हिंदूंनी, धर्मद्रोह्यांच्या हातात मूर्तीदान न देता वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करायला हवे ! – उमेश पवार, शिववंदना (सांगवी)

 

नवी सांगवी (पुणे) येथे १०० हून अधिक
गणेशभक्त आणि राष्ट्रप्रेमी यांचा राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभाग

पिंपरी (पुणे) – प्रशासनाकडून गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद उभारतात. हिंदूंनी त्या हौदामध्ये मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी मागील वर्षी दान केलेल्या मूर्तींचे पुढे काय झाले ?, याविषयी विचारणा केली पाहिजे. त्या मूर्ती पुढे कर्मचारी डंपरमध्ये भरून खाणीमध्ये फेकून देतात. प्राणप्रतिष्ठापना केलेली श्री गणेशाची मूर्ती अशा प्रकारे दान देऊन आपण चूक करतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो. अशा दान मिळालेल्या मूर्तींचा कुठेही हिशेब ठेवला जात नाही. त्यामुळे हिंदूंनी दायित्वाने वागून धर्मद्रोह्यांच्या हातात मूर्तीदान न देता वहात्या पाण्यातच मूर्तींचे विसर्जन करायला हवे, असे प्रतिपादन शिववंदना गटाचे (सांगवी) श्री. उमेश पवार यांनी केले. येथील नवी सांगवी येथील साई चौकात १८ ऑगस्ट या दिवशी केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये ते बोलत होते. या वेळी भाजप युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री. हिरेन सोनवणे, श्री गजानन महाराज देवस्थानचे (सांगवी) ह.भ.प. वाघ महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे यांसह १०० हून अधिक गणेशभक्त अन् राष्ट्रप्रेमी हिंदूंची उपस्थिती होती. या वेळी सर्वश्री नागेश जोशी आणि श्री. चंद्रशेखर तांदळे यांनीही आंदोलनातील मागण्यांनुरूप मार्गदर्शन केले.

कृत्रिम हौद होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार ! – हिरेन सोनवणे

गणेशोत्सव पारंपरिकरित्या साजरा व्हायला हवा. आम्ही आमच्या भागात कृत्रिम हौद होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत. हिंदूंनी वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करायला हवे.

चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे ! – ह.भ.प. वाघ महाराज

लोकमान्य टिळक यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव चालू केला, त्याविरोधात सध्या गणेशोत्सव चालू आहे. आज धर्मावर चित्रपट, उत्सवांमध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव करून धर्मावर आक्रमणे वाढत असून ती रोखणे आवश्यक आहे. चीनला रोखायचे असेल, तर त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे, म्हणजे ते सरळ होतील. पालिकेकडून कृत्रिम हौदामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास सांगितले जाते. त्याद्वारे देवतेची होणारी विटंबना हिंदूंनी सहन करता कामा नये.

आंदोलनाचे फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण

या आंदोलनाचे फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे आंदोलन ५ सहस्र ८०१ जणांनी थेट पाहिले.

 

क्षणचित्रे

१. आंदोलनाला ८ पोलीस उपस्थित होते.

२. आंदोलनस्थळी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला.

 

पोलिसांकडून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न

आंदोलन चालू असतांना एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन हे आंदोलन कशासाठी येथे करता ?, असे सांगत १० मिनिटांसाठी ते थांबवले. या वेळी सनातन संंस्थेच्या साधकाला सांगितले की, तुम्ही आंदोलन थांबवून पोलीस ठाण्यात येऊन निवेदन द्या. येथे आंदोलन करण्यापेक्षा तुमच्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांकडे असतील, तर तिकडे जाऊन आंदोलन करा. सायंकाळी ५ ते रात्री ८ ही वेळ गर्दीची असल्याने वाहतूक असते, असे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या साधकाने त्यांना आंदोलन कशासाठी आणि का करतो आहोत ? आंदोलनासाठी घेतलेली पोलीस अनुमती, आंदोलनातील मागण्या याविषयी सविस्तर सांगितले, तसेच आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, हेही स्पष्ट केले. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, डॉ. झाकीर नाईक यांचे नाव आंदोलनात घेऊ नका. ते नाव ऐकून कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. यानंतर त्यांनी आंदोलन चालू करण्यास अनुमती दिली. यानंतर अन्य एका पोलिसाने त्या साधकाचे नाव आणि क्रमांक लिहून घेतला. (सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येत असतांना ते रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या साहाय्यक पोलीस निरीक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकता ! ज्या डॉ. झाकीर नाईक यांचे नाव घेण्यावरून पोलीस कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची भाषा करतात, यावरूनच कायदा-सुव्यस्थेची परिस्थिती किती बिघडलेली आहे, हेच दिसून येते. त्या पोलिसांनी हाच वेळ धर्मांध अन् आतंकवादी शोधण्यासाठी दिला असता, तर तो सार्थकी लागला असता. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात