मध्यप्रदेशमधील झिरी गावात संस्कृत भाषा बोलली जाते !

उर्दू शाळा उघडण्यासाठी मागणी आली असती, तर सरकारने अशीच अनास्था दाखवली असती का ?

सरकारी अनास्थेमुळे संस्कृत बोलणार्‍यांची संख्या रोडावली

राजगड (मध्यप्रदेश) – गेल्या १४ वर्षांपासून येथील झिरी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ प्रतिदिनच्या दिनचर्येत संस्कृतचा वापर करत आहेत. काही वर्षांपासून ग्रामस्थ गावात संस्कृत विद्यालय उघडण्याची सरकारकडे मागणी करत आहेत; मात्र सरकारी अनास्थेमुळे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे गावात संस्कृत भाषा बोलणार्‍यांची संख्या रोडावत चालली आहे.

१. वर्ष २००३ मध्ये ‘संस्कृत भारती’च्या सहकार्याने संस्कृतच्या प्रसाराकरता विमला पन्ना या स्वयंसेविकेला या गावात पाठवण्यात आले होते. तिच्या प्रयत्नांनी केवळ ६ मासांत गावातील ७० टक्के लोकांनी संस्कृतचा प्रतिदिनच्या दिनचर्येत वापर करण्यास प्रारंभ केला होता.

२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतीय गोसेवा प्रमुख उदयसिंह चौहान यांच्या मते, वर्ष २००६ मध्ये शासकीय सर्वेक्षणानुसार ७० टक्के ग्रामस्थ संस्कृतमध्ये संभाषण करत होते. ही संख्या आता ५० टक्क्यांवर आली आहे.

३. गावातील एका घरातील सर्वच सदस्य संस्कृतमध्ये संभाषण करतात. या घराला संस्कृत गृहम् नावाने ओळखले जाते.

४. गावातील निरक्षर महिलाही अस्खलित संस्कृत बोलण्यात कुशल झाल्या आहेत.

संस्कृतला वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

संस्कृत भाषेविषयी येथील ग्रामस्थांमध्ये विशेष रूची आहे; मात्र सरकार १४ वर्षांपासून एक संस्कृत विद्यालयही उघडू शकले नाही. त्यामुळे आता संस्कृतला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून स्थानिक शासकीय विद्यालयात प्रतिदिन एक घंटा विनामूल्य संस्कृत संभाषण कक्ष उघडण्यात आला आहे. या माध्यमातून नवीन पिढीला संस्कृतशी जोडण्यात येत आहे. या कक्षाचा लाभ तरुण, तसेच इंग्रजी माध्यमांत शिकणारी मुलेही घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात