सर्व हिंदुत्वनिष्ठांनी अहंकार त्यागून हिंदुत्वासाठी संघटित व्हावे ! – सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

नांगनूर (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मप्रेमींच्या पुढाकाराने व्याख्यानाचे आयोजन

मार्गदर्शनाला ५० हून अधिक धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कार्यक्रमात धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना (मध्यभागी) सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर –  सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आपल्यातील अहंकार त्यागून हिंदुत्वासाठी संघटित व्हायला हवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे कुलदेवतेची उपासना करून ईश्‍वराची इच्छा म्हणून धर्मकार्य करायला हवे, असे मार्गदर्शन सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी नांगनूर येथे केले. निपाणी परिसरातील नांगनूर येथे २१ ऑगस्टला धर्मप्रेमींच्या पुढाकाराने नांगनूर (तालुका गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील श्री अंबिका देवस्थान मंडळाच्या सभागृहात साधनेचे महत्त्व या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेच्या विविध पैलूंविषयी धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नांगनूर, निपाणी, जत्राट, मत्तीवडे, बारभाई, यमगर्णी, ममदापूर, बुधियाळ, हारगापूरगड, एकसंभा आणि संकेश्‍वर या गावांतील ५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

१. कार्यक्रमाच्या प्रारंभी नांगनूर येथील धर्मप्रेमी श्री. सातप्पा परीट (गुरुजी) प्रस्तावना करतांना म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून धर्मकार्य करत आहे; मात्र या कार्याला योग्य दिशा देण्याचे कार्य गावामध्ये २ मासांपूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू झालेल्या धर्मशिक्षण वर्गातून मिळाले आहे. तसेच या धर्मशिक्षण वर्गातून मिळालेल्या आध्यात्मिक ज्ञानानुसार आम्ही या वर्षी सनातनच्या मार्गदर्शनानुसार ५ श्रीगणेशमूर्ती बनवून घेतल्या आहेत. गणेश चतुर्थीला आम्ही सामूहिकरित्या पारंपरिक पद्धतीने श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत.

२. या वेळी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी आनंदी जीवनासाठी साधनेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.

३. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेस धर्मप्रेमी श्री. राजू कल्लोळे आणि श्री. अमोल चेंडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. अमोल चेंडके यांनी कार्यक्रमासाठी साहाय्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे आभार मानले.

४. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले.

 

सहकार्य

या कार्यक्रमानंतर श्रावणी भोजन अन्नदानासाठी वारकरी संप्रदाय (नांगनूर), स्वप्नपूर्ती फर्निचरचे श्री. संतोष पाटील आणि श्री. दादासो जनवाडे, धर्मप्रेमी सर्वश्री विजय परीट, सागर चेंडके, आप्पासो कोगले, शंकर खदरे, सुरेश बेनाडे, डॉ. महादेव परीट यांनी सहकार्य केले. तसेच अंबिका यात्रा समितीने कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाच्या छायाचित्रांसाठी विनायक डिजीटल (नांगनूर) यांनी सहकार्य केले. (धर्मप्रेमींनी कार्यक्रमाला सहकार्य केल्याविषयी हिंदु जनजागृती समितीने सर्वांचे आभार मानले आहेत.)

 

धर्मप्रेमींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१.  श्री. प्रवीण चव्हाण (बुधियाळ) – सद्गुरु (कु.) स्वातीताई मार्गदर्शन करत असतांना मला त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हेच दिसत होते. त्यांचे तेज इतके होते कि मला ते सहन होत नव्हते. अनेक वेळेस आपोआप माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. माझ्या अंगावर कार्यक्रम संपल्यावरही शहारे येत होते आणि कंपन जाणवत होते.

२.  श्री. विजय पवार (नांगनूर) – काही दिवसांपूर्वी माझे वडील वारले, तेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता; मात्र श्री. अमोल चेंडके यांनी सांगितल्याप्रमाणे मी श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला आणि त्यानंतर लगेचच तेथे अनेक कावळे आले आणि पिंडाला लगेच कावळा शिवला. (वरीलप्रमाणेच अनुभूती मागच्या काही दिवसांत गावातल्या २-३ धर्मप्रेमींनी घेतली आहे.)

३.  श्री. राजू कल्लोळे (जत्राट) – कार्यक्रम चालू असतांना सद्गुरु (कु.) स्वातीताई आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांच्या माध्यमातून नांगनूर गावाचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी हिनेच हे अमूल्य ज्ञान आम्हाला दिले असल्याचे जाणवले.

४.  श्री. अमोल चेंडके (नांगनूर) – मागील १२ वर्षे मी धर्मकार्य करत आहे; मात्र ज्या वेळेस रामनाथी गोवा येथे हिंदू संघटक कार्यशाळेला जाण्याची संधी मिळाली, तेव्हापासून ते आतापर्यंत खूप कार्य केले; मात्र साधना केली नाही. साधना केल्यानेच यशस्वी होऊ शकतो, याची तीव्रतेनी जाणीव झाली. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले या दोन गुरूंचे आशीर्वाद मिळाले, असे जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात