परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेली अमूल्य सूत्रे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. साधनेच्या दृष्टीने धर्मग्रंथ आणि श्री गुरु यांचे महत्त्व

‘जिवाच्या बुद्धीला कळण्यासाठी, म्हणजे साधना किंवा ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा बुद्धीचा निश्‍चय होण्यापुरते धर्मग्रंथांचे महत्त्व आहे; मात्र त्यानंतर ईश्‍वरप्राप्तीसाठी गुरूंचे मार्गदर्शन आणि गुरुकृपा आवश्यक असते.

२. माया

जी आसक्ती साधकाला ईश्‍वरापासून दूर नेते ती माया. एखाद्या साधकाला ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी आश्रमात येऊन रहावे’, असे वाटते. आश्रमात रहायचे असल्यास घर विकणे योग्य असते; परंतु ‘रहाते घर विकू नये’, असे वाटणे म्हणजे माया. ईश्‍वराकडे जाण्याची ओढ असली, तरीही स्वतःच्या घराची आसक्ती असते (मन अडकलेले असते).

३. प्रयत्न, प्रारब्ध आणि कालमाहात्म्य

जीवनात जे काही ठरवतो, त्याचे नियोजन करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. हे सर्व करत असतांना ‘प्रारब्ध आणि कालमाहात्म्य यांनुसार सर्व घडते’, हेे जाणून आनंदाने स्वीकारले, तर जीवन आनंदी होते. हिंदु राष्ट्र स्थापनेसारखे मोठे समष्टी ध्येय कालमाहात्म्यानुसार पूर्णत्वास जात आहे. त्यासाठी आपण काही केले किंवा नाही, तरी फारसा परिणाम होत नाही; मात्र जे करतात, त्यांना साधनेच्या दृष्टीने लाभ होतो.

४. समष्टी साधनेचे महत्त्व

काही साधकांना वाटते, ‘माझी प्रगती होत नाही. त्यामुळे मला समष्टी सेवा नको.’ प्रत्यक्षात त्याची प्रगती होण्यासाठी त्याने समष्टी सेवा करणे अपेक्षित असते.

५. मायेतील सेवा आणि सत्सेवा

व्यवहारातील (मायेतील) सेवा रज-तम गुणयुक्त असतात. त्यातून व्यक्तीत जडत्व (काळे आवरण) येते. त्यामुळे त्याला आनंद मिळत नाही. याउलट सत्सेवा (गुरुसेवा, धर्मसेवा) ही सत्त्वगुणयुक्त असल्याने त्यातून व्यक्तीला हलकेपणा (काळे आवरण नष्ट होते आणि सत्त्वगुण वाढतो) जाणवतो. साधना आणि सत्सेवा यांतून व्यक्तीला आनंद मिळतो आणि तो पुनःपुन्हा साधना, गुरु किंवा ईश्‍वर यांच्याकडे आकर्षित होतो.

६. खरी लेखा (जमा-खर्च) सेवा

खरी लेखा सेवा, म्हणजे पाप-पुण्य यांचा हिशोब ठेवणे होय.

७. भावाचे महत्त्व

नुसता नामजप करून प्रगती होत नाही. एखादी ध्वनीफित किंवा पोपटही नामजप करू शकतो. गुरु किंवा देवता यांच्या प्रतीच्या भावामुळे प्रगती होते आणि त्याच्याशी (सगुणाशी) एकरूपता येते. पुढे समष्टी कार्य करण्यासाठी भावातीत अवस्थेत जाता येते. त्यामुळे हळूहळू समष्टीशी (निर्गुणाशी, ईश्‍वराशी) एकरूपता येते.

८. स्वभावदोषांचे निवारण होण्यासाठी स्वयंसूचना किंवा भावावस्था आवश्यक

स्वभावदोषांचे निवारण होण्यासाठी नियमितपणे स्वयंसूचना सत्रे करावीत. त्याने साधना व्यय न होता स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन शक्य होते. भावावस्थेत राहून स्वभावदोष आपोआप नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक पातळी चांगली असावी लागते.

९. एका साधिकेला ‘त्यांचे लग्न झाले आहे’, असे वाटतच नाही. हे प्रगतीचे लक्षण आहे.’

– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक (१.७.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात