भावी संकटकाळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता आजपासून करा !

अनेक संतांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०१९ पासून हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार आहे. यामुळे पुढील अडचणी निर्माण होतील. त्यांना काही प्रमाणात तरी तोंड देता येण्यासाठी पुढील कृती करा !

१. प्रवासाची सोय

मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा भासेल. तेल-निर्यात करणारे आखाती देश हे युद्धाचे कुरुक्षेत्र बनल्याने तेथून इंधन मिळवणे दुरापास्त होईल. त्यामुळे घरोघरी वाहने असूनही त्याद्वारे प्रवास करता येणार नाही. अशा संकटकाळात प्रवास करणे सुलभ व्हावे, यासाठी पुढील कृती आजपासून करा.

अ. वैयक्तिक प्रवासासाठी घरामध्ये सायकल ठेवा, तसेच सायकल चालवणे शिकून घ्या.

आ. कुटुंब मोठे असेल, तर कुटुंबासह प्रवास करता येण्यासाठी सायकल-रिक्षा शिकून घ्या.

इ. घोडे आणि बैल पाळण्यास आरंभ करा, तसेच अश्‍वारोहण अन् बैलगाडी चालवणे शिकून घ्या. यामुळे घोड्यावरून अथवा बैलगाडीतून प्रवास करणे शक्य होईल.

 

२. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसंदर्भात घ्यायची काळजी

संकटकाळात इंधनाच्या तुटवड्यामुळे दळणवळणाची साधने निष्प्रभ ठरतील. अशा वेळी दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणे कठीण होईल. यासाठी पुढील कृती आजपासून करा.

अ. प्रतिदिन आहारात लागणारे दूधही मिळवण्यासाठी आजपासून घरोघरी गाय पाळणे आरंभ करा. तसेच गायीचे दूध काढणे इत्यादी गोपालनाशी संबंधित कृती शिकून घ्या.

आ. आरोग्यासाठी आवश्यक घरगुती औषधे तात्काळ उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार अशा वनौषधींची लागवड करा. आपल्या घराच्या अंगणात किंवा आगाशीत निर्गुंडी, ओवा, तुळस, जास्वंद, अडुळसा अशा औषधी वनस्पतींची झाडे आपल्याला लावता येतील. शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये (फ्लॅट्समध्ये) किंवा भाड्याच्या खोल्यांत रहात असतात. त्यांनी कुंड्यांमध्ये निवडक वनस्पती लावाव्यात. (याची सविस्तर माहिती देणारी पुस्तिका सनातन संस्था प्रकाशित करणार आहे.)

इ. संकटकाळात स्थानिक प्रशासनाकडून पुरवली जाणारी पिण्याच्या पाण्याची यंत्रणा खंडित झाल्यास पाणी मिळणे कठीण होईल. यासाठी आपल्या अंगणात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खणून ठेवा.

ई. संकटकाळात वीजपुरवठा खंडित होतो. अशा वेळी आवश्यक कारणांसाठी वीज उपलब्ध व्हावी, यासाठी घरात आतापासूनच सोलर सिस्टीम लावून घ्या.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात