धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्माभिमान्यांसाठी मार्गदर्शन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या धर्मशिक्षणवर्गातच हिंदूंना खरे धर्मशिक्षण मिळते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कार्यक्रमाला उपस्थित धर्माभिमानी

तासगाव (जिल्हा सांगली) – हिंदूंच देवतांचे विडंबन करत आहेत, वाढदिवस दिवा विझवून साजरा केला जातो, अनेक हिंदू धर्मांतरित झाल्याप्रमाणे जीवन जगत आहेत, याचे केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि हे धर्मशिक्षण केवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात दिले जाते, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. येथे धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्माभिमान्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘मनुष्यजन्म दिल्याविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेने जलद मोक्षप्राप्ती कशी करावी’, याविषयी सर्वांना अवगत केले. या वेळी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

धर्माभिमान्यांनी सध्या करत असलेली साधना आणि त्यात येणार्‍या अडचणी विचारून घेतल्या, तसेच साधना वृद्धींगत होण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याचा निश्‍चय केला. रामनाथी आश्रमात जाऊन आलेल्या काही धर्माभिमान्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘आश्रमात पुष्कळ चैतन्य अनुभवले आणि तेथून येऊच नये, असे वाटत होते.’

 

क्षणचित्रे

१. धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्तपणे दायित्व घेऊन कार्यक्रमाची सिद्धता केली.

२. कैलास कॉन्फरन्सचे मालक श्री. सुदाम पवार यांनी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले, तसेच ‘तुम्ही येथे येण्यामागे दैवी नियोजन आहे’, असे पवार यांनी सांगितले.

 

धर्माभिमान्यांचे मनोगत

१. रामनाथी आश्रमात गेल्यावर ‘सनातन कुटुंब हेच माझे कुटुंब आहे आणि ते पुष्कळ मोठे आहे’, असे जाणवले. – श्री. राजेंद्र माळी

२. आपल्यात पालट होण्यासाठी एकदा रामनाथी आश्रमात जायला हवे, तो स्वर्गच आहे. – श्री. अरुण यादव

३. वयाच्या १० व्या वर्षांपासून पोट आणि पाठ दुखी चालू होती. अनेक औषधोपचार केले, तरी काहीच फरक पडला नाही. धर्मशिक्षणवर्गात गेल्यावर नामजप केल्याने पुष्कळ त्रास न्यून झाला. त्यानंतर रामनाथी आश्रमात गेलो आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्यानंतर माझा त्रास ७० टक्के एवढ्या प्रमाणात न्यून झाला. – श्री. भीमराव माने (श्री. भीमराव माने हे नियमित नामजप पूर्ण होण्यासाठी सकाळी १ घंटा आणि रात्री १० ते दुपारी १ या वेळेत बसून नामजप पूर्ण करतात. त्यांचा तरुण मुलगा दिवंगत झाल्याने कुटुंबाचे दायित्व त्यांच्यावर आहे. श्री. माने वयाच्या ६५ व्या वर्षीही शारीरिक कष्ट भोगून गवंडीच्या हाताखाली काम करतात. मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘केवळ सनातनच्या धर्मशिक्षणवर्गात सांगितली जाणारी साधना, नामजप आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन यांमुळे माझे कुटुंब आनंदी आहे.’’ हे सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला होता.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात