(म्हणे) ‘गोव्यात राजकीय आश्रयामुळे सनातन संस्था टिकून आहे !’

गोव्यातील हिंदूद्वेष्ट्या ख्रिस्ती पत्रकार देविका सिक्वेरा
यांच्याकडून ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळावर सनातनची अपकीर्ती करणारा लेख प्रसिद्ध !

या अपकीर्तीविषयी देविका सिक्वेरा आणि ‘द वायर’ संकेतस्थळ यांच्यावर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

पणजी – चर्चसंस्थेवर टीका करणारा भाजप सनातनला पाठीशी घालत आहे आणि राजकीय पाठबळावरच सनातन संस्था गोव्यात टिकून आहे, अशा आशयाचा लेख देविका सिक्वेरा या गोव्यातील सनातनद्वेष्ट्या महिला पत्रकाराने ‘द वायर’ या वृत्तसंकेस्थळावर प्रसिद्ध केला. ‘द वायर’ हे संकेतस्थळ तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांच्या गटाकडून चालवले जाते. आमिर खानसारखे तथाकथित धर्मनिरपेक्ष अभिनेते या संकेतस्थळाचे आश्रयदाते आहेत.

 

या वृत्तात देविका सिक्वेरा यांनी म्हटले आहे की,

१. गौरी लंकेश, एम्.एम्. कलबुर्गी, साम्यवादी नेते गोविंद पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे फॉरेन्सिक अहवालातून समोर येत आहे. (असे कुठल्याही अन्वेषण यंत्रणेने किंवा कर्नाटक पोलिसांनी सांगितलेले नाही. धादांत खोटे बोलणे हे या धर्मनिरपेक्ष पत्रकारांचे वैशिष्ट्य आहे. नुकतेच टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने या धर्मनिरपेक्ष आणि हिंदुद्वेष्ट्या पत्रकारांना उघडे पाडले होते. – संपादक) यामुळे संशयाच्या धुक्याखाली असलेली गोव्यातील सनातन संस्था पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. (सनातन संस्था नेहमीच तिच्या अध्यात्मातील कार्यामुळे प्रकाशझोतात राहिली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय सनातनचा धर्मद्रोह्यांच्या हत्यांशी संबंध जोडून देविका सिक्वेरा यांच्यासारखे पत्रकार अपकीर्ती मात्र करत आहेत. – संपादक)

 

सनातन संस्था आणि तिचा आश्रम यांविषयी काहीही माहिती नसतांना आरोप करणार्‍या सिक्वेरा !

२. ही एक छोटीशी उपद्रवी संघटना आता राजकीय पाठिंब्यामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. (सनातन संस्थेला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. – संपादक) गेली दोन दशके ही कट्टर हिंदुत्वनिष्ठ संघटना गोव्यात आहे. मार्च १९९९ मध्ये या संघटनेने न्यासाची स्थापना केली आहे. या संस्थेच्या रामनाथी, फोंडा येथील आश्रमात काय चालते, याविषयी एकदम अल्प माहिती आहे. हा आश्रम कोण नियंत्रित करतो, याविषयीही काही माहिती नाही. (आश्रमात काय चालते ते गोव्यातील अध्यात्मातील जिज्ञासू लोकांना चांगले ठाऊक आहे. देविका सिक्वेरा एकदाही आश्रमात आलेल्या नाहीत किंवा त्यांनी आश्रमात काय चालते ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे त्यांना अल्प माहिती आहे, हा त्यांचा दोष आहे. सनातन संस्थेचे गुरुपौर्णिमा कार्यक्रम, उपक्रम, ग्रंथप्रदर्शन हे गोव्यात राज्यभर असतात. यांपैकी किती कार्यक्रमांना देविका सिक्वेरा आतापर्यंत गेल्या ? उगाचच हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात गुढता निर्माण करायची सवयच काँग्रेस आणि साम्यवादी यांच्या काळात या तथाकथित धर्मनिरपेक्ष पत्रकारांना लागली आहे. – संपादक)

 

(म्हणे) ‘मुख्यालय पनवेल येथून गोव्यात का आणले ? ’

३. आठवले यांनी सनातनचे मुख्यालय पनवेल येथून गोव्यात फोंडा येथे का आणले ? (परात्पर गुरु डॉ. आठवले वर्ष १९९९ पासून गोव्यातच आहेत. पनवेलचा आश्रम त्यानंतर ३ वर्षांनी झाला आहे. हे ठाऊक नसतांना उगाचच प्रश्‍न उपस्थित करून संशय निर्माण करायचा हा कावेबाजपणा आहे. – संपादक) आठवले यांना गोव्यातील भगव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी पायघड्या घालून बोलावले होते का ? मुख्यालय गोव्यात स्थानांतरित करण्यामागची कारणे काय आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. (स्वतःचे अज्ञान प्रकट करणार्‍या देविका सिक्वेरा ! सनातन संस्थेचे मुख्यालय आधीपासून गोव्यातच आहे. ते स्थानांतरित करण्याचा आणि त्यासाठी राजकारण्यांनी पायघड्या घालण्याचा प्रश्‍न येतोच कुठून ? – संपादक)

४. मुख्यालयासाठी मोठ्या आणि प्रसिद्ध मंदिरांचे केंद्र असलेले आणि धार्मिक, तसेच सांस्कृतिक केंद्र असलेल्या फोंडा तालुक्यातील बांदोडा गावातील रामनाथी या ठिकाणाची साहजिकपणे निवड होण्याची शक्यता आहे. हा तालुका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे विवादास्पद राजकारणी सुदिन आणि दीपक ढवळीकर यांचा तळ आहे. हे दोघे सनातनचे गोव्यातील मोठे आश्रयदाते आणि समर्थक आहेत. (यावरून सनातनला राजकीय पाठिंबा आहे, असे कसे म्हणता येईल ? – संपादक) दोन्ही ढवळीकर बंधूंच्या पत्नी सौ. ज्योती आणि सौ. लता या सनातनच्या साधिका आहेत. ‘हिंदु धर्माच्या आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी आमच्या पत्नी सनातनच्या सदस्य आहेत’, असे दोघे ढवळीकर बंधू सांगत आहेत. (त्यात गैर काय आहे ? अनेक ख्रिस्ती आमदारांचा चर्च संस्थेशी संबंध आहे. चर्च संस्था थेट शैक्षणिक माध्यम प्रश्‍नात लक्ष घालते. तसेच भाजपमधील ख्रिस्ती आमदारांवर शैक्षणिक माध्यम इंग्रजी असावे, यासाठी प्रयत्न करावेत; म्हणून दबाव आणते. यावर देविका सिक्वेरा यांना काय म्हणायचेआहे ? राजकारण्यांच्या पत्नीच नव्हे, तर राजकारणीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू शकतात. त्यात गैर काय ? – संपादक)

५. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हरलले माजी मंत्री दीपक ढवळीकर यांच्या पत्नी सौ. लता ढवळीकर या ‘पालकांनी त्यांच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवू नये’, तसेच ‘या देशातील महिला पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकत असल्याने देशात बलात्कारांच्या संख्येत वाढ झाली आहे’, अशी वक्तव्ये केल्यामुळे विवादाच्या गर्तेत आल्या होत्या. (सौ. लता ढवळीकर यांनी देशातील हिंदूंची वस्तूस्थिती सांगितली आहे. ती सत्य आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. पाश्‍चात्त्यीकरण झालेल्यांना ते विवादास्पद वाटले म्हणून ते विवादास्पद ठरत नाही.  – संपादक)

६. ‘तुम्ही ३ बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या हत्या करण्याचा आरोप असलेल्या एका संघटनेला पाठिंबा का देता ?’, असा प्रश्‍न फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दीपक ढवळीकर यांना केला असता, त्यांनी संतप्त होऊन ‘तुम्ही याविषयी एवढ्या सखोलाने अभ्यास का करता ? एखादा सदस्य जर यात असेल, तर संपूर्ण हिंदू यात आहेत का ?’, असे प्रतिप्रश्‍न दूरभाष बंद करण्यापूर्वी केले. (सडेतोड प्रतिवाद करणारे मगोचे माजी आमदार श्री. दीपक ढवळीकर यांचे अभिनंदन ! सनातन संस्थेवर कोणत्याही हत्येच्या प्रकरणात कुठल्याही अन्वेषण यंत्रणेने आरोप केलेला नाही. त्यामुळे देविका सिक्वेरा यांचा प्रश्‍नच चुकीचा आहे. – संपादक)

७. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात आवाज उठवणार्‍या किमान ३ बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या हत्येशी संबंध असलेल्या सनातन संस्थेच्या आश्रमात गेल्या वर्षी झालेल्या एका कार्यक्रमाला गोव्यातील दोन मंत्री ढवळीकर बंधू आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित रहातात, हे प्रश्‍न उपस्थित करण्यासारखे नाही का ? (बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या हत्येशी सनातन संस्थेचा संबंध आहे, हा देविका सिक्वेरा यांच्यासारख्या सनातनद्वेष्ट्या पत्रकारांनी न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन काढलेला निष्कर्ष आहे. अन्वेषण यंत्रणांनी एकाही हत्या प्रकरणात सनातनचे नाव आरोपपत्रात घातलेले नाही. – संपादक)

८. वर्ष २००९ मधील मडगाव येथील स्फोटात मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक या दोन साधकांचा मृत्यू झाल्यानंतर सनातनचा हिंसक हेतू उघड झाला. त्यापूर्वीपासून सनातनच्या बांदोडा गावातील स्थलांतर आणि गुप्त कारवाया पाहून ग्रामस्थांकडून त्यांना उघडपणे विरोध करण्यात आला होता. (काही समाजकंटक सोडले, तर बांदोडा गावातील कुणाचाही सनातनला विरोध नव्हता आणि नाही. देविका सिक्वेरा कधी बांदोड्याला आल्या आहेत का ? पाट्याटाकू आणि पीत पत्रकारिता म्हणतात ते यालाच ! – संपादक)

९. राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे सनातनला आभासी सामाजिक पाठिंबा मिळवण्यास साहाय्य झाले आहे. राज्यातील अनेक पत्रकारांनी विरोध करूनसुद्धा कट्टरपणे हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणार्‍या सनातन प्रभातला सरकारने मान्यता दिली आहे. (देविका सिक्वेरा यांच्या खोटारडेपणाचे आणखी एक उदाहरण ! – संपादक) अनेक लेखक आणि कार्यकर्ता यांना धमकी आणि चेतावणी देण्याशी या दैनिकाचा संबंध आहे. (धादांत खोटे लिहिणार्‍या देविका सिक्वेरा ! असे एकही उदाहरण देविका सिक्वेरा यांनी त्यांच्या लेखातून का दिले नाही ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात