हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना सनातन संस्था स्वस्थ बसणार नाही ! – सौ. नंदिनी सुर्वे, सनातन संस्था

महापे गाव (नवी मुंबई) येथील हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नवी मुंबई  – सनातनसारख्या छोट्या संस्थेच्या तेजस्वी धर्मप्रसाराचा धर्मद्रोही संघटनांनी धसका घेतला आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ असल्याने निर्दोष सनातनची अपकीर्ती करण्याचे प्रयत्न चालू आहेत; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना सनातन संस्था स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन सनातनच्या साधिका सौ. नंदिनी सुर्वे यांनी केले. ५ नोव्हेंबर या दिवशी महापे गावात झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी उपस्थित होते. सभेला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. उदय धुरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

 

धर्मनिरपेक्ष लोकशाही हे धर्माच्या या अधःपतनाचे मुख्य कारण ! – डॉ. उदय धुरी

सर्व परिस्थिती पाहूनही केवळ बघ्याची भूमिका घेणे, ही आत्मघातकी वृत्ती हिंदूंमध्ये वाढत आहे. केरळमध्ये लव्ह जिहादची ९० हून अधिक प्रकरणे राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेकडे (एन्आयए) सोपवण्यात आली आहेत. पनवेलमध्ये ३०० युवती अशाच कारणांमुळे बेपत्ता आहेत आणि तरीही सगळीकडे शांतता आहे. या सर्वांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हाच एकमेव उपाय आहे.

या वेळी सभेसाठी साहाय्य करणारे धर्माभिमानी सर्वश्री हनुमंत राजपुरोहित, चंद्रकांत पाटील, प्रभाकर पाटील, दगडू पाटील, अनंत पाटील यांचे समितीच्या वतीने श्री. भालचंद्र गायकवाड यांनी आभार मानले.

 

धर्माभिमानी श्री. चंद्रकांत पाटील यांनी सभेनंतर झालेल्या चर्चेत दिलेला उत्स्फूर्त अभिप्राय !

केक कापून वाढदिवस साजरा करणे अयोग्य आहे. तरुणांनी पाश्‍चात्य संस्कृती त्यागून हिंदु धर्माप्रमाणे आचरण करावे. हिंदु संस्कृती व्यापक आहे, तर अन्य पंथ संकुचित विचारसरणी जोपासतात.

 

उपस्थित मान्यवर

शिवसेनेचे महापेचे विभागप्रमुख श्री. दगडू पाटील, शाखाप्रमुख श्री. देवीदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत पाटील, हिंदु महासभेचे श्री. मंगेश म्हात्रे

 

आढावा बैठक !

सभेनंतर कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी गावदेवी मंदिरात सायंकाळी ७.३० वाजता आढावा बैठक होणार आहे.  बैठकीला अधिकाधिक हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात