राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असणारे हिंदु राष्ट्रच हवे ! – हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षणार्थ्यांची एकमुखी मागणी

कार्यशाळेत ‘ जीवनातील साधनेचे महत्त्व ‘ आणि ‘
गुरुकृपायोगानुसार साधना ‘ ह्या विषयांवर सनातन संस्थेचे मार्गदर्शन

डावीकडून कु. प्रतिभा तावरे, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. नागेश गाडे

सांगली – आजवर निधर्मी लोकशाहीमुळे राष्ट्रावर अनेक संकटे आली. यात प्रामुख्याने भ्रष्टाचार, आतंकवाद, शत्रूराष्ट्राची आक्रमणे, हिंदूंवर होणारी आक्रमणे, मंदिरांचे सरकारीकरण यांसह अन्य समस्यांचा समावेश आहे. ही स्थिती पालटण्यासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असणारे हिंदु राष्ट्रच हवे, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षणार्थींनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ आणि २० ऑगस्ट या दिवशी हरिदास भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी हा निर्धार करण्यात आला. कार्यशाळेत जिल्ह्यातील २७ कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘अनेक विषयांची मागणी करतांना फलक, तसेच प्रोजेक्टरचा वापर केल्याने विषय समजणे सुलभ गेले’, असे अनेकांनी सांगितले.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या  कु. प्रतिभा तावरे यांनी हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश सांगितला. यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. नागेश गाडे यांनी जीवनातील साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सौ. वैशाली राजहंस यांनी भावजागृती कशी करावी, या संदर्भात उपस्थितांकडून प्रयोग करवून घेतला. यानंतर हिंदु संघटनांच्या प्रभावी उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. श्री. नागेश गाडे आणि श्री. सुनील घनवट यांनी हिंदु राष्ट्र संघटकांच्या आचार संहितेविषयी मार्गदर्शन केले. सद्गुरु (कु.) स्वाती खाडे, श्री. नागेश गाडे आणि डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी स्वभावदोष निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केले.

दुसर्‍या दिवशी झालेल्या प्रथम सत्रात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे आणि सौ. वैशाली राजहंस यांनी अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनीही त्यांच्या जीवनातील अनिष्ट शक्तींविषयीचे अनुभव कथन केले. दुपारच्या सत्रात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेत धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे विविध धार्मिक आघातांविषयी मनोगत व्यक्त केले. यानंतर आदर्श संपर्क कसा करावा, याचा प्रायोगिक भागही दाखवण्यात आला. सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांचा धर्मप्रसारासाठी कसा उपयोग करू शकतो, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यशाळेची फलनिष्पत्ती

जिल्ह्यात २० गावांत धर्मशिक्षणवर्ग, १३ धर्मजागृती सभा, तसेच २ ठिकाणी शौर्य जागरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त २ ठिकाणी फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात येणार आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना भेटून धर्मशिक्षण फलक प्रायोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.

 

धर्मप्रेमींचे मनोगत

समारोप सत्रात काही धर्मप्रेमींनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनीच आम्हाला घडवण्यासाठी इतके परिश्रम कधीच कुणी घेतले नव्हते. कार्य करतांना साधनेचा पाया कसा अत्यावश्यक आहे, याची जाणीव झाल्याचे सांगून संघटितभाव वृद्धींगत झाल्याचे सांगितले. अनेकांचा बोलतांना कृतज्ञता भाव जागृत झाल्याने त्यांना बोलता आले नाही.

* श्री. सचिन गुरव – आपल्याला घडवण्यासाठी इथे सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. आपण सर्वांनी पुष्कळ काही केले. आता मी काहीच बोलू शकत नाही.

* श्री. संतोष गोडसे – मी आज प्रथमच व्यासपिठावर बोलत आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. इथे जे काही मिळाले त्याचा उपयोग करून हिंदु जागृतीसाठी प्रयत्न करीन.

* श्री. राजेंद्र माळी – माणसाला जगण्यासाठी साधनाच कशी आवश्यक आहे, हे इथे आल्यावर समजले. आपण सर्वजण भावी अडचणींसाठी साधनाच करूया, तसेच समाजासाठी आपणा सर्वांचे जे देणे लागते, ते फेडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत राहूया.

* श्री. गणेश आनंदे – दोन दिवस अन्य कोणतेही विचार नव्हते. आयुष्यात प्रथमच हे सर्व अनुभवत आहे. सर्व नियोजन चांगले होते. शिकायला मिळालेले कृतीत आणण्याचा प्रयत्न करीन.

* श्री. अरविंद गवळी, गवळीवाडी – येथे मला जे शिकायला मिळाले ते आजपर्यंत कुठेच शिकायला मिळाले नाही.

* श्री. राजेंद्र पाटील, कौलगे – मी सद्गुरूंना वंदन करतो. गुरूंनी माझी निवड केली. त्यामुळे मी इथे आलो. दोष-अहं घालण्यासाठी मी प्रयत्न करेन. मी सुधारेन आणि समाजालाही सुधारेन !

मनोगत व्यक्त करतांना जवळपास प्रत्येक शिबिरार्थींनी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून ‘त्यांच्याकडून शिकायला मिळाले’, असे सांगितले.

 

बालसाधक वेदांत रेपाळ (वय १० वर्षे)  याचा कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग !

सनातन संस्थेचा बालसाधक कु. वेदांत (गणेश) पुरुषोत्तम रेपाळ (वय १० वर्षे) याचा कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग होता. त्याने गटांमध्ये झालेल्या चर्चेत, तसेच प्रायोगिक भागात मत व्यक्त केले. त्याचा उत्साह सर्वांना लाजवेल असाच होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात