सतारवादनाचा ‘सतार, वादक आणि आध्यात्मिक त्रास असलेले साधक-श्रोते’ यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यू.टी.एस्. उपकरण

‘सतारीच्या आल्हाददायक स्वरांचा आस्वाद जगभरातील अनेकांनी घेतला आहे; परंतु ‘या आस्वादाच्याही पलीकडे आध्यात्मिक, म्हणजे बुद्धीअगम्य स्तरावरही परिणाम होतो का ?’ या दृष्टिकोनातून एक चाचणी घेण्यात आली. सतारवादनाचा वाद्य, वादक आणि श्रोते यांवर होणार्‍या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत सतार, सतारवादक आणि सर्व साधक-श्रोते यांची सतारवादन चालू होण्यापूर्वी ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. त्यानंतर सतारीवर अनुक्रमे ४ राग, २ भजने आणि १ ‘झाला’ (द्रुतगतीत वाजवला जाणारा वादनाचा एक प्रकार) वाजवण्यात आला. प्रत्येक राग १ घंटा ऐकवण्यात आला. त्यानंतर अनुमाने १० मिनिटांचा कालावधी गेल्यानंतर पुढील राग ऐकवण्यात आला. या पद्धतीने सर्व राग, भजने आणि ‘झाला’ ऐकवून झाल्यावर पुन्हा एकदा सतार, सतारवादक आणि सर्व साधक-श्रोते यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

श्री. मनोज सहस्रबुद्धे चाचणीच्या वेळी सतार वादन करतांना

२ अ. वाद्य – सतार

सतार हे प्राचीन काळापासून भारतात प्रचलित असलेले एक तंतुवाद्य आहे.

२ आ. वादक – श्री. मनोज सहस्रबुद्धे

हे केवळ आवड म्हणून सतार वाजवतात. या प्रयोगात त्यांनी स्वत:च्या कलेचे ‘प्रदर्शन’ म्हणून नाही, तर ‘सेवा’ म्हणून श्रीकृष्ण आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करून सतार वाजवली.

२ इ. प्रयोगात वाजवलेले राग

प्रयोगात श्री. सहस्रबुद्धे यांनी यमन, अहिर भैरव, सोहनी आणि ललित हे ४ राग, ‘नाचत गुरुभजनी, आम्ही जाऊ रंगूनी…’ आणि ‘गुरुवीण नाही दुजा आधार…’, ही २ भजने आणि यमन रागात ‘झाला’ सादर केले.

२ ई. प्रयोगात सहभागी साधक

प्रयोगात सहभागी झालेल्या तिन्ही साधिका आणि १ साधक यांना तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) आहे.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

 

३. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

(यू.टी.एस् उपकरणाविषयी अधिक माहितीसाठी पहा : http://www.vedicauraenergy.com/universal_scanner.html)

३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ इ १. नकारात्मक ऊर्जा 

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) 

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात. त्यासाठी -IR हा नमुना ठेवतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) 

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात. त्यासाठी -UV हा नमुना ठेवतात.

३ इ २. सकारात्मक ऊर्जा 

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ इ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

या चाचणीतील साधकांची प्रभावळ मोजण्यासाठी त्यांच्या लाळेचा नमुना म्हणून वापर केला आहे.

३ ई. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ३ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन झाल्यास) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

 

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

 

५. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’
उपकरणाद्वारे ३.९.२०१७ या दिवशी केलेली निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

सारिणीतील प्रभावळीच्या संदर्भात सूचना : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो. हे लक्षात घेऊन सूत्र ‘५ अ १’, ‘५ आ १’ आणि ‘५ इ १’ या सारण्या वाचाव्यात.

५ अ. सतारवादनाचा वाद्यावर झालेला परिणाम

५ अ १. वाद्यासंदर्भात केलेली निरीक्षणे

५ अ २. वाद्यासंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – वादनानंतर
सतारीमध्ये सकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात निर्माण होणे आणि तिची प्रभावळ वाढणे

सतारवादनापूर्वी आणि नंतर सतारीमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत. सर्वच व्यक्ती, वस्तू किंवा वास्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सतारीत वादनापूर्वी नसलेली सकारात्मक ऊर्जा वादनानंतर काही प्रमाणात दिसून आली. सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. सतारीची वादनापूर्वी १.३१ मीटर असलेली प्रभावळ वादनानंतर वाढून १.७९ मीटर झाली. यावरून सतारवादनाचा स्वतः सतारीवर चांगला (सकारात्मक) परिणाम झाल्याचे दिसून येते. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ७’ मध्ये दिले आहे.

५ आ. सतारवादनाचा वादकावर झालेला परिणाम

५ आ १. वादकासंदर्भात केलेली निरीक्षणे

५ आ २. वादकासंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – सतारवादनानंतर वादकातील
नकारात्मक ऊर्जा नष्ट होणे, सकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात निर्माण होणे आणि प्रभावळ वाढणे 

सतारवादनापूर्वी वादकामध्ये अल्प प्रमाणात असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा वादनानंतर पूर्ण नष्ट झाली. त्याच्यात वादनापूर्वी नसलेली सकारात्मक ऊर्जा वादनानंतर थोड्या प्रमाणात आली असल्याचे दिसून आले. (स्कॅनरच्या भुजांनी ३० अंशाचा कोन केला.) वादकाची वादनापूर्वी १.७२ मीटर असलेली प्रभावळ वादनानंतर वाढून २ मीटर झाली. यावरून सतारवादनाचा वादकावरही चांगला (सकारात्मक) परिणाम झाल्याचे दिसून आले. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ७’ मध्ये दिले आहे.

५ इ. सतारवादनाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधक-श्रोत्यांवर झालेला परिणाम

५ इ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधक-श्रोत्यांसंदर्भात केलेली निरीक्षणे

५ इ २. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधक-श्रोत्यांसंदर्भात निरीक्षणांचे विवेचन

५ इ २ अ. सतारवादनानंतर सर्व साधक-श्रोत्यांमधील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नष्ट होणे

‘श्रोता’ म्हणून प्रयोगात सहभागी असलेल्या सर्व साधकांत सतारवादनापूर्वी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प-अधिक प्रमाणात दिसून आली. सतारवादनानंतर पहिली आणि दुसरी साधिका यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली, तर तिसरी साधिका अन् साधक यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात न्यून झाली. सतारवादनापूर्वी केवळ दूसरी साधिका आणि साधक यांच्यात थोड्या प्रमाणात ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा होती; पण सतारवादनानंतर ही नकारात्मक ऊर्जा कोणातच दिसली नाही. यावरून साधकांमधील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा सतारवादनानंतर घटल्या किंवा नष्ट झाल्या, हे लक्षात येते.

५ इ २ आ. सकारात्मक ऊर्जा नसणे

सतारवादनापूर्वी आणि नंतरही प्रयोगात सहभागी असलेल्या सर्व साधकांत सकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

५ इ २ इ. साधकाची प्रभावळ वाढणे, तर तिन्ही साधिकांची प्रभावळ थोडी घटणे

सतारवादनापूर्वीच्या तुलनेत सतारवादनानंतर साधकाची प्रभावळ वाढली, तर तिन्ही साधिकांची प्रभावळ न्यून झाली.

याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ७’ मध्ये दिले आहे.

 

६. निष्कर्ष

‘सतारवादनाचा वाद्य, वादक, तसेच श्रोते यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाला’, हे या चाचणीतून लक्षात येते.

 

७. सतारवादनाचा आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होण्यामागील अध्यात्मशास्त्र

७ अ. सतारवादनातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होणे

या प्रयोगातील सतारवादनातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

७ अ १. भारतीय संगीताचा पाया आध्यात्मिक असल्याने त्यातून सात्त्विक स्पंदने निर्माण होऊ शकणे

‘पाश्‍चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर भारतीय शास्त्रीय संगीतात अंतःकरणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे’, असे भारतीय शास्त्रीय संगीताविषयी म्हटले जाते. भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आध्यात्मिक आहे. त्यामुळे त्यात सात्त्विक स्पंदने निर्माण करण्याची क्षमता आहे. ते ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. असे संगीत श्रोत्यांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (संगीत विशारद)

७ अ २. सतार श्री गणपतितत्त्वाशी आणि कर्मयोगाशी संबंधित असणे

‘सतार हे वाद्य द्वापरयुगात प्रचलित होते. ते कर्मयोगाशी संबंधित वाद्य आहे आणि श्री गणपतितत्त्वाशी संबंधित आहे.’

एक विद्वान, २३.८.२००७ (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनीही प्रसिद्ध आहे.)

७ अ ३. श्री. सहस्रबुद्धे यांनी सतारवादन ‘सेवा’ म्हणून सादर करणे

श्री. सहस्रबुद्धे यांनी स्वत:च्या कलेचे ‘प्रदर्शन’ म्हणून नाही, तर ‘सेवा’ म्हणून सादरीकरण केले. श्री. सहस्रबुद्धे हे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात व्यस्त असूनही त्यांना आश्रमात सतारवादनासाठी बोलावल्यावर त्यांनी लगेच स्वत:च्या व्यवसायाला ४ – ५ दिवस सुटी दिली आणि ते आश्रमात उपस्थित राहिले. यातूनही त्यांचा सतारवादनातील सेवाभाव दिसून येतो.

७ आ. सतारवादनातून प्रक्षेपित झालेल्या सात्त्विकतेचा झालेला सकारात्मक परिणाम

७ आ १. वादक आणि सर्व साधक-श्रोते यांमधील नकारात्मक ऊर्जा घटणे किंवा नष्ट होणे

सतारवादनातून प्रक्षेपित झालेल्या सात्त्विक स्पंदनांमुळे वादक आणि साधक-श्रोते यांच्यातील नकारात्मक ऊर्जा घटली किंवा नष्ट झाली.

७ आ २. सतार आणि वादक यांच्यामध्ये काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा
निर्माण होणे; पण तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांमध्ये मात्र ती निर्माण न होणे

सतार आणि वादक यांत सतारवादनापूर्वी न आढळलेली सकारात्मक ऊर्जा सतारवादनातील सात्त्विकतेमुळे वादनानंतर काही प्रमाणात आढळली. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांमध्ये मात्र सकारात्मक ऊर्जा आढळली नाही; कारण त्यांना असलेल्या वाईट शक्तींच्या (टीप) तीव्र त्रासाशी लढण्यात ती व्यय (खर्च) झाली.

टीप – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)

७ आ ३. प्रभावळीवर झालेला परिणाम

७ आ ३ अ. सतारीची प्रभावळ वादकाच्या प्रभावळीपेक्षा अधिक प्रमाणात वाढणे

सतार आणि वादक या दोघांची प्रभावळ वाढली. सतारीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसल्याने आणि वादकामध्ये सतारवादनापूर्वी थोड्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याने सतारीची प्रभावळ वादकाच्या प्रभावळीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली.

७ आ ३ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या तिन्ही साधिकांची प्रभावळ न्यून होणे, तर साधकाची प्रभावळ वाढणे

सर्व साधक-श्रोत्यांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. सतारवादनाच्या प्रयोगाच्या वेळी लक्षात आले की, प्रयोगातील तिन्ही साधिका-श्रोत्यांनी सतारवादन होत असतांना नृत्य केले. सतारवादनातील सकारात्मक ऊर्जेशी सूक्ष्मातून लढण्यासाठी साधिकांनी वाईट शक्तींच्या प्रभावाखाली हे नृत्य केले. त्यामुळे त्यांची ऊर्जा व्यय झाल्यामुळे त्या साधिकांची प्रभावळ घटली. याउलट प्रयोगातील साधकाने मात्र नृत्य न केल्याने त्याची ऊर्जा टिकून राहिली आणि त्यामुळे त्याची प्रभावळ सतारवादन ऐकल्यानंतर वाढली.

 

८. संगीतप्रेमींना आवाहन – भारतीय शास्त्रीय  संगीताचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

संगीतावर आधारित विविध वैज्ञानिक प्रयोगांतून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे ‘रोगचिकित्सा करण्यात भारतीय संगीत इतर संगीतांपेक्षा अधिक प्रभावशाली आणि उपयोगी आहे, तसेच संगीताच्या माध्यमातून मनुष्य तणावमुक्त होऊ शकतो’, या निष्कर्षांपर्यंत विज्ञानातील संशोधक पोहोचले आहेत. अद्याप विज्ञानाची झेप इथपर्यंतच आहे; परंतु सात्त्विक संगीताच्या माध्यामातून आध्यात्मिक स्तरावरही लाभ होऊ शकतो, हे या प्रयोगातून स्पष्ट होते.

संगीत ही मानवजातीला परमेश्‍वराकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. संगीताच्या माध्यमातून कलाकार ईश्‍वराशी एकरूपता अनुभवू शकतो, हे संत सूरदास, संत हरिदास (तानसेन यांचे गुरु), संत मीराबाई अशा अनेक संतांच्या उदाहरणांतून दिसून येते. संगीतकला केवळ हौस, अर्थार्जन किंवा लोकेषणा एवढ्यापुरती मर्यादित न ठेवता ती ईश्‍वरप्राप्तीचे साधन म्हणून जोपासण्याची प्रेरणा संगीतप्रेमींना होवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१२.९.२०१७)

ई-मेल : [email protected]