साधनेत प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन हाच एकमेव पर्याय ! – श्री. संदीप शिंदे, सनातन संस्था

रत्नागिरी येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन

डावीकडून श्री. संदीप शिंदे, श्री. सुनील घनवट, श्री. विनोद गादीकर आणि बोलतांना श्री. संजय जोशी

रत्नागिरी : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ही ख्रिस्ती राष्ट्रे होऊ शकतात; पाकिस्तान, बांगलादेश ही इस्लामी राष्ट्रे्र होऊ शकतात, तर बहुसंख्य हिंदू असलेला भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून आपल्याला घटनेने दिलेल्या अधिकारानुसार हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा आपला संविधानिक अधिकार आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

कार्यशाळेला उपस्थित धर्मप्रेमी घोषणा देतांना

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘भारताला आदर्श राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीरामापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि सम्राट चंद्रगुप्तापासून ते महाराज रणजितसिंहापर्यंत सहस्रो वर्षांचा वैभवशाली अन् गौरवशाली इतिहास आहे. आपल्याकडे आदर्श राज्यव्यवस्थांचा इतिहास असतांना स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी सगळीकडे भ्रष्टाचार, अनाचार, वाढती गुन्हेगारी, अल्पसंख्य तुष्टीकरण, हक्क-आरक्षण हेच नजरेस पडत आहे. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले शासनकर्ते असूनही अशी अधोगती वेगाने चालू आहे, यासाठी लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरोधी लढा देणे आवश्यक आहे, हा समष्टी साधनेचा भाग आहे.

समाजाशी संपर्क करतांना आपले व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक आहे. यासाठी आपले आचरण, वागणे-बोलणे आदर्श असणे आवश्यक आहे. सामाजिक कार्याला स्वभावदोष आणि अहंनिर्मूलनाची जोड दिल्यास आपले आचार-विचार, चालणे-बोलणे, हे आदर्श होऊन निश्‍चितपणे आपण रामराज्यासाठी पात्र होऊ. एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला संघटक चांगले संघटन करू शकतो आणि चांगले संघटनच हिंदु राष्ट्राची पायाभरणी आहे.’’

साधनेत प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन
हाच एकमेव पर्याय ! – श्री. संदीप शिंदे आणि सौ. पल्लवी लांजेकर

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधना करणे आवश्यक असून आपण कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया आवश्यक आहे. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती हे साधनेचे ध्येय आहे. प्रत्येकाने कार्य करतांना व्यष्टी साधनेची जोड देऊन कार्य कसे करायला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. संदीप शिंदे आणि सौ. पल्लवी लांजेकर यांनी केले.

सामाजिक प्रसार माध्यमांचा उपयोग करून आधुनिक माध्यमांतून काळानुसार धर्मप्रसार करणे, का आवश्यक आहे, याविषयी समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर यांनी मार्गदर्शन केले आणि कार्यशाळेत आलेल्या धर्मप्रेमींचे आभार व्यक्त केले.

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेची सांगता धर्मप्रेमी कु. श्रृतिका घोरपडे यांनी गायलेल्या संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गीताने झाली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. परेश गुजराथी आणि कु. स्नेहा जोशी यांनी केले.

धर्मप्रेमींचे मनोगत

१. श्री. सुरेश उदेग : कार्यशाळेत सहभाग घेतल्यावर मनाची ताकद आणि कार्यक्षमता वाढली.

२. कु. मानसी वाडेकर : कार्यशाळेत सगळ्यांना सहभागी करून घेतल्याने आम्हाला शिकायला मिळाले. कार्यशाळा आणखी एक दिवस असती, तर अजून शिकता आले असते.

३. श्री. सिद्धार्थ खिल्लारे : आदर्श हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कसे वागले पाहिजे, बोलले पाहिजे हे आम्हाला शिकायला मिळाले. आम्ही त्याप्रमाणे वागण्याचा पुढे प्रयत्न करू.

४. श्री. सचिन सकपाळ : हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य हे स्वत:साठी आहे. प्रथम आपण साधना केली पाहिजे, ईश्‍वरप्राप्तीसाठी काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव निर्माण झाली.

५. कु. श्रृतिका घोरपडे : कार्यशाळेत आल्यावर खूप चैतन्य जाणवले. यापुढे छोट्या-छोट्या स्तरावरील कृतींच्या माध्यमातून हिंदूसंघटन करणार.

६. श्री. प्रकाश कोंडसकर : दोन दिवस शिकवणीवर्ग बंद ठेवून कार्यशाळेला आल्याचे सार्थक झाले, असे लक्षात आले. प्रेमभाव निर्माण झाल्यावर आपण जास्तीतजास्त लोकांचे संघटन करू शकतो, हे कळले.

७. कु. शीतल पाध्ये : कार्यशाळेत आल्यानंतर आत्मविश्‍वास वाढला. कार्यशाळेत मिळालेल्या माहितीनुसार इतरांच्या सहकार्यानेही आपण हिंदुत्वाचे कार्य आदर्श आणि जलदगतीने करू शकतो, हे शिकायला मिळाले.

८. श्री. प्रशांत करंबेळे : आपण घरी असतांना साधना करतो; मात्र छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कसे चुकतो हे लक्षात येत नव्हते. कार्यशाळेला आल्यामुळे ते लक्षात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात