जळगावचे ग्रामदैवत प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेऊन सभेच्या प्रचाराचा प्रारंभ

जळगाव येथे १९ नोव्हेंबरला विराट हिंदु धर्मजागृती सभा !

श्रीरामाचे दर्शन घेतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जळगाव येथे १९ नोव्हेंबर २०१७ या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभा होणार आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीरामचंद्राच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.

या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना सांगितले की, हिंदु धर्मावरील आघात, भ्रष्टाचार, आतंकवाद, नक्षलवाद यांच्याशी आपल्याला २०२३ पर्यंत लढा द्यायचा आहे. यासाठी भगवंताची वानरसेना, पांडव आणि शिवरायांचे मावळे बनून सनातन धर्म राज्य अर्थात हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायचा आहे. अनेक संतांनीही येणारा काळ हा भीषण असल्याचे सांगितले आहे. तिसरे महायुद्धही समीप आहे. यासाठी भगवंताची भक्तीच आपल्याला वाचवू शकते म्हणून प्रत्येकाने धर्माचरण करून भक्त होण्यासाठी प्रयत्न करूया.

या वेळी श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांनी प्रभु रामचंद्रांना जळगाव येथील विराट हिंदु धर्मजागृती सभेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. भाजपचे नगरसेवक श्री. सुनील माळी, हिंदु महासभेचे राज्य कार्यवाह अधिवक्ता गोविंद तिवारी, नाभीक महासंघाचे श्री. किशोर सूर्यवंशी, श्री. राजकुमार गवळी, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, कपिल ठाकुर, स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेचे श्री. शेखर कुळकर्णी, बजरंग दलाचे श्री. रूपेश पाली, तसेच सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, रणरागिणीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांच्यासह ४५ हून अधिक हिंदूप्रेमी या वेळी उपस्थित होते.

 

क्षणचित्र

सर्वांनी प्रभु रामाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीरामाला वाहिलेल्या फुलांपैकी १ फूल खाली पडले आणि या माध्यमातून साक्ष मिळाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात