भाेंदू साधू-संत आणि गुरु यांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्था गेली १८ वर्षे सत्संगांच्या माध्यमातून हिंदूंना साधनेकडे वळवत आहे. हिंदु जनजागृती समिती गेली १५ वर्षे हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी एकत्र करत आहे. संस्था आणि समिती या दोघांचे पुढील कार्य तथाकथित साधू-संत अन् गुरु यांच्या संदर्भातही असणार आहे. याचे कारण आहे तथाकथित साधू-संत आणि गुरु यांची सद्यस्थिती !

 

 

 

१. तथाकथित साधू-संत आणि गुरु यांची सद्यस्थिती

१ अ. अज्ञान

तथाकथितांत अध्यात्माचा अभ्यास नसतो आणि त्यांच्यात शिकण्याची वृत्तीही नसते; म्हणून त्यांचे ज्ञान फार त्रोटक असते. असे असल्यामुळे ते मार्गदर्शन करत असतांना लिहून घेण्यासारखे काही नसल्याने त्यांचे भक्तही काही लिहून घेत नाहीत.

 

२. अध्यात्म हा सूक्ष्म विषय असल्याने तो तथाकथितांना न समजणे

अध्यात्म हे सूक्ष्म विषयाचे, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलिकडील शास्त्र आहे; पण दुःखाची गोष्ट अशी की, तथाकथितांना सूक्ष्मातील कळत नाही.

२ अ. अहंभाव

‘मला सर्व कळते’, ‘मी सर्व अडचणी दूर करू शकतो’, असे त्यांना वाटते. अहंभाव असलेला कधी ईश्‍वराच्या जवळ असेल का ? साधकाच्या भक्तीमुळे देव साधू-संतांचे रूप घेऊन त्यांना अनुभूती देतो. असे असतांना स्वत:तील अहंभावामुळे हे तथाकथित ‘माझ्यामुळे साधकाला अनुभूती आली’, असे सर्वांना सांगतात आणि त्यालाही सर्वांना सांगायला सांगतात.

२ आ. तथाकथितांची नावे

बहुतेकांची नावे ‘ब्रह्मानंद, नित्यानंद, परमानंद, तुरियानंद, १०८ श्री श्री’, अशी असतात; पण ती नावे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला शोभत नाहीत; कारण त्यांना त्यांच्या नावाप्रमाणे अनुभूती आलेली नसते. मुलांना ज्याप्रमाणे श्रीकृष्ण, राम, लक्ष्मी, पार्वती इत्यादी नावे असतात, त्याचप्रमाणे तथाकथितांची अर्थहीन नावे असतात; पण भक्तांच्या हे लक्षात येत नसल्यामुळे ते नावाने भारून जाऊन त्यांना फार मोठे समजतात.

२ इ. तथाकथितांच्या दाढी, मिशा आणि भगवी वस्त्रे

यामुळे बरेच भक्त त्यांच्याकडे आकृष्ट होऊन फसतात.

२ ई. भक्तांशी प्रीतीशून्य वागणे

प्रीतीमुळे परमेश्‍वर भक्तांसमवेत महाराजांसारखा वागत नाही, तर वडिलांप्रमाणे वागतो. तथाकथितांत ईश्‍वराचा सर्वांत महत्त्वाचा गुण प्रीती, म्हणजे निरपेक्ष प्रेम नसते. त्यामुळे ते ईश्‍वरापासून बरेच दूर असतात. असे असतांना त्यांना भक्तांचे भले करता येईल का ?

२ उ. अयोग्य मार्गदर्शन

तथाकथित त्यांच्याकडे येणार्‍याला ‘त्यांच्या संप्रदायाची साधना उपयुक्त आहे कि नाही’, याचा विचार न करता साधनेची त्यांना ज्ञात असलेली त्यांच्या संप्रदायाची केवळ तात्त्विक माहिती देतात, तसेच ते भक्तांकडून साधनेचा प्रायोगिक भाग करवून घेत नाहीत. त्यामुळे भक्तांची साधना आणि आयुष्यातील मूल्यवान वर्षे वाया जातात.

 

३. कार्याची फलनिष्पत्ती

वरील दोषांमुळे तथाकथितांच्या आणि त्यांच्या संमेलनांची फलनिष्पत्ती शून्य असते.

 

४. परिणाम

अ. तथाकथितांमुळेे हिंदूंची स्थिती परमावधीच्या अधोगतीला गेली आहे.

आ. खर्‍या हिंदु साधू-संतांची आणि हिंदु धर्माची अपकीर्ती होत आहे.

 

५. तथाकथित ओळखायचे कसे ?

खर्‍या संतांकडे साहाय्य मागावे लागत नाही. लायक व्यक्तीला ते स्वतःहून साहाय्य करतात. याउलट तथाकथितांचा अहंभाव आपण सांभाळला, तरच ते थोडेफार साहाय्य करतात.

 

 ६. उपाय

६ अ. तात्त्विक

हिंदु राष्ट्रात खर्‍या संतांनाच स्वतःला ‘महाराज, स्वामी’ इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल ! ही ‘पदवी’ मिळवायची असेल, तर तथाकथितांना साधना करून अध्यात्मातील तो स्तर प्राप्त करावा लागेल.

६ आ. प्रत्यक्ष कृती

हे साध्य करण्यासाठी धर्मप्रेमींनी सर्वत्रच्या तथाकथितांचा अभ्यास करावा आणि त्यांची नावे आणि त्रुटी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कळवाव्यात. विषयाचा अभ्यास आणि साधना नसल्याने बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जे जमले नाही, ते आपण करू !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात