत्य, चिकाटी, नम्रता, लीनता, अहंशून्यता, शिकण्याची वृत्ती, परिपूर्ण सेवा करणे, असे अनेक गुण आहेत. कलियुगामध्ये भूतलावर संतदर्शन दुर्मिळ असते. त्यात परात्पर गुरु भेटणे अधिकच दुर्मिळ आहे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे असामान्य विभूती असलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांचा सत्संग आम्हाला लाभतो. याविषयी आमचे परम परम परम परम भाग्य आहे ! ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अस्तित्व, चैतन्य आणि कृपा यांचा आम्हाला अखंड लाभ होवो’, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी सांगायचे,
तर केवळ कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञताच ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली परात्पर गुरु पांडे महाराज यांची गुणवैशिष्ट्ये ऐकल्यानंतर ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी सद्गुरु दादा आपल्या सर्वांच्या मनातील विचारच सांगत आहेत’, असे वाटते.’ परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी मी ‘केवळ कृतज्ञता…कृतज्ञता… आणि कृतज्ञता !’ एवढेच सांगू शकते.

श्री. शिवाजी वटकर यांनी अनुभवलेले परात्पर गुरु पांडे महाराज !

१. साक्षात् ईश्‍वराच्या सत्संगाचा अनुभव देणारे परात्पर गुरु पांडे महाराज ! – श्री. शिवाजी वटकर

१ अ. चैतन्यदायी आणि आनंददायी परात्पर गुरु बाबा !

श्री. शिवाजी वटकर

मागील २ वर्षांपासून मी प्रतिदिन ब्राह्म मुहुर्तावर परात्पर गुरु पांडे महाराज (परात्पर गुरु बाबा) यांना फिरायला घेऊन जातो. त्यांनी माझा हात धरल्यावर ‘प्रत्यक्ष ईश्‍वरानेच हात धरला आहे’, याची अनुभूती येते. संत, ईश्‍वर, भगवंत म्हणजे काय, हे समजते. ते बोलतात, तेव्हा ‘भगवंताची अमृतवाणी, आकाशवाणी होत आहे’, असे वाटते. त्यांच्याकडून येणार्‍या ज्ञानगंगेचा धबधबा ऐकून किंवा लिहून घेता येत नाही. मी त्यांचे बोलणे भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित करून नंतर टंकलिखित करतो. त्यांच्या सत्संगात कधीच कंटाळा, निराशा किंवा आळस येत नाही. त्यांच्यामुळे मागील २ वर्षांतील माझा प्रत्येक क्षण आनंदात गेलेला आहे. ते ज्ञानमार्गी असले, तरी हास्य आणि विनोद करत व्यवहारातील उदाहरणे देतात. त्यांच्याजवळ केवळ चैतन्य आणि आनंद आहे अन् ते आम्हा साधकांना तेच सदैव देतात.

१ आ. ‘संत दिसती वेगळाले, परि ते स्वस्वरूपी मिळाले ।’, याची प्रचीती देणारे परात्पर गुरु बाबा !

ते कधीतरी मला म्हणतात, ‘‘तुम्हाला पूर्वी संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांचा सत्संग मिळालेला आहे, त्याविषयी सांगा.’’ मी म्हणतो, ‘‘बाबा, तुम्ही जे सांगता, तेच संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव सांगायचे. तेव्हाही असाच आनंद आणि चैतन्य मिळायचे. केवळ शब्द आणि प्रसंग वेगळे असायचे.’’ म्हणून म्हणावेसे वाटते, ‘संत दिसती वेगळाले, परि ते स्वस्वरूपी मिळाले ।’

१ इ. कोणत्याही प्रश्‍नावर परात्पर गुरु बाबांच्या रामबाणरूपी मार्गदर्शनाने जीवनाचे आणि साधनेचे गणित सुटणे

त्यांच्या सत्संगात असतांना मला काही विचारायची किंवा शब्दांतून सांगायची आवश्यकता नसते. ते माझ्या मनातील सर्व शंका ओळखतात आणि माझ्या चुका, गैरसमज, शंका, अडचणी इत्यादी दूर करतात. ते साधनेला आवश्यक आणि परात्पर गुरुदेवांना अपेक्षित असे मार्गदर्शन करतात. ते समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर सूत्र रूपाने (गणितातील फॉर्म्युल्याप्रमाणे) रामबाण उपाय सांगतात. नंतर विचारतात, ‘‘समजले का ? पटले का ? आता कोणताही प्रश्‍न विचारा.’’ रामबाणाप्रमाणे असलेल्या त्यांच्या सूत्ररूपी मार्गदर्शनाने जीवनाचे आणि साधनेचे गणित सुटलेले असते. कोणताही प्रश्‍न मनात आला आणि त्यांनी दिलेल्या सूत्रात बसवला की, प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर मिळते. विचारण्यासारखे काहीच रहात नाही.

१ ई. परात्पर गुरु बाबांच्या कृपेमुळेच सनातन संस्थेविषयीचे सत्य उलगडून सांगता आले !

सनातन संस्थेवर आरोप होतात की, संस्था ब्राह्मणांची आहे, जातीभेद करते, अन्याय करते इत्यादी. मी परात्पर गुरु बाबांना सांगितले, ‘‘मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो की, परात्पर गुरुदेवांंनी जातीभेदाचा कलंक पुसून साधनेचे अमृत पाजले आहे. मागील २५ वर्षे माझ्या मनात ही गोष्ट घर करून राहिली आहे आणि मी ती कोणाला सांगू शकत नाही.’’ यावर ते म्हणाले, ‘‘भिऊ नका. सत्य समोर येऊ द्या. ‘परम पूज्य कोण आहेत ?’, हे जगाला कळू दे.’’ परात्पर गुरु बाबांच्या कृपेने लिहिलेला लेख साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना आवडला. त्यामुळे ‘सनातन संस्था ही जातीवादाचा कलंक पुसून साधनेचे अमृत पाजणारी एकमेव संस्था आहे’, हे त्यांच्या लक्षात आले.

परात्पर गुरु बाबांच्या प्रेरणेमुळेच मी न चुकता प्रतिदिन प्रशिक्षणवर्गाला जातो.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांच्याप्रती त्यांना अतीव प्रेम आहे. साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करतात.

देवद आश्रमातील साधक असती भाग्यवंत ।
केली कृपा त्यांच्यावरी दयाळू तो कृपावंत ॥
दिधले परात्पर गुरु पांडे महाराज साधकांसाठी ते भगवंत ।
करिती प्रीतीची उधळण अनंत, अनंत आणि अनंत ॥
त्या प्रीतीरूपाच्या वाढदिवस सोहळ्याची
सुवर्णसंधी मिळाली आम्हाला ।
साष्टांग नमन आमुचे भावविश्‍व
अनुभवण्यास देणार्‍या गुरुमाऊलीला ॥

 

तुका म्हणे माझे हेचि सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥

मार्गदर्शनातून साधकांना आत्मोद्धाराचे गमक सांगतांना

क्षात्रतेजसंपन्न आपण उत्साहमूर्ती । आपल्या मार्गदर्शनाने मिळे स्फूर्ती ॥

काळानुसार क्षात्रतेजाचे संवर्धन अपरिहार्य आहे, ही शिकवण देतांना

परात्पर गुरूंच्या आगमनाचा मंगलमय क्षण । हर्षोल्हासाने पुष्पवृष्टी करिती साधकजन ॥

स्मरण स्मरण । गुरुचरण स्मरण ॥ सतत स्मरण । गुरुचरण स्मरण ॥

 

 

पुष्पवृष्टीनंतर सभागृहस्थळी आगमन झाल्यावर वंदन करतांना संत आणि साधक

 

परात्पर गुरु पांडे महाराज यांची शरणागतभावाने पाद्यपूजा करतांना श्री. निनाद गाडगीळ आणि सौ. तनुजा गाडगीळ

९१ दिव्यांनी सुवासिनींनी औक्षण केले । देवीदेवता, ऋषिमुनी सारे जणू भूवरी अवतरले ॥

मांदियाळी जमली सनातनच्या संतांची । भावभेट घेतली परात्पर गुरु पांडे महाराज यांची ॥

 

साधकांनी अर्पण केलेली शब्दसुमने पहातांना परात्पर गुरु पांडे महाराज आणि कुटुंबीय

 

फलकावरील लिखाण

चरणी वाहतो आपल्या कोटी कोटी कृतज्ञतापुष्पे

ज्ञानसूर्य असूनही आपण आहात करुणामूर्ती ।

मुखावरी आपल्या सदैव दिव्य हास्य विलसती ॥ १ ॥

ईश्‍वरी प्रेरणेने विश्‍वाला दिधले आपण मंत्रोपचार ।

अज्ञानी जीवांना लाभला आपला दैवी आधार ॥ २ ॥

चराचरात चैतन्य बघायला शिकवले आपण ।

गुरुदेवांचा संकल्प साकार होण्या असे आपले समर्पण ॥ ३ ॥

प.पू. गुरुदेवांनी दिले आम्हा हे अनमोल धन ।

कसे फेडावे आम्ही दोन्ही श्रीगुरूंचे ऋण ॥ ४ ॥

प.पू. पांडे महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानिमित्त कु. गौरी पांडे हिचा सत्कार करतांना

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात