‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेविका, सनातन संस्था

मुंबई येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक आध्यात्मिक
बळ केवळ साधनेनेच मिळू शकते ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक बळ साधना केल्यानेच मिळू शकते. आध्यात्मिक बळ मिळून यशस्वी झाल्याची दोन उदाहरणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडव. हे आपले आदर्श आहेत. हिंदु धर्म हा ज्ञान-शक्तीच्या आधारावर कार्यरत आहे. त्यामुळे आज अनेक विदेशी नागरिक भारतात येऊन हिंदु धर्माचा अभ्यास करून ज्ञान घेत आहेत आणि त्यांच्या देशात जाऊन हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत.

१. श्री. सागर चोपदार २. श्री. सुनील घनवट ३. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर ४. सौ. नयना भगत यांच्या समवेत उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना धर्मप्रेमी

जोगेश्‍वरी (मुंबई) :  आनंदी जीवनासाठी ‘साधना’ आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘ईश्‍वराचे अधिष्ठान’ असणे अत्यंत आवश्यक आहे. ‘गुरुकृपायोगानुसार साधना हा हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्रीराम मंदिर वैष्णवाश्रम ट्रस्टच्या सभागृहात २३ आणि २४ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी मुंबई आणि ठाणे येथील ३० धर्मप्रेमी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. किशोर औटी आणि श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

१. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी साधनेचे महत्त्व, अष्टांगसाधनेद्वारे ईश्‍वरप्राप्ती कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले.

२. दुसर्‍या दिवसाच्या सत्रामध्ये अनिष्ट शक्ती, त्याद्वारे होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आध्यात्मिक त्रास कसे ओळखावेत, त्यांची लक्षणे, त्यांवर मात करण्यासाठी करावयाचे आध्यात्मिक उपाय यांविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सौ. वेदिका पालन यांनी मार्गदर्शन केले.

३. ‘हिंदु राष्ट्र संघटकाची आचारसंहिता कशी असावी ?; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ?; सामाजिक संकेतस्थळाचा प्रभावी वापर कसा करावा; स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत भ्रष्टाचार, भेसळ आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढा कोणत्या मार्गाने द्यायचा, या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

सत्कार :   कार्यशाळेसाठी सभागृह उपलब्ध करून देऊन सर्वतोपरी सहकार्य करणारे श्रीराम मंदिर वैष्णवाश्रम ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. मधुसूदन द्विवेदी यांचा सत्कार श्री. सुनील घनवट यांनी केला.

धर्मप्रेमींचा धर्मकार्यात उत्स्फूर्त सहभाग

१. स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत भ्रष्टाचार भेसळ आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढा देण्याची धर्मप्रेमींनी सिद्धता दर्शवली.

२. धर्मप्रेमींनी १० धर्मसभांचे आयोजन करण्याचे ध्येय ठेवलेे. तसेच प्रत्येक मासाला ४ राष्ट्रीय हिंदू आंदोलनांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले.

३. १३ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरवण्यात आले.

४. धर्मप्रेमींनी ९ ठिकाणी धर्मशिक्षण आणि राष्ट्रपुरुष-क्रांतीकारक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्याचे निश्‍चित करण्यात आले.

क्षणचित्रे

१. कार्यशाळेच्या विविध सेवा धर्मप्रेमींनी दायित्व घेऊन केल्या.

२. लोलकाच्या प्रयोगाद्वारे एखाद्या वस्तूमधील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने कशी ओळखायची, हे प्रयोगासहित दाखवण्यात आले.

३. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी गटचर्चा झाली.

४. हिंदु राष्ट्रामधील आचारसंहितेचा विषय चालू असतांना आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनण्यासाठी अनेक धर्मप्रेमींनी स्वत:कडून झालेल्या चुका प्रामाणिकपणे सांगितल्या आणि क्षमायाचनाही केली.

५. कार्यशाळेत शांत निद्रेसाठी खोक्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

६. हितचिंतक सर्वश्री उमेश साटम, नाना सप्रे, अनिल कोटियान, मधुकर शेट्टी आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. रवी सोनी यांनी कार्यशाळेसाठी अल्पाहार आणि भोजन यांची सोय केली.

धर्मप्रेमींना आलेले अनुभव

१. एका प्रयोगात वस्तूतील नकारात्मक स्पंदने ईश्‍वराला प्रार्थना केल्यावर सकारात्मक झाली. यावरून प्रार्थनेचे महत्त्व लक्षात आले. – एक धर्मप्रेमी (अध्यात्म हे शास्त्र आहे. प्रार्थना केल्यावर धर्मप्रेमीला तशी प्रचीतीही आली. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. भावजागृतीच्या प्रयोगानंतर सभागृहामध्ये देवाचे अस्तित्व जाणवले. – श्री. ब्रिजेश शुक्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन हे सत्र आवडले. प्रक्रिया राबवल्यास चांगला मनुष्य होऊन सदैव आनंदी जीवन जगता येते, हे शिकायला मिळाले. – श्री. संदेश घाडीगावकर

४. व्यवहारामध्ये व्यक्तीमत्त्व विकासासाठी लाखो रुपये खर्च करूनही जे शिक्षण मिळत नाही, ते शिक्षण आम्हाला विनामूल्य देत असल्याने मी हिंदु जनजागृती समितीचा अत्यंत ऋणी आहे. – श्री. राहुल भुजबळ

५. प्रत्येक कृती ही साधना म्हणून करायला हवी, हे शिकायला मिळाले. – श्री. श्रीराम यादव

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात