विज्ञानाच्या प्रसाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांमध्ये देव, धर्म यांविषयी संभ्रम निर्माण करणारा अंनिसचा ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ थांबवण्यात यावा ! – सनातन संस्था

मुंबई येथे सनातन संस्था व हिंदु
जनजागृती समितीचे निवेदनाद्वारे प्रशासनाला आवाहन

डावीकडून मुंबईचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत थोरात यांना निवेदन देतांना डॉ. उदय धुरी, प्रभाकर भोसले

मुंबई – विज्ञानाच्या प्रसाराच्या नावाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून देव, धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये यांमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प चालू असल्यास तो त्वरित बंद करण्यात यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आले आहे. याविषयी समितीच्या वतीने मुंबईच्या शहर आणि उपनगराच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मुंबई शहराच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेले निवेदन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत थोरात यांनी स्वीकारले. या वेळी विक्रोळी येथील श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी उपस्थित होते. मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेले निवेदन उपजिल्हाधिकारी सत्यनारायण बजाज यांनी स्वीकारले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. सतीश सोनार आणि कु. हेमंत पुजारे उपस्थित होते.

 

या निवेदनात म्हटले आहे,

१.  धर्मविरोधी प्रशिक्षणामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संबंधित संघटना यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. एकप्रकारे या प्रकल्पांमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहे.

२. या प्रकल्पांतर्गत प्रश्‍नपत्रिकेमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या नावावर कोणकोणते चमत्कार खपवले जातात, इस्लाम धर्मातील कालबाह्य रूढी कोणत्या, शनीशिंगणापूरला चोर्‍या होत नाहीत, ही अंधश्रद्धा कशी तपासावी, वेदांसंबंधी अंधश्रद्धा कोणत्या, उपवासाचे शारीरिक दुष्परिणाम कोणते, सत्यनारायण कथेमध्ये कोणकोणते चमत्कार सांगितले आहेत, धर्म ही ‘अफूची गोळी आहे’, हे विधान कोणाचे आहे ? असे प्रश्‍न विचारलेले असतात. त्यामुळे धर्मश्रद्धांविषयी संभ्रम निर्माण होऊन त्यांच्या मनातील भारतीय संस्कृती आणि श्रद्धा नष्ट होत आहेत. अशा प्रकारे धर्मावर शिंतोडे उडवणारे आणि श्रद्धास्थानांची खिल्ली उडवणारे प्रश्‍न विचारून विद्यार्थ्यांच्या मनात धर्मद्वेष निर्माण करण्याच्या या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक जाणिवा निर्माण होणे दूरच राहिले; मात्र विद्यार्थी भ्रमित होऊन दिशाहीन बनतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात