दांडियाच्या वेळी लावण्यात येणाऱ्या राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील रिमिक्स गाण्यांचा होणारा अनिष्ट परिणाम अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी, हल्लीच्या चित्रपटांतील गाणी आणि पारंपरिक गाणी ऐकणे, यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यू.टी.एस्. उपकरण

शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्या रात्री श्रीकृष्णाने राधा आणि गोपी यांसह रासलीला केली. मोहमायेपासून विरक्त असलेल्या गोपी आणि भगवान श्रीकृष्ण यांची रासलीला किती पवित्र असेल ! आताच्या काळात मात्र नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया विकृत स्वरूपात खेळला जात असून त्यामध्ये व्यभिचार होत आहे. आताच्या नवरात्रोत्सवातील एक प्रमुख गैरप्रकार म्हणजे गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी लावण्यात येणारे अशास्त्रीय अन् पाश्‍चिमात्त्य संगीत. या अनुषंगाने आताच्या काळात गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी लावण्यात येणार्‍या विविध प्रकारच्या गाण्यांच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे एक वैज्ञानिक चाचणी घेण्यात आली. दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी, हल्लीच्या चित्रपटांतील गाणी आणि पारंपरिक गाणी ऐकणे यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे, हा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला. ही चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत प्रथम तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असणार्‍या २ साधकांची प्रयोगापूर्वी यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. ही मूळची नोंद होय. त्यानंतर त्यांना एकेक करून आधी सांगितल्याप्रमाणे प्रयोगात निश्‍चित करण्यात आलेली ३ प्रकारची गाणी ऐकवण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्या २ साधकांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

१ अ. पहिला प्रयोग – दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी ऐकणे

पहिल्या प्रयोगाच्या अंतर्गत दोन्ही साधकांची मूळची नोंद घेतल्यानंतर त्यांना दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी (टीप) १ घंटा ऐकवण्यात आली. गाणी ऐकवून झाल्यानंतर लगेच त्यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांवरून या संगीताचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम झाला ?, ते लक्षात आले. त्यानंतर प्रत्येक अर्ध्या घंट्याने दोन्ही साधकांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. निरीक्षणांत त्यांच्या नोंदी मूळच्या नोंदीच्या जवळ येईपर्यंत प्रत्येक अर्ध्या घंट्याने निरीक्षण घेणे चालू ठेवले. मूळच्या नोंदीच्या जवळ निरीक्षण आले म्हणजे या प्रयोगाचा परिणाम न्यून झाला, असे म्हणता येते. हा एकूण कालावधी किती लागला ?, यावरून या संगीताचा साधकांवर झालेला परिणाम किती काळ टिकला ते लक्षात आले. (असेच पुढील दोन्ही प्रयोगांच्या वेळीही केले.)

टीप – डी.जे. रिमिक्स गाणी : रिमिक्स गाणे म्हणजे गाण्याच्या मूळ धुनीमध्ये पाश्‍चिमात्त्य संगीत आणि काही शब्द (बहुतेक वेळी इंग्रजी शब्द) एकत्र करून केलेला नवीन संगीत-आविष्कार. डी.जे. रिमिक्स गाणी म्हणजे एका विशिष्ट क्रमाने एकापाठोपाठ एक लावलेली अनेक रिमिक्स गाणी.

१ आ. दुसरा प्रयोग – दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी
राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकणे

पहिल्या प्रयोगाचा परिणाम न्यून झाल्यानंतर दुसर्‍या प्रयोगाच्या अंतर्गत साधकांना दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी १ घंटा ऐकवण्यात आली. ही गाणी ऐकवून झाल्यानंतर पहिल्या प्रयोगाप्रमाणेच त्यांची लगेच आणि त्यानंतर प्रत्येक अर्ध्या घंट्याने यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांच्या नोंदी त्या प्रयोगाचा परिणाम न्यून होईपर्यंत करण्यात आल्या.

१ इ. तिसरा प्रयोग – राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पारंपरिक गाणी ऐकणे

दुसर्‍या प्रयोगाचा परिणाम न्यून झाल्यानंतर तिसर्‍या प्रयोगाच्या अंतर्गत साधकांना राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पारंपरिक गाणी १ घंटा ऐकवण्यात आली. ही गाणी ऐकवून झाल्यानंतर पहिल्या दोन प्रयोगांप्रमाणे त्यांची लगेच आणि प्रत्येक अर्ध्या घंट्याने यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांच्या नोंदी त्या प्रयोगाचा परिणाम न्यून होईपर्यंत करण्यात आल्या.

या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. प्रयोगात सहभागी झालेले साधक

प्रयोगात श्रोते म्हणून सहभागी झालेला १ साधक आणि १ साधिका यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे.

 

३. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

(यू.टी.एस् उपकरणाविषयी अधिक माहितीसाठी पहा : http://www.vedicauraenergy.com/universal_scanner.html)

३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ इ १. नकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड)

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात. त्यासाठी -IR हा नमुना ठेवतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट)

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात. त्यासाठी -UV हा नमुना ठेवतात.

३ इ २. सकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ इ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

या चाचणीतील साधकांची प्रभावळ मोजण्यासाठी त्यांच्या लाळेचा नमुना म्हणून वापर केला आहे.

३ ई. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ३ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन झाल्यास) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

 

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

 

५. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) उपकरणाद्वारे २५.९.२०१७ या दिवशी केलेली निरीक्षणे

५ अ. निरीक्षण १

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी ऐकण्याचा झालेला परिणाम

५ अ १. निरीक्षणांचे विवेचन

५ अ १ अ. डी.जे. रिमिक्स गाणी ऐकल्यानंतर दोन्ही साधकांची नकारात्मक ऊर्जा वाढणे

दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी ऐकणे, या पहिल्या प्रयोगापूर्वी दोन्ही साधकांतील इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेसंदर्भात केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनापेक्षा अल्प कोनात उघडल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रयोगापूर्वी ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात; पण मोजता येणार नाही अशी होती, असे म्हणता येईल. ही गाणी ऐकल्यानंतर मात्र दोन्ही साधकांच्या निरीक्षणांच्या वेळी स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ त्या गाण्यांमुळे त्यांच्यात नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आली. नकारात्मक ऊर्जेची स्पंदने साधकापासून १.०१ मीटर अंतरार्पंत आणि साधिकेपासून ०.८७ मीटर अंतरार्पंत होती. प्रयोगाच्या आधी दोन्ही साधकांमध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा नव्हती. गाणी ऐकल्यानंतर साधिकेमध्ये ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात आली. या सर्व निरीक्षणांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ अ आणि ७ आ यांमध्ये दिले आहे.

५ अ १ आ. प्रयोगाच्या पूर्वी आणि नंतरही दोन्ही साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जा न आढळणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. दोन्ही साधकांत प्रयोगाच्या आधी आणि नंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ अ आणि ७ आ यांमध्ये दिले आहे.

५ अ १ इ. डी.जे. रिमिक्स गाणी ऐकल्यानंतर दोन्ही साधकांची प्रभावळ पुष्कळ घटणे

सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. या प्रयोगापूर्वी साधकाची १.७६ मीटर असलेली प्रभावळ १.५५ मीटर झाली, म्हणजे ती २१ सें.मी.ने घटली, तर साधिकेची १.८९ मीटर असलेली प्रभावळ १.४७ मीटर झाली, म्हणजे ती ४२ सें.मी.ने घटली. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ अ आणि ७ आ यांमध्ये दिले आहे.

५ अ १ ई. प्रयोगाच्या त्रासदायक परिणामाचा कालावधी

डी.जे. रिमिक्स गाणी ऐकण्याचे थांबवल्यानंतर दोन्ही साधकांना त्यांच्या प्रयोगापूर्वीच्या स्थितीला यायला दीड घंटा लागला. याचा अर्थ या प्रयोगाचा त्रासदायक परिणाम त्यांच्यावर दीड घंटा टिकला. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ अ आणि ७ आ यांमध्ये दिले आहे.

५ आ. निरीक्षण २

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर दांडियाच्या वेळी लावण्यात येणारी राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकण्याचा परिणाम

५ आ १. निरीक्षणांचे विवेचन

५ आ १ अ. राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकल्यानंतर दोन्ही साधकांची नकारात्मक ऊर्जा वाढणेे

राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकणे, या दुसर्‍या प्रयोगापूर्वी साधकाच्या इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेसंदर्भात केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे ही नकारात्मक ऊर्जा त्याच्यात काही प्रमाणात होती. ही गाणी ऐकल्यानंतर मात्र स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे त्याच्यात नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे आली आणि तिची स्पंदने त्याच्यापासून ०.७ मीटर अंतरार्पंत होती. साधिकेच्या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणात प्रयोगापूर्वी १२० अंशाच्या कोनात उघडलेल्या स्कॅनरच्या भुजा ही गाणी ऐकल्यानंतर १५० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली; पण ती मोजता आली नाही. दोन्ही साधकांत अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या सर्व निरीक्षणांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ आ मध्ये दिले आहे.

५ आ १ आ. दोन्ही साधकांमध्ये प्रयोगाच्या आधी आणि नंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ आ मध्ये दिले आहे.)

५ आ १ इ. राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकल्यानंतर दोन्ही साधकांची प्रभावळ घटणे

या प्रयोगापूर्वी साधकाची १.७ मीटर असलेली प्रभावळ १.५३ मीटर झाली, म्हणजे ती १७ सें.मी.ने घटली, तर साधिकेची १.७५ मीटर असलेली प्रभावळ १.५२ मीटर झाली, म्हणजे ती २३ सें.मी.ने घटली. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ आ मध्ये दिले आहे.

५ आ १ ई. प्रयोगाच्या त्रासदायक परिणामाचा कालावधी

हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकण्याचे थांबवल्यानंतर दोन्ही साधकांना त्यांच्या मूळ स्थितीला यायला १ घंटा लागला. याचा अर्थ या प्रयोगाचा त्रासदायक परिणाम त्यांच्यावर १ घंटा टिकला. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ आ मध्ये दिले आहे.

५ इ. निरीक्षण ३

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील काही पारंपरिक गाणी ऐकण्याचा झालेला परिणाम

५ इ १ अ. राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पारंपरिक गाणी ऐकल्यानंतर साधकाची नकारात्मक ऊर्जा तेवढीच रहाणेे, तर साधिकेची घटणे

राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पारंपरिक गाणी ऐकणे, या तिसर्‍या प्रयोगापूर्वी साधकातील इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेमुळे स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या होत्या. ही गाणी ऐकल्यानंतर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली. साधिकेने ही गाणी ऐकण्यापूर्वी तिच्यातील इन्फ्रारेड या नकारात्मक ऊर्जेमुळे स्कॅनरच्या भुजा १२० अंशाच्या कोनात उघडल्या होत्या. ही गाणी ऐकल्यानंतर मात्र स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे तिच्यातील ती नकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात घटली. दोन्ही साधकांमध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या सर्व निरीक्षणांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ इ मध्ये दिले आहे.

५ इ १ आ. दोन्ही साधकांमध्ये प्रयोगाच्या आधी आणि नंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. (याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ इ मध्ये दिले आहे.)

५ इ १ इ. राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पारंपरिक गाणी ऐकल्यानंतर दोन्ही साधकांची प्रभावळ वाढणे

या प्रयोगापूर्वी साधकाची १.७० मीटर असलेली प्रभावळ १.९१ मीटर झाली, म्हणजे ती २१ सें.मी.ने वाढली, तर साधिकेची १.७९ मीटर असलेली प्रभावळ २.०२ मीटर झाली, म्हणजे ती २३ सें.मी.ने वाढली. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ इ मध्ये दिले आहे.

५ इ १ ई. प्रयोगाच्या चांगल्या परिणामाचा कालावधी

पारंपरिक गाणी ऐकण्याचे थांबवल्यानंतर दोन्ही साधकांना त्यांच्या मूळ स्थितीला यायला अनुमाने अर्धा घंटा लागला. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ७ इ मध्ये दिले आहे.

५ ई. प्रयोगातील राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील गाण्यांचा साधकांच्या प्रभावळीवर झालेला तुलनात्मक परिणाम (प्रमाण सें.मी.)

वरील सारणीवरून लक्षात येते की, राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी आणि हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकल्यावर दोन्ही साधकांची प्रभावळ न्यून झाली. हे त्या गाण्यांमुळे त्यांच्यावर त्रासदायक परिणाम झाल्याचे लक्षण आहे. चित्रपटांतील गाण्यांपेक्षा डी.जे. रिमिक्स गाण्यांमुळे त्रासदायक परिणाम अधिक प्रमाणात झाला. याउलट राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पारंपरिक गाणी लावल्यावर दोन्ही साधकांची प्रभावळ वाढली. हा त्या पारंपरिक गाण्यातून चांगली स्पंदने मिळाल्याचा परिणाम आहे.

 

६. निष्कर्ष

राधा आणि श्रीकृष्ण यांच्यावरील डी.जे. रिमिक्स गाणी ऐकणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक हानीकारक आहे, हल्लीच्या चित्रपटांतील गाणी ऐकणे त्या तुलनेने आध्यात्मिकदृष्ट्या अल्प हानीकारक आहे, तर पारंपरिक गाणी ऐकणे त्या तुलनेने आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे, हे या चाचणीतून लक्षात येते.

७. निष्कर्षांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण – डी.जे. रिमिक्स गाणी सर्वाधिक तमोगुणी असणे, त्या तुलनेत हल्लीच्या चित्रपटांतील गाणी अल्प तमोगुणी असणे, तर पारंपरिक गाणी रजोगुणी असणे

७ अ. डी.जे. रिमिक्स गाणी ऐकणे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवर हानीकारक असणे

हल्ली दांडियाच्या वेळी लावण्यात येणार्‍या रिमिक्स केलेल्या गाण्यांमध्ये मूळ संगीताची मोड-तोड केलेली असते, तर घातलेला नवीन सूर-ताल शास्त्रीय संगीताला धरून नसतो. रिमिक्स केलेल्या गाण्यांमध्ये असलेले पाश्‍चात्त्य संगीत तमोगुणी असते. त्यामुळे अशा संगीतातून त्रासदायक स्पंदने मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होतात, तसेच असे संगीत लावल्यावर वातावरण आणि ते ऐकणारे यांमध्ये त्रासदायक स्पंदने आकर्षित होतात. या त्रासदायक स्पंदनांचे ऐकणार्‍याभोवती आवरण निर्माण होऊन त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवर त्रास होऊ शकतात.

७ आ. डी.जे. रिमिक्स गाण्यांपेक्षा हल्लीच्या चित्रपटांतील गाणी अल्प
प्रमाणात तमोगुणी असली, तरी दोन्ही गाण्यांमुळे ती ऐकणार्‍यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नसणे

वरील कारणांमुळे डी.जे. रिमिक्स गाणी ऐकणे या पहिल्या प्रयोगानंतर दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा वाढली आणि प्रभावळ न्यून झाली. दोन्ही साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असल्याने गाण्यांतील तमोगुणामुळे त्यांच्यातील त्रासदायक स्पंदने अधिक वाढली. त्यामुळे या संगीताचा परिणाम त्यांच्यावर सर्वाधिक काळ टिकला. रिमिक्स गाण्यांच्या तुलनेत दुसर्‍या प्रयोगातील हल्लीच्या चित्रपटांतील गाणी अल्प तमोगुणी असल्याने ती गाणी ऐकल्यानंतर दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जेतील वृद्धी पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत अल्प होती, तसेच प्रभावळीतील घटही तुलनेने अल्प होती. त्यामुळेच संगीताचा परिणामही पहिल्या प्रयोगातील संगीतापेक्षा अल्प काळ टिकला. पहिल्या आणि दुसर्‍या प्रयोगांतील गाणी तमोगुणी असल्याने साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याचा प्रश्‍नच नाही.

७ इ. पारंपरिक गाण्यांतून थोड्या प्रमाणात सकारात्मक स्पंदने मिळत असणे

तिसर्‍या प्रयोगातील पारंपरिक गाणी रजोगुणी असल्याने ती ऐकल्यानंतर साधकातील नकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली (आधीच्या दोन प्रयोगांप्रमाणे वाढली नाही), तर साधिकेतील न्यून झाली, तसेच दोघांच्याही प्रभावळीत वृद्धी झाली. साधकांची प्रभावळ वाढणे आणि साधकांतील नकारात्मक ऊर्जा घटणे किंवा तेवढीच रहाणे, हे या संगीतातून थोड्या प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाल्याचे लक्षण आहे. दोन्ही साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असल्याने या थोड्या प्रमाणातील सकारात्मक स्पंदनांचा परिणाम त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा  निर्माण होण्याइतपत झाला नाही. या सकारात्मक स्पंदनांचा परिणाम त्यांच्यावर थोडा वेळ (अर्धा घंटा) टिकला.

 

८. दांडियाप्रेमींना आवाहन – भारतीय शास्त्रीय संगीताचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

पाश्‍चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर भारतीय शास्त्रीय संगीतात अंतःकरणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे, असे भारतीय शास्त्रीय संगीताविषयी म्हटले जाते. भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आध्यात्मिक आहे. त्यामुळे त्यात सात्त्विक स्पंदने निर्माण करण्याची क्षमता आहे. ते ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. असे संगीत श्रोत्यांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (संगीत विशारद)

संगीतावर आधारित विविध वैज्ञानिक प्रयोगांतून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे रोगचिकित्सा करण्यात भारतीय संगीत इतर संगीतांपेक्षा अधिक प्रभावशाली आणि उपयोगी आहे, तसेच या संगीताच्या माध्यमातून मनुष्य तणावमुक्त होऊ शकतो, या निष्कर्षांपर्यंत विज्ञानातील संशोधक पोहोचले आहेत. अद्याप विज्ञानाची झेप इथपर्यंतच आहे; परंतु सात्त्विक संगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक स्तरावरही लाभ होऊ शकतो, हे या प्रयोगातून स्पष्ट होते. नवरात्रीत नेहमीच्या तुलनेत देवीतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या देवीतत्त्वाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सात्त्विक संगीताच्या तालावर गरबा किंवा दांडिया यांच्या माध्यमातून देवीची उपासना करण्याची प्रेरणा दांडियाप्रेमींना होवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

– आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (२८.९.२०१७)

ई-मेल : [email protected]