आजार दूर होण्यासाठी एरंडेल तेलाचा दिवा सतत तेवत ठेवण्याचा दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितलेला उपाय

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची शिकवण

१. विविध गोष्टींवर सांगितलेले विविध उपाय, ही हिंदु धर्मातील संत, सिद्ध यांची महानता !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

आपल्या हिंदु धर्मात विविध गोष्टींवर विविध उपाय सांगितलेले आढळतात. संत, गुरु, सिद्ध यांची परंपरा या भारतभूमीला लाभली आहे. परवाच गुरुतत्त्व नावाच्या मासिकात श्रीपाद श्रीवल्लभ, म्हणजे दत्ताचे पहिले अवतार यांनी आजारी माणसांसाठी सांगितलेला उपाय वाचला. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, व्यक्ती पुष्कळ आजारी असल्यास ती व्यक्ती असणार्‍या खोलीत एरंडेल तेलाचा दिवा सतत तेवत ठेवायचा. असे केल्याने तो आजार दूर होतो. हे वाचून हिंदु धर्मातील संतांची आणि सिद्धांची महानता लक्षात आली. त्यांना देवच उपाय सुचवतो. तसे उपाय श्रद्धेने केल्याने भाविक बरेही होत असत. अशी अनेक उदाहरणे पोथ्यापुराणांत आपल्याला पहावयास मिळतात.

२. एरंडेलाचे आयुर्वेदीय महत्त्व

एरंडाचे तेल वातशमन करणारे आहे. तसेच ते देहात साठलेल्या न पचलेल्या घटकांना शौचावाटे बाहेर ढकलणारेही आहे. ते देहातील वाताला खालच्या बाजूने दिशा देते, म्हणजेच ते यासंदर्भात कार्य करणार्‍या अपान वायूला जागृती देते. एरंडेल आमवाताचे निर्मूलन करणारेही असून उष्ण आहे.

३. एरंडेल तेलाच्या दिव्यामुळे रोगी बरा होण्याचे होत असलेले सूक्ष्मातील कार्य

एरंडेल तेलाच्या दिव्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजामुळे रोगीष्ट व्यक्तीभोवती असणारे त्या रोगासंबंधीचे वायूमंडल शुद्ध होण्यास साहाय्य होते. जेथे दिव्याची ज्योत असते, तेथे देवतांचे तत्त्व येतेच. वातावरणात दैवी स्पंदने आली की, देवतांच्या आशीर्वादाने रोगी लवकर बरा होतो. या ज्योतीतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म वायू रोग्याच्या शरिरात गेल्याने तो देहातील टाकाऊ वायूंना, तसेच टाकाऊ घटकांना देहातील विविध मार्गांद्वारे बाहेर काढतो. बरेच रोग पोट साफ नसल्यानेच निर्माण होतात. तसेच बरेचसे रोगी वायूमंडलाच्या अशुद्धतेमुळे बरे होत नाहीत. आमवाताचा विकार आणि अपचनाचा विकार यांंमध्ये कार्य करणारे सूक्ष्म जंतू एरंडेल तेलाच्या ज्योतीतून बाहेर पडणार्‍या तेजाने मारले जातात. एकदा का त्या त्या व्यक्तीच्या सभोवती असणार्‍या वायूमंडलातील, तसेच त्यांच्या देहातील ते ते रोग निर्माण करणारे सूक्ष्म जंतू मारले गेले की, त्या व्यक्तींना दिली जाणारी औषधेही लवकर लागू पडतात आणि त्या व्यक्ती लवकर रोगमुक्त होतात.

असे सोपे सोपे उपाय सांगणारे संत आणि सिद्ध यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.