टिपू सुलतानच्या समर्थनार्थ असलेला मोर्चा रहित होण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन

मोर्चा रहित होण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ईश्‍वरपूरमध्ये तहसीलदार आणि पोलीस यांंना निवेदन

ईश्‍वरपूरचे तहसीलदार श्री. नागेश पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना उपस्थित हिंदु धर्माभिमानी

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत. खरेतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर ईश्‍वरपूरच्या इतिहासात प्रथमच असा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चा काढून धर्मांधांच्या संघटनांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमी नागरिकांना पडला आहे. टिपू सुलतानने ८ सहस्रांपेक्षाही अधिक हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत, अशी म्हैसूर गॅझेटीयरमध्ये नोंद आहे. अशा क्रूरकर्म्याकडून समाजाने कोणता आदर्श घ्यावा ? त्यामुळे अशा मोर्च्याला अनुमती देऊ नये, यासाठी ईश्‍वरपूर येथील तहसीलदार, तसेच पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

१. प्रताप मानकर यांनी ‘शासन जो काही निर्णय घेईल, तसे आम्ही आदेश पाळू’, असे सांगितले. तसेच ‘मोर्च्यामध्ये जर कोणी आक्षेपार्ह घोषणा दिल्या आणि हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या, तर आम्ही संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करू’, असेही सांगितले.

२. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सर्वश्री बाळासाहेब गायकवाड, ऋतुराज पवार, मंदार चव्हाण आणि इतर १५ कार्यकर्ते, शिवसेनेच्या वतीने श्री. राजेश पाटील, श्री. आकाश पाटील, रासपचे अध्यक्ष श्री. सतीश इदाते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री अनंत दीक्षित, स्वप्नील माळी, इंद्रजित निंबाळकर, सुशांत सूर्यवंशी, पाटीदार समाजाच्या वतीने सर्वश्री किरीटभाई पटेल, हेमंत पटेल, विपुल पटेल, अधिवक्ता संघटनेच्या वतीने अधिवक्ता शशांक माने, अधिवक्ता सुनील पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार, श्री. भरत जैन, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्त्या सौ. भारती जैन, सनातन संस्थेचे श्री. उत्तम मोरे, श्री. अशोक म्हसकर, तसेच रासप, पाटीदार समाज यांचे प्रतिनिधी, हिंदु धर्माभिमानी श्री. आदित्य माने, श्री. विश्‍वजीत पाटील आदी एकूण ४१ धर्माभिमानी उपस्थित होते.

 

सांगली येथेही हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली –  सांगलीत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर यांनी पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. पोलीस अधीक्षक यांनी ‘या संदर्भात माहिती घेऊन योग्य ती कृती करू’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात