राज्यघटनेचा अर्धवट अभ्यास करणार्‍यांनी ‘हिंदु राष्ट्राची मागणी संविधानिकच आहे’, हे लक्षात घ्यावे ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

फोंडा, गोवा येथील २ दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’

कार्यशाळेत मार्गदर्शन केलेले १. श्री. संगम बोरकर २. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, ३. श्री. चेतन राजहंस, ४. डॉ. मनोज सोलंकी, ५. श्री. गोविंद चोडणकर ६. श्री. जयेश थळी आणि धर्मप्रेमी

रामनाथी (फोंडा) : साधनेचे महत्त्व लक्षात आल्यामुळे आम्ही अंतर्मुख झालो आहोत. स्वभावदोष आणि अहं निमूर्लन प्रक्रिया आमच्यासाठी उपयुक्त असून ती नियमितपणे राबवून आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनण्याचा प्रयत्न करू, असा निर्धार येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’तील धर्मप्रेमींनी केला. २३ आणि २४ सप्टेंबर या कालावधीत गोवा राज्यस्तरीय ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनीही कार्यशाळेत सहभागी धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मप्रेमींकडून मानसरित्या श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन तिचे दर्शन घेण्याविषयीचा भावप्रयोग करवून घेतला.

 

पहिला दिवस

राज्यघटनेचा अर्धवट अभ्यास करणार्‍यांनी ‘हिंदु राष्ट्राची
मागणी संविधानिकच आहे’, हे लक्षात घ्यावे ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

‘हिंदु राष्ट्र’ हे ‘संविधानिक’ कि ‘असंविधानिक’ असा प्रश्‍नच निर्माण होऊ शकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे कोणतेही परिवर्तन करण्यास राज्यघटनेने पूर्णत: स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे राज्यघटनेचा अर्धवट अभ्यास करणार्‍यांनी ‘हिंदु राष्ट्राची मागणी संविधानिकच आहे’, हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी भारतावर लादलेल्या आणि पाश्‍चात्त्य विचारांवर आधारित असलेल्या लोकशाहीमुळे देश तीव्र अधोगतीच्या दिशेने जात आहे. लोकशाहीच्या नावावर जनतेवर चालू असलेला अन्याय दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही. संत द्रष्टे असल्याने ‘कालगतीनुसार काय करावे ?’ याविषयी मार्गदर्शन करू शकतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०२३ मध्ये ‘ईश्‍वरी राज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल, हा विचार पूर्वीच मांडला होता. त्यामुळे त्यांच्यासारख्या महान संतांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून प्रयत्न करणे, ही आपली साधना आहे.

समष्टी सेवा निष्काम भावातून करणे आवश्यक ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे ही काळानुसार साधना आणि समष्टी सेवा आहे. ती निष्काम भावाने केल्यास निश्‍चितच आनंद मिळेल. कलियुगात साधनेसाठी ‘गुरुकृपायोग’ हा विहंगम मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली, त्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्न करायचे आहेत.

क्षणचित्रे

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनानंतर धर्मप्रेमींना ‘निष्काम साधनेने आनंद कसा मिळवायचा, हे लक्षात आले. ‘आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करू’, असे धर्मप्रेमींनी सांगितले.

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या भावप्रयोगानंतर अनेकांना ‘प्रत्यक्ष श्री शांतादुर्गादेवी समोर उभी असल्याची अनुभूती आली.

 

दुसरा दिवस

कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवसाच्या सत्राला आरंभ करतांना धर्मप्रेमींकडून कुलदेवतेचा नामजप करून घेण्यात आला. या वेळी ‘कुलदेवतेच्या मंदिरातील गाभार्‍यात बसून नामजप करत आहोत’, अशी अनुभूती काहींनी घेतली. सनातन संस्थेचे संगम बोरकर आणि श्री. चेतन राजहंस यांनी ‘स्वभावदोष निर्मूलनासाठी सारणी लिखाण, तसेच स्वयंसूचना बनवण्याची पद्धती’ यांविषयी मार्गदर्शन केले, तर हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी ‘हिंदु संघटकांची आचारसंहिता काय असावी ?’ याविषयी अवगत केले. त्याचप्रमाणे ‘सध्याच्या काळात महत्त्व प्राप्त झालेल्या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसार कसा करावा ?’, यांसह अन्य विषयांवर तात्त्विक आणि प्रायोगिक मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून कार्यशाळेची सांगता झाली.

 

क्षणचित्रे

१. ‘स्वभावदोष निर्मूलनासाठी सारणी लिखाण आणि स्वयंसूचना’ या सत्राच्या वेळी धर्मप्रेमींनी स्वत:कडून होत असलेल्या चुका सांगितल्या, तसेच चुकांमागील मूळ स्वभावदोष कसा शोधावा ? यांविषयी जिज्ञासेने जाणून घेतले.

२. कार्यशाळेत ‘वक्ता म्हणून विषय कसा मांडावा ?’ हा प्रायोगिक भाग घेण्यात आला. त्या वेळी धर्मप्रेमी उत्साहाने त्यात सहभागी झाले. ‘आम्ही प्रथमच एखाद्या व्यासपीठावर बोललो. कार्यशाळेतील मार्गदर्शनामुळे आमच्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. इथून पुढे समाजात जाऊन विषय मांडू शकतो’, असे सांगितले.

धर्मप्रेमींचे मनोगत

१. श्री. माधव विर्डीकर, मडगाव – साधना केल्यामुळे आपण अनेक कठीण प्रसंगांना सहजपणे सामोरे जाऊ शकतो, हे लक्षात आले. साधना म्हणून प्रतिदिन देवाला प्रार्थना करणार आणि गुण आत्मसात करणार. हिंदु राष्ट्र संघटक बनण्याची संधी मिळाली आता अधिक वेळ देऊन कार्य करणार.

२. सौ. हेमश्री गडेकर, म्हापसा – अशा कार्यशाळा गावागावांमध्ये झाल्या पाहिजेत. त्यामुळे हिंदू जागृत होतील. पहिल्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून मला चैतन्य मिळत आहे, असे जाणवले.

३. उमेश पाटील, साखळी – साधना समजून घेतांना ‘मी भगवंताच्या अगदी जवळ आहे’, असे वाटले. निष्काम भावाने हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करणार.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात