धर्मकार्य करत असतांना साधना करणे आवश्यक आहे ! – रमानंद गौडा, कर्नाटक राज्य धर्मप्रसारसेवक, सनातन संस्था

उडुपी (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या २ दिवसीय हिंदु
राष्ट्र संघटक कार्यशाळेतून हिंदु धर्माभिमान्यांनी धर्मरक्षणाचा केला निर्धार !

कार्यशाळेत व्यासपिठावर उपस्थित डावीकडून श्री. मोहन गौडा (धर्माभिमान्यांना संबोधित करतांना), श्री. विजय कुमार, सौ. शोभा आणि श्री. रमानंद गौडा

उडुपी (कर्नाटक) : मागील ७० वर्षांत देशात जनतेला सुराज्य देण्यात लोकराज्य संपूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाच्या उन्नतीसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यासाठी वैचारिक स्तरावर संघर्ष करावा लागेल. सध्या हिंदुत्वासाठी ध्रुवीकरणाचा काळ आहे. काळानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. धर्मकार्य करत असतांंना आपल्याला साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारसेवक श्री. रमानंद गौडा यांनी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींना संबोधित करतांना केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उडुपी येथील श्री उमामहेश्‍वर देवस्थानामध्ये दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्याशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला श्री. रमानंद गौडा यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्रा मोगेर, बेंगळुरूचे समिती समन्वयक श्री. मोहन गौडा आणि उत्तर कन्नड जिल्हासेविका सौ. शोभा आदींनी संबोधित केले. या कार्यशाळेत उडुपी, कर्कल, मूडबिद्रे, सिद्धापूर आणि उत्तर कन्नड येथील २६ धर्मप्रेमी सहभागी झाले.

क्षणचित्रे

१. या कार्यशाळेत समाजात धर्मप्रसार कसा करायचा आणि कायद्याच्या चौकटीत राहून धर्मरक्षणाची कृती कशी करायची, यांविषयी प्रायोगिक भाग घेण्यात आला.

२. गुरुकृपायोगानुसार साधना कशी करायची, यासंदर्भात सांगतांना स्वभावदोष निर्मूलन आणि अहंनिर्मूलन यांविषयी माहिती देण्यात आली.

३. या कार्यशाळेत २० हिंदु धर्मजागृती सभा, २२ धर्मशिक्षणवर्ग आणि २ ठिकाणी राष्ट्रीय हिंदु आंदोलनांचे नियोजन करण्याचे ठरले.

४. श्री. रंजन सुवर्ण यांची भारतीय नागरिक सेवेची परिक्षा असतांनाही ते कार्यशाळेत सहभागी झाले.

५. समितीच्या कार्यकर्त्यांचा सेवाभाव पाहून सभागृहाच्या मालकांनी कोणत्याही सेवेत सहभागी होऊन साहाय्य करू, असे सांगितले.

धर्मप्रेमींचे मनोगत

१. ‘कार्यशाळेत आत्मविश्‍वास वाढला. या कार्यशाळेत जीवनातील ८० टक्के समस्यांचे उत्तर मिळाले.’ – श्री. रंजन मल्पे, श्री. रवि कुमार आणि श्री. दयानंद पित्रोंडी

२. ‘कार्यशाळेत चैतन्य जाणवले. आम्ही सर्व एकाच घरातील सदस्य आहोत, असे वातावरण होते. सेवा, प्रारब्ध यांविषयी सांगणारी हिंदु जनजागृती समिती एकमेव संस्था असावी, असे वाटले.’ – श्री. विजय आणि श्री. रविन्द्र आचार्य

३. ‘साधनेविषयी माहिती मिळाली. धर्मप्रसार करण्याची इच्छा निर्माण झाली. धैर्य वाढले.’ – श्री. गिरीश

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात