भांडुप येथे राष्ट्रीय हिंदूआंदोलनात सनातनचा सहभाग

जातीभेद विसरून हिंदू एकत्र आले नाहीत, तर उद्या भारतात
औरंगजेबाची जयंतीसुद्धा साजरी होईल ! – अधिवक्ता संतोष दुबे, विश्‍व हिंदु परिषद

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

मुंबई – हिंदू जाती-पातींमध्ये विभागले गेले आहेत. जातीभेद विसरून हिंदू एकत्र आले नाहीत, तर भविष्यात टिपू सुलतानचीच काय, औरंगजेबाची जयंतीसुद्धा भारतभर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे मुलुंड जिल्हा सहमंत्री अधिवक्ता संतोष दुबे यांनी ५ नोव्हेंबरला भांडुप येथे आंदोलनाला संबोधित करतांना केले. कर्नाटक सरकारने हिंदूंची हत्या आणि धर्मांतर करणार्‍या टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ५ नोव्हेंबरला भांडुप रेल्वे स्थानकाबाहेरील बिकानेर स्वीटजवळ राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

अधिवक्ता दुबे पुढे म्हणाले, ‘‘जगातील ७ आश्‍चर्यांपैकी ताजमहल ही एक वास्तू आहे हे सर्वांना माहीत आहे; मात्र त्या ठिकाणी नमाजपठण केले जाते, हे पुष्कळ अल्प लोकांना माहीत आहे. एक थडगे म्हणून तिथे नमाजपठण होणार असेल, तर आम्हा हिंदूंच्या दृष्टीने त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे, त्यामुळे आम्हालाही पूजा आणि आरती करण्याची अनुमती दिली गेली पाहिजे.’’

या वेळी हिंदु नेते आणि कार्यकर्ते यांवर सातत्याने होणारी आक्रमणे आणि त्यांच्या निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राची ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’कडून सखोल पडताळणी करण्यात यावी. ताजमहालचा सत्य इतिहास समोर येण्यासाठी शासनाने इतिहास संशोधक समिती नेमावी आणि जोवर ती हिंदूंची वास्तू आहे की, इस्लामी थडगे आहे हे सिद्ध होत नाही तोवर तेथील नमाजपठण बंद करावे किंवा हिंदूंनाही पूजेसाठी अनुमती द्यावी. या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या.

या वेळी श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. प्रकाश सावंत, योग वेदांत सेवा समितीचे श्री. महादेव चाळके, शिवसेनेचे श्री. गणेश पाटील, सनातन संस्थेचे श्री. गोविंद दळवी, हिंदु जनजागृती समिती डॉ. लक्ष्मण जठार  यांनी आंदोलनाला संबोधित केले.

आंदोलनात वरील मान्यवरांसह बजरंग दल शिवशंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

क्षणचित्रे

१. बजरंग दलाच्या वतीने भांडुप येथे संपूर्ण दिवस रक्तदान शिबिर असूनही सायंकाळी १० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले

२. आंदोलनातील भाषणे ‘स्कायवॉक’वर उभे राहून लोक ऐकत होते.

३. आंदोलनाचे संपूर्ण नियोजन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केले होते.

४. आंदोलनामध्ये सनातन प्रभातचे एक वाचक आणि संकेतस्थळ पहाणारे दोन जिज्ञासू उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात