गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात धर्मप्रेमींकडून दान केलेल्या गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

ट्रॅक्टरमधून गणेशमूर्ती नेऊन त्यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करतांना एकता तरुण मंडळाचे कार्यकर्ते

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : तालुक्यातील मुगळी गावात महाविद्यालयीन तरुणांनी गणेशभक्तांना फसवून दान म्हणून घेतलेल्या ६५ ते ७० गणेशमूर्ती आणि १ ट्रॉली निर्माल्य ३ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता नदीत विसर्जन केले. धर्मप्रेमी सर्वश्री शरद कुराडे, बसवराज हुल्लोळी, उत्तम माने, अक्षय पालखे, अमित ताराळ, विशाल कांबळे, जगदीश माठपती, अमर महाडिक, शंकर माने, आकाश धनवडे, तसेच भगवा रक्षक मंडळ आणि सनातनच्या साधिका सौ. सरिता धुळाज असे सर्वजण या मोहिमेत सहभागी झाले होते. (धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

नूल या गावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिरण्यकेशी नदीत मुबलक पाणी नसल्याने एकता तरुण मंडळाकडून गणेशभक्तांना साहाय्य करण्यासाठी टॅ्रक्टरचे नियोजन करून त्यामध्ये भावपूर्णरित्या मूर्ती ठेवण्यात आल्या. गावापासून दूर असलेल्या नदीतही सर्वांनी भावभक्तीने मूर्ती विसर्जन केले. मूर्तीदानाद्वारे धर्मद्रोह करणार्‍यांसमोर त्यांनी आदर्श ठेवला. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. (एकता तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

 

हिंदूंनो, असा धर्मद्रोह करणार्‍यांना वेळीच खडसवा !

दान म्हणून घेतलेल्या गणेशमूर्ती पडक्या विहिरीत घाण साचलेल्या पाण्यात टाकल्या

शिंदेवाडी गावात पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत यांनी भक्तांकडून नदीमध्ये मूर्ती विसर्जन करून देणार असल्याचे सांगून दान घेतलेल्या मूर्ती एका पडक्या विहिरीत अनेक वर्षांपासून घाण साचलेल्या पाण्यात वरून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे गणेशमूर्तींची विटंबना झाली. चन्नेकुपी गावात ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांनी भाविकांकडून फसवून दान म्हणून घेतलेल्या गणेशमूर्ती भीमराव चिखलकर यांच्या पडक्या विहिरीत ट्रॅक्टरने डंप करून वरून टाकल्याने मूर्तीचे अवयव तुटून पडले. यामुळे श्रीगणेशाची विटंबना झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात