नागपूर मेट्रोच्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट तात्काळ रहित करा !

राजगुरुनगर (पुणे) येथे राष्ट्रप्रेमी
अन् हिंदुत्वनिष्ठ यांची आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी

आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ

राजगुरुनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मेक इन इंडिया, स्कील इंडिया यांसारख्या कार्यक्रम राबवत आहेत. या माध्यमातून भारतात उत्पादन करा, तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाला विकसित करा, या तत्त्वांना सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. असे असतांना नागपूर मेट्रोच्या ६९ डब्यांचे ८५१ कोटी रुपयांचे कंत्राट चिनी आस्थापनाला देण्यात आले आहे. असे करून शासनाने एकप्रकारे पंतप्रधानांच्या संकल्पनेलाच हरताळ फासला आहे. याचसमवेत सध्या भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव असून चीन सातत्याने भारताला धमकावत आहे. या स्थितीत चीनला व्यापाराची नवी दालने खुली करून देणे अत्यंत घातक आहे. याउलट चीनच्या हेकेखोरपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत शासनाने चिनी उत्पादनांवर बहिष्कार आणि स्वदेशीला प्रोत्साहन हे धोरण राबवावे अन् मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचे कंत्राट तात्काळ रहित करावे, अशी मागणी राष्ट्रप्रेमी आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे केली. हे आंदोलन २० ऑगस्ट या दिवशी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आले.

या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे श्री. नवनाथ पाचर्णे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि सनातन संस्थेचे श्री. दिलीप शेटे यांसह ५० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. श्री. पाचर्णे यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांना पाठिंबा असल्याचे मार्गदर्शनामध्ये सांगितले, तर सर्वश्री नागेश जोशी आणि दिलीप शेटे यांनीही आंदोलनाच्या मागण्यांनुरूप मार्गदर्शन केले.

आंदोलनाच्या वेळी करण्यात आलेल्या मागण्या

१. समलैंगिकतेस प्रोत्साहन देणाऱ्यां आणि वीर हनुमानाच्या मुद्रेत समलैंगिक नायकाला दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यां का बॉडीस्केप्स या मल्याळी चित्रपटावर बंदी आणावी.

२. आतंकवादाला खतपाणी घालणारा फरार आतंकवादी डॉ. झाकीर नाईक आणि त्याची बंदी घातलेली इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन यांचे फेसबूक अकाऊंट त्वरित बंद करावे.

३. भोसरी (पुणे) येथील इंद्रायणीनगरमधील प्राधिकरण परिसरात अज्ञात व्यक्तींनी गाभण गायीची निर्घृण हत्या केली. त्या गायीची हत्या करणाऱ्यां धर्मांधांचा त्वरित शोध घेऊन कारवाई करावी.

४. केरळ आणि कर्नाटक येथे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात येत आहेत. हत्या करणारे धर्मांध, त्या करवून घेणारे सूत्रधार आणि ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करावी. तेथील हिंदु नेत्यांना तात्काळ सर्वत्र सुरक्षा पुरवावी.

विशेष

राजगुरुनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार यांनी सांगितले की, तुमचे आंदोलन चांगले वाटले. असे आंदोलन यापूर्वी मी पाहिले नव्हते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात