संतांच्या वंदनीय उपस्थितीत आणि वेदमंत्राच्या घोषात बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे प्रांतीय अधिवेशनाला प्रारंभ !

धर्मशिक्षण घेण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याचा संकल्प करा ! – महंत मावजीनाथ महाराज

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, महंत मावजीनाथ महाराज, माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये

बार्शी (जिल्हा सोलापूर) – सध्या चित्रपटांद्वारे हिंदु देवता, धर्म, परंपरा, शौर्य गाजवणारी राणी पद्मावती अशा शूर वीरांगनांची विटंबना केली जाते. यामुळे ‘दशक्रिया’, ‘पद्मावती’ असे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. धर्मरक्षकांनी अशा चित्रपटांना विरोध केल्यावर त्यांना गोंधळ घालणारे समजले जाते; म्हणून धर्मशिक्षण घेण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याचा आजपासून संकल्प करा. धर्माचे महत्त्व कळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु धर्मजागृती सभां’ना उपस्थित रहा. हा विरोध केवळ राजपूत आणि ब्राह्मण यांपुरता मर्यादित न ठेवता हिंदूंनी संघटित होऊन धर्मविरोधी कृत्यांचा विरोध करावा, असे जाज्वल्य मार्गदर्शन तुळजापूर येथील गरीबनाथ मठाचे मठाधिपती महंत मावजीनाथ महाराज यांनी केले. ते बार्शी येथील विश्‍वा गार्डन मंगल कार्यालय येथे होत असलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनात झालेल्या उद्घाटनसत्रात बोलत होते.

अधिवेशनाचा प्रारंभ शंखनाद आणि मंत्रपठणाने करण्यात आला. श्री. रघुनाथ काळेगुरुजी आणि त्यांचा विद्यार्थी यांनी मंत्रपठण केले. त्यानंतर महंत मावजीनाथ महाराज, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

अधिवेशनाला सोलापूर, लातूर, बीड आणि सातारा जिल्ह्यांतील अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित आहेत. अधिवेशनाचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी अधिवेशन निर्विघ्न पार पडण्यासाठी पाठवलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनाची आवश्यकता, हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना, हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा, हिंदु धर्मावर होत असलेल्या वैचारिक आक्रमणांपासून रक्षण कसे करावे, गोरक्षण, जिहादींपासून हिंदूंचे रक्षण करणे, मंदिर रक्षण, आपत्ती व्यवस्थापन काळाची आवश्यकता, माहिती अधिकाराचा योग्य वापर कसा करावा, प्रसिद्धीमाध्यमांना कसे सामोरे जावे, सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा कसा द्यावा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी साधनेची आवश्यकता असे विविध विषय हाताळण्यात येणार आहेत.

या वेळी अधिवेशनाचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले आणि स्वामी गोविंददेव गिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांच्या आशीर्वादपर संदेशाचे वाचन करण्यात आले.

 

हिंदु राष्ट्र हे आपले मत न रहाता व्रत व्हावे ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे आपले मत न रहाता ‘व्रत’ व्हावे. अधिवेशनाच्या माध्यमातून अनेक संघटनांचे यशस्वी संघटन करायचे आहे. गेल्या ७० वर्षांत सर्वसामान्यांना मूलभूत सुविधाही या लोकशाहीने दिल्या नाहीत. भ्रष्टाचाराने होरपळलेली जनता, गोहत्या बंदी, धर्मांतर बंदी, समान नागरी कायदा ही सूत्रे प्रलंबित आहेत. या अनुषंगाने आपल्याला सनदशीर मार्गाने लढा द्यायचा असून हिंदु राष्ट्राची निर्मिती करायची आहे. गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू अधिवेशनासमान सूत्र घेऊन ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ या नावाने १४ राज्यांत २२५ विषय हाताळले. त्यातील १०५ विषय यशस्वीरित्या हाताळले आहेत. या आंदोलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येतात. हे अधिवेशनाचे यश आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात