गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य ! – श्री. विलास मडिगेरी, नगरसेवक, भाजप

भोसरी (पुणे) येथे २०० हून अधिक
गोभक्त अन् गणेशभक्त यांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी गोभक्त अन् गणेशभक्त

भोसरी : गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य असून ती आपली परंपरा आहे. आंदोलनातील या मागणीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. प्रशासनाकडे आंदोलनातील मागण्यांविषयी निवेदन द्यायला मीही असेन. येथील इंद्रायणीनगर भागात झालेल्या गोहत्येचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांचा भोसरी भागात दौरा असल्याने पोलिसांनी मला याविषयी आता काहीच वाद निर्माण करू नका, असे सांगितले; पण हे सत्य उघड होणे आवश्यक होते. म्हणूनच मी या आंदोलनात उपस्थित राहिलो आहे. सर्व हिंदूंनी या आंदोलनामध्ये नेहमी सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन भाजपचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नगरसेवक श्री. विलास मडिगेरी यांनी केले.

येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलानजीक पीएम्टी चौकात १७ ऑगस्ट या दिवशी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये ते बोलत होते. या वेळी आंदोलनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पन्नालाल जाधव, ह.भ.प. माणिकराव मोकाशी, योग वेदांत समितीचे श्री. प्रशांत पोफळे, हिंदु जनजागृती समितीचे नागेश जोशी आणि सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांसह २०० हून अधिक गोभक्त, गणेशभक्त अन् धर्मप्रेमी हिंदूंची उपस्थिती होती. आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. संदेश कदम यांनी केले.

छायाचित्रात डावीकडून बोलतांना श्री. विलास मडिगेरी अन् त्यांच्या बाजूला (१) ह.भ.प. माणिकराव मोकाशी

हिंदूंनी मानसिकता पालटून
हिंदुत्वासाठी एकत्र येणे आवश्यक ! – पन्नालाल जाधव

भोसरी येथे गाभीण गायीच्या हत्येचा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. तरीही बहुसंख्य हिंदू शांतच आहेत. एकाही प्रसारमाध्यमाने या प्रकरणाची नोंद घेऊन सर्वांना समाजाला जाणीव करून द्यावी, असा विचार केला नाही. बहुसंख्य हिंदूंची ही मानसिकता पालटायला हवी आणि हिंदुत्वासाठी एकत्र यायला हवे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व गोरक्षकांच्या वतीने शासनाकडे मागणी करतो की, या गोहत्या प्रकरणात गुंतलेल्या सर्व हिंदुद्रोह्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

चीनमधून भारतात आयात होणार्‍या
सर्व वस्तूंवर बंदी घाला ! – ह.भ.प. माणिकराव मोकाशी

जवाहरलाल नेहरूंनी हिंदी-चिनी भाई भाईचा नारा देऊन हिंदूंना फसवले. याचाच अपलाभ घेऊन चीनने भारताचा मोठा भूखंड अपहृत केला. सैनिकांची रसद बंद केली की, ९० प्रतिशत सैन्य संपते. या नियमानेच चीनमधून भारतात आयात होणार्‍या सर्व वस्तूंवर बंदी घातली, तर चीनचे कंबरडे मोडून जाईल आणि चीन भारताच्या पायावर लोटांगण घालेल.

हिंदुद्रोह केल्यानेच काँग्रेसचे पतन झाले,
हे शासनाने लक्षात ठेवावे ! – चंद्रशेखर तांदळे

केरळ आणि कर्नाटक राज्यात हिंदुत्वनिष्ठांच्या सर्रास हत्या होत आहेत. पुरोगामी-निधर्मी मंडळी पर्यावरणाच्या नावाखाली हिंदु सणांविषयी हिंदूंचा बुद्धीभेद करू पहात आहेत आणि पुरोगाम्यांच्या दबावाला शासनही बळी पडत आहे. गोहत्या बंदीच्या कायद्याचा वाचकच निर्माण झालेला नाही. समलैंगिकतेला खतपाणी घालणार्‍या का बॉडिस्केप्स या मल्याळी चित्रपटातून सर्वशक्तिमान असणार्‍या हनुमंताचे विडंबन केले जात आहे. यावर केरळमधील प्रशासन काय कृती करत आहे ? हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या शासनाने आताच हिंदूंहिताचे काम करणे आवश्यक आहे. हिंदूंसाठी काहीही न करता उलट हिंदुद्रोह करणार्‍या काँग्रेसचे पतन झाले, हे शासनाने लक्षात ठेवावे.

पंतप्रधानांनी केरळमधील शासन
बरखास्त करू अशी चेतावणी द्यावी ! – नागेश जोशी

१. पंतप्रधान स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी केरळमधील साम्यवादी (कम्युनिस्ट) शासनाला सांगायला हवे की, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या थांबल्या  नाहीत, तर तुमचे शासनच बरखास्त करू. ही हिंदूंची अपेक्षा आहे.

२. सध्या गणेशमूर्तीही चिनी बनावटीच्या येत आहेत. त्यामुळे ७० अरब रुपये एवढा लाभ चीनला होतो. हे रोखण्यासाठी मी एकही चिनी वस्तू खरेदी करणार नाही, अशी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया.

३. ज्या देशात इस्रोने मंगळयान पाठवले, अशा देशात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी मेक इन इंडियाचा नारा देणार्‍या शासनाने चीनकडून साहाय्य घ्यावे, हे दुर्दैवी आहे.

४. गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत नाही, हे प्रदूषणावर अभ्यास करणार्‍या संस्थांनी सिद्ध केले आहे. १० दिवस शास्त्रीय पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना झालेल्या मूर्तीतील चैतन्याने नदी प्रदूषित  होईल कि मूर्तीच्या चैतन्याने नदीतील पावित्र्य वाढेल, याचा विचार शासनाने करावा. त्यामुळे पिंपरी महानगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा कृत्रिम हौदाचा निर्णय तात्काळ रहित करावा.

क्षणचित्रे

१. आंदोलन प्रारंभ होण्यापूर्वी आंदोलनस्थळी सद्गुरु संत श्री बाळूमामा यांच्या पालखीचे आगमन झाले आणि तिथे पालखी १५ मिनिटे थांबली. त्या वेळी भक्तांनी पिंजर उधळून ढोल-ताशाच्या गजरात पालखीचे स्वागत केले. आंदोलनस्थळ पिंजराने भरलेले असल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. यामुळे आंदोलनाच्या आधीच देवाचा आशीर्वाद मिळाला, असा भाव उपस्थित सर्वांचा जागृत झाला.

२. आंदोलनस्थळी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.

आंदोलनाचे फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण

या आंदोलनाचे फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे आंदोलन ५ सहस्र ९९ जणांनी थेट पाहिले आणि १९ सहस्र ४३७ जणांपर्यंत आंदोलनाचा विषय पोहोचला.

वैशिष्ट्यपूर्ण

आंदोलनाच्या प्रारंभीपासूनच समाजातील धर्मप्रेमींचा भरभरून प्रतिसाद होता. आंदोलनातील उत्स्फूर्त घोषणांनी सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. येणारे जाणारे युवक आंदोलनाचा विषय ऐकल्यावर स्वतःहून आंदोलनस्थळी पूर्णवेळ थांबले.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनासारख्या उपक्रमात सहभाग
घेऊन सर्वांनी कार्यात सहभागी होऊया ! – विलास मडिगेरी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादानेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक राष्ट्र-धर्म यांसाठी अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. अशा प्रकारे त्याग करून कार्य करणार्‍यांसह सर्वांनी रहायला हवे. उपस्थित सर्वांनीच राष्ट्रीय हिंदू आंदोलनासारख्या उपक्रमात सहभाग घेऊन राष्ट्र-धर्म यांचे कार्य करा. असे आवाहन श्री. विलास मडिगेरी यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात