तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांनी तबलावादन केल्यावर तबला अन् तबलावादक यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे
‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.टी.एस्. उपकरण

‘भारतीय संगीतात गायन, वादन आणि नृत्य यांचा तालवाद्यांशी फार पुरातन काळापासून संबंध आहे. तबला हे वाद्य भारतीय संगीताचा अविभाज्य घटक बनला आहे. आजकाल ‘सोलो’ वादन (टीप १) सादर करण्याकडे बहुतांश कलाकारांचा कल दिसून येतो. एखाद्या कलाकाराने आपली कला लोकांसमोर सादर केल्यास त्याचा परिणाम तो स्वतः कलाकार आणि प्रेक्षक या दोघांवर होतो. इतकेच नव्हे, तर त्या कलाकाराने ज्या माध्यमातून ती कला सादर केली आहे (उदा. तबला, पेटी, सतार इत्यादी वाद्य, नृत्य करतांना घातलेले घुंगरू, चित्रकाराचे चित्र आदी), त्या निर्जीव माध्यमावरही परिणाम होतो. कलाकाराने सादर केलेली कला सात्त्विक आहे कि असात्त्विक, तसेच त्या कलाकाराची सात्त्विकता, त्याला आध्यात्मिक त्रास (टीप २) आहे कि नाही इत्यादी घटकांवर हा परिणाम अवलंबून असतो. कलियुगातील सध्याच्या रज-तमप्रधान काळात ३० टक्के लोकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे ‘तबलावादकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असणे वा आध्यात्मिक त्रास नसणे यांचा त्याच्या तबलावादनानंतर तबला अन् तो स्वतः वादक यांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासणे’, यासाठी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ७.९.२०१७ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तर्फे ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

टीप १ – ‘सोलो’ वादन : कलाकार जे वाद्य वाजवण्यात निपूण असतो (उदा. तबला, सतार इत्यादी), त्यावर तो एकटा वादनकला सादर करतो.

टीप २ – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत तबला आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका अन् आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांची तबलावादनापूर्वी आणि तबलावादनानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

तबलावादन करतांना श्री. गिरीजय प्रभुदेसाई

२ अ. तबलावादनाचा तबल्यावर झालेला परिणाम

२ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने तबलावादन केल्यानंतर तिच्या तबल्यामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांनी तबलावादन आरंभ करण्यापूर्वीच्या निरीक्षणांत दोघांच्या तबल्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती. तबलावादन झाल्यानंतर केलेल्या निरीक्षणात आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या तबल्यात नकारात्मकता आढळली नाही; पण तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या तबल्याच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ३० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ तबलावादनानंतर तिच्या तबल्यामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तबलावादन करण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या निरीक्षणांत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक या दोघांच्या तबल्यांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका यांनी तबलावादन केल्यानंतर त्या दोघांच्या तबल्यांतील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होणे अन् आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या तबल्यामधील सकारात्मक स्पंदनांतील वाढ अधिक असणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने तबलावादन करण्यापूर्वी तिच्या तबल्यातील सकारात्मक स्पंदनांच्या केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ३० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे चाचणीच्या आरंभी तबल्यामध्ये थोडी सकारात्मक स्पंदने आढळली. तिने तबलावादन केल्यानंतर स्कॅनरच्या भुजांनी ४५ अंशाचा कोन दाखवला. याचा अर्थ तबल्यातील सकारात्मकतेत थोडी वाढ झाली. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने तबलावादन केल्यानंतर तबल्यातील सात्त्विकता मोजतांना स्कॅनरच्या भुजांनी ४५ अंशाचा कोन दर्शवला होता. साधकाने तबलावादन केल्यानंतर स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे त्यात थोडी वाढ झाली. या निरीक्षणांवरून असे लक्षात येते की, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या तबल्यातील सकारात्मक स्पंदनांच्या वाढीपेक्षा आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या तबल्यातील सकारात्मक स्पंदनांची वाढ थोडी अधिक आहे.

२ अ ३. तबलावादनानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या तबल्याची प्रभावळ घटणे, तर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या तबल्याची प्रभावळ वाढणे

सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. तबलावादनापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांच्या तबल्यांची प्रभावळ अनुक्रमे १.७७ मीटर आणि १.४७ मीटर होती. तबलावादनानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या तबल्याची प्रभावळ १० सेंटीमीटरने घटून ती १.६७ मीटर झाली; तर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या तबल्याच्या प्रभावळीत ५१ सेंटीमीटरने वाढ होऊन ती १.९८ मीटर झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ‘३ आ १ अ’ आणि ‘३ आ १ आ’ मध्ये दिले आहे.

२ आ. तबलावादनाचा वादकांवर झालेला परिणाम

२ आ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने तबलावादन केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक स्पंदने न्यून होणे

तबलावादनापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ साधिकेपासून ६० सेंटीमीटर दूरपर्यंत होती. तबलावादन झाल्यानंतर साधिकेच्या केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १२० अंशाच्या कोनात उघडल्या. त्यामुळे या वेळी नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली नाही. (स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच आपल्याला प्रभावळ मोजता येते.) याचा अर्थ तबलावादनानंतर साधिकेमधील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली. साधिकेने तबलावादन करण्यापूर्वी आणि नंतरही तिच्यात ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये तबलावादन करण्यापूर्वी आणि नंतर कोणतीही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ‘३ अ’ आणि ‘३ आ’ मध्ये दिले आहे.

२ आ २. तबलावादनानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ होणेे; पण तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये ती निर्माण न होणेे

तबलावादनापूर्वी आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ४५ अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे त्याच्यात थोडी सकारात्मक ऊर्जा होती. तबलावादनानंतरच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १२० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे साधकातील सकारात्मकतेमध्ये थोडी वाढ झाली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये तबलावादनापूर्वी आणि नंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ ३. तबलावादनानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांची प्रभावळ थोडी वाढणे

तबलावादनापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेची प्रभावळ १.५ मीटर आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाची प्रभावळ २ मीटर होती. तबलावादनानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या प्रभावळीत प्रत्येकी १० सेंटीमीटरने वाढ झाली.

वरील २ सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ‘३ आ २’ आणि ‘३ आ ३’ मध्ये दिले आहे.

 

३. निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र

३ अ. तबलावादनातून सात्त्विक (सकारात्मक) स्पंदने प्रक्षेपित होणे

या प्रयोगातील तबलावादनातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

३ अ १. भारतीय संगीताचा पाया आध्यात्मिक असल्याने त्यातून सात्त्विक स्पंदने निर्माण होऊ शकणे

‘पाश्‍चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर भारतीय शास्त्रीय संगीतात अंतःकरणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे’, असे भारतीय शास्त्रीय संगीताविषयी म्हटले जाते. भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आध्यात्मिक आहे. त्यामुळे त्यात सात्त्विक स्पंदने निर्माण करण्याची क्षमता आहे. ते ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. असे संगीत श्रोत्यांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (संगीत विशारद)

३ अ २. ‘तबला हे वाद्य भक्तीयोगाशी अन् श्रीकृष्णतत्त्वाशी संबंधित आहे.’ – एक विद्वान, २३.८.२००७ (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.)

३ अ ३. साधकांनी तबलावादन ‘सेवा’ म्हणून सादर करणे

दोन्ही साधकांनी आपल्या कलेचे ‘प्रदर्शन’ म्हणून नाही, तर ‘सेवा’ म्हणून तबलावादन सादर केले.

३ आ. तबलावादनामधील सात्त्विक स्पंदनांमुळे प्रयोगातील घटकांना आध्यात्मिक स्तरावर झालेले लाभ

३ आ १. तबला

३ आ १ अ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने वाजवलेल्या तबल्यावर तबलावादनातील सात्त्विकतेचा परिणाम होणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने वाजवलेल्या तबल्यामध्ये तबलावादनानंतर थोडीफार सात्त्विकतेची स्पंदने निर्माण झाली, तसेच त्याची प्रभावळही वाढली. तबल्यासारख्या निर्जीव वस्तूवरही सात्त्विकतेचा परिणाम झाला.

३ आ १ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने तबलावादन केल्यानंतर तबल्यामधील सकारात्मक ऊर्जा थोडी वाढणे; पण साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने तबल्यावर त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केल्यामुळे तबल्याभोवती नकारात्मक स्पंदनेही निर्माण होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने तबलावादन केल्यावर त्या तबलावादनातून सात्त्विकतेची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने तबल्यावर त्रासदायक शक्ती प्रक्षेपित केली. त्यामुळे त्या तबल्याभोवती थोड्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि तबल्याची प्रभावळही थोडी न्यून झाली. त्या तबल्यातील सकारात्मक ऊर्जा मात्र तबलावादनातील सात्त्विक स्पंदनांमुळे थोडी वाढली.

३ आ २. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका

३ आ २ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकली नाही, तरी तिच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होणे आणि तिची प्रभावळ थोडी वाढणे

तबलावादनामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही; कारण तिला असलेल्या वाईट शक्तींच्या (टीप १) तीव्र त्रासाशी लढण्यात तबलावादनातून प्रक्षेपित झालेली सकारात्मक ऊर्जा व्यय (खर्च) झाली. असे असले, तरी या सूक्ष्मातील (टीप २) युद्धामुळे साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीची शक्ती व्यय (खर्च) झाल्यामुळे साधिकेतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली. यामुळेच साधिकेची प्रभावळही थोडी वाढली.

टीप १ – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)

टीप २ – सूक्ष्म : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)

३ आ ३. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक

३ आ ३ अ. तबलावादनामुळे आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात वाढली आणि त्याची प्रभावळही थोडी वाढली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.१०.२०१७)

ई-मेल : [email protected]