‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी न घातल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून वैध मार्गाने विरोध करतील !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे पत्रकार परिषद

जळगाव – ‘पद्मावती’ चित्रपटात भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता, आदर्श महापुरुष-वीरांगना यांचा अपमान, तसेच हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असे आतापर्यंत आलेल्या ‘ट्रेलर’द्वारे दिसून येते. यातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात अशांतता निर्माण केली आहे. या इतिहासद्रोही चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात यावीत किंवा त्यावर बंदी घालण्यात घालण्यात यावी. असे न झाल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनाही रस्त्यावर उतरून वैध मार्गाने विरोध करतील. या संदर्भातील आंदोलनाची दिशा १९ नोव्हेंबरला जळगाव येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेत निश्‍चित करून सर्वांसमोर मांडली जाईल, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक श्री. नरेश खंडेलवाल, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगरप्रमुख श्री. मोहन तिवारी, क्षत्रिय महासभेचे श्री. महेंद्रसिंह पाटील, नरेंद्र मोदी युवा संघाचे जिल्हाध्यक्ष आणि उद्योजक अनिल पगारिया आणि समितीचे जळगाव येथील समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर उपस्थित होते.

 

श्री. घनवट पुढे म्हणाले…

१. प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन स्त्रिया समाजापुढे नाचगाणे करत नसत, तर प्रसंगी हातात तलवार घेऊन त्यांनी मैदान गाजवले आहे. शत्रूंना धूळ चारली आहे.

२. असा जाज्वल्य आणि पराक्रमाचा थोर इतिहास असतांना त्यात मोडतोड करून भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात महाराणी पद्मावतीला सर्वांसमोर नाचतांना दाखवले आहे. हा राणी पद्मावती यांचा घोर अपमान आहे. यामुळे राजपूत समाजासह संपूर्ण हिंदु समाजाच्या भावना तीव्र आहेत.

३. यापूर्वीही ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात बाजीराव पेशवे आणि त्यांची पत्नी काशीबाई यांना नाचतांना दाखवले होते. इतकेच नव्हे, तर काशीबाई आणि मस्तानी यांनी पिंगा घालून नाच करतांना दाखवले.

४. राणी पद्मावती असो वा काशीबाई यांच्या संदर्भातील इतिहासाच्या कोणत्याही ग्रंथांत ‘त्या नाचल्या होत्या’ असा उल्लेख वा पुरावा नसतांना कपोलकल्पित कथा रचून प्रत्यक्ष इतिहासाची मोडतोड करणे सहन केले जाणार नाही.

५. खरे तर सामाजिक शांतता बिघडवणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे यांप्रकरणी भन्साळी यांच्यावर शासनाने गुन्हे प्रविष्ट केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

६. जळगाव येथे राजपूत संघटनांच्या वतीने या चित्रपटाविरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे, त्याला हिंदु संघटनांचा पाठिंबा आहे.

 

जळगाव धर्मसभेचा प्रसार सातासमुद्रापार !

जळगाव धर्मसभेचा प्रसार सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लक्षावधी धर्मप्रेमींपर्यंत पोहोचला आहे. सभेसाठी सिद्ध केलेली चित्रफीत अमेरिकेत स्थायिक झालेल्या जळगावकर बांधवांपर्यंत पोहोचली आहे. तेथून त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि या कार्याला त्यांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले.

 

विविध माध्यमांतून सभेचा होणारा प्रसार !

घरोघरी प्रसार, बैठका, होर्डिंग, भित्तीपत्रक, चौकातील एलईडी स्क्रीन, सामाजिक संकेतस्थळ, केबल वाहिन्या आणि वृत्तपत्रे या सर्वांच्या माध्यमांतून सभेचा विषय सर्वत्र पोहोचत आहे, असे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी सांगितले.

 

१७ नोव्हेंबरला धर्मसभेच्या निमित्ताने भव्य वाहनफेरी !

१७ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या दृष्टीने भव्य अशा वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने फेरीत सहभागी होण्याचे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले. फेरीत अथवा धर्मसभेच्या प्रसारात सहभागी होऊन धर्मकार्य करणार्‍यांनी ९०७५७०१६९१ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात