कुुरुक्षेत्र (हरियाणा) येथील ५ व्या पंचगव्य महासंमेलनात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या प्रदर्शनाला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुरुक्षेत्र (हरियाणा) – येथील जाट धर्मशाळा या ठिकाणी ५ वे पंचगव्य महासंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ५ किलोमीटरच्या पदयात्रेने ९ नोव्हेंबर या दिवशी या संमेलनाला प्रारंभ होऊन १२ नोव्हेंबर या दिवशी समारोप झाला. या ४ दिवसीय महासंमेलनात भारतातील २३ राज्ये आणि नेपाळ येथून १ सहस्र ५०० गोप्रेमींनी सहभाग घेतला. गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजनभाई वर्मा यांच्या गुरुकुलम् यांच्या वतीने कुरुक्षेत्र येथे पंचगव्य महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

९ नोव्हेंबर या दिवशी संमेलनाचे विधीवत उद्घाटन झाले. या वेळी संशोधक श्री. मदन मोहन बजाज, आचार्य रामस्वरूप, डॉ. संगीता, डॉ. जी. मणि आणि जाट समाजाचे २० प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपण ज्या भूमीवर रहातो, त्या भूमीवरील सर्व जीव आणि वनस्पती यांना आपले कुटुंब समजणे, म्हणजे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा मुख्य विषय या संमेलनामागे होता. या वेळी संशोधक श्री. मदन मोहन बजाज म्हणाले, ‘‘पृथ्वीवर होणारे भूकंप, त्सुनामी, वादळ इत्यादींसाठी पृथ्वीवर मनुष्याकडून होणारी जीवहानी हेच कारण आहे.’’

१. संमेलनाच्या तिसर्‍या दिवशी मागील १६५ दिवसांपासून गोचर भूमीच्या मुक्तीसाठी उपोषणाला बसलेले संत गोपालदासजी महाराज सहभागी झाले होते.

२. कार्यक्रमाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी सूर्ययोगी श्री. उमाशंकर यांनी सहभाग घेतला. त्यांनी सर्वांना सूर्ययोगाचे प्रशिक्षण दिले.

३. संमेलनात संपूर्णपणे सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेल्या धान्यापासून बनवलेल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

४. ‘हायब्रिड’ धान्य मनुष्य संस्कृती नष्ट करत आहे. असे धान्य कोणत्याही स्थितीत भक्षण करू नये, असा संदेश संमेलनाच्या वेळी लावण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आला.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोपालन’ या विषयावर लावण्यात आलेल्या फलक प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनाला शिबिरार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्रे

१. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून काही शिबिरार्थींनी इंग्रजी, हिंदी आणि आयुर्वेद यांचे संपूर्ण संच खरेदी केले.

२. अनेक शिबिरार्थींनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोपालन’ या विषयावरील फलकांची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढून ती फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमांतून प्रसारित केली.

३. दक्षिण भारतातून आलेल्या शिबिरार्थींनी ‘गोसंवर्धन आणि पंचगव्य यांपासून उत्पादने कशी बनवावी’ या ग्रंथांसह अन्य उपचारविषयक ग्रंथही त्यांच्या भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

४. या शिबिराला उपस्थित गोरक्षक संत गोपालदासजी महाराज यांना सनातन संस्थेच्या वतीने वर्ष २०१८ चे सनातन पंचांग भेट दिले असता त्यांनी सनातनच्या भावी कार्याला आशीर्वाद दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात