उत्तम संघटक होण्यासाठी स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणार आणि धर्मशिक्षणाच्या प्रसारातून प्रभावी हिंदूसंघटन निर्माण करणार !

कराड (जिल्हा सातारा) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत उपस्थितांचा निर्धार

सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी शिबिरार्थींना केले मार्गदर्शन !

कार्यशाळेत सहभागी डावीकडून सौ. भक्ती डाफळे, श्री. सुनिल घनवट, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, श्री. नागेश गाडे
कार्यशाळेत उपस्थित धर्माभिमानी

कराड (जिल्हा सातारा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेली दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी पार पडली. येथील अष्टविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. उत्तम संघटक होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचा आणि धर्मशिक्षणाच्या प्रसारातून प्रभावी हिंदूसंघटन निर्माण करण्याचा निश्‍चय उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केला. समितीने आयोजित केलेली ही राज्यातील तिसरी कार्यशाळा होती.

दुसर्‍या दिवशीच्या सत्रांमध्ये वाईट शक्तींच्या निवारणार्थ कोणते उपाय करावेत ? स्वभावदोष निर्मूलनासाठी सारणी लिखाण कसे करावे ? याविषयी सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक समस्यांच्या निवारणासाठी सुराज्य अभियान कसे राबवावे, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे आणि महाराष्ट्र संघटक श्री. सुनिल घनवट यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या गटचर्चेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, सारणी लिखाण आणि स्वयंसूचना सत्र यांचे प्रायोगिक करून घेण्यात आले.

सायंकाळच्या सत्रात हिंदु राष्ट्र स्थापनेचे उपक्रम आणि त्यांचे व्यापक नियोजन करण्यात आले. यानंतर धर्मप्रेमींनी कार्यशाळेत शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभवकथन केले. सौ. रूपा महाडिक यांनी वन्दे मातरम् म्हटले. श्रीगुरूंचा श्‍लोक आणि श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता व्यक्त करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

 

शिबीरार्थींनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. शिवराज तलवार, सातारा : ईश्‍वराने कार्यशाळेसाठी माझी निवड केली, याचा आनंद झाला. दोन दिवसांत ईश्‍वरी चैतन्य आणि आध्यात्मिक त्रास या दोन्हींचा अनुभव घेता आला. कार्यशाळेच्या सभागृहात सनातनच्या रामनाथी आश्रमाप्रमाणे चैतन्य जाणवत होते. शिबीर संपूच नये, असे वाटले.

२. श्री. ओकार डोंगरे, सातारा : हिंदु राष्ट्रासाठी आवश्यक असे संस्कार सर्वांमध्ये रुजवण्यासाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरेल. येथे येऊन साधना वाढवण्यासाठी प्रेरणा मिळाली. नियमित साधना केल्यास ईश्‍वर आपल्याकडून सर्व करून घेईल, हे शिकायला मिळाले.

३. डॉ. महेश कदम, मालगाव : आजवर धर्मकार्य करतांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागले. धर्मसेवा करतांना नकारात्मकतेवर मात करण्यासाठी आणि सहनशीलता वाढवण्यासाठी देवच साहाय्य करतो, याची जाणीव झाली. बहुतांश समस्यांवर प्रक्रिया हाच परिणामकारक उपाय आहे, हे शिकायला मिळाले. ही प्रक्रिया राबवून दोन मासांत स्वत:मध्ये आमूलाग्र पालट करणार.

४. श्री. सागर आमले, कराड : आपल्यात भक्ती असेल, तर शक्ती योग्य ठिकाणी वापरण्याची सद्बुद्धी ईश्‍वरच देतो. कार्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. नामजप साधनेमुळे क्षात्रतेज वाढते. धर्मरक्षण आणि धर्मशिक्षण यांचा प्रसार यांचे दायित्व आपल्यावर आहे.

५. श्री. चंदन जाधव : आजवर जे शिक्षण घेतले, त्याहून अधिक सूत्रे या दोन दिवसांच्या कार्यशाळेत शिकायला मिळाली. स्वत:मध्ये योग्य पालट घडवण्यासाठी आणि हिंदुत्वरक्षण परिणामकारक होण्यासाठी साधनाच महत्त्वाची आहेे. कोठेही न शिकवली जाणारी महत्त्वाची स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकायला मिळाली, याचा आनंद होत आहे.

६. श्री. केशव कदम : हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी साधना हेच महत्त्वाचे माध्यम  आहे, हे लक्षात आले. समष्टी साधनेमुळे हिंदु समाजात सामर्थ्य निर्माण होईल, असा विश्‍वास निर्माण झाला.

७. सौ. गीतांजली गोंधळेकर : आपल्याकडून अनेक दोषांमुळे चुका होतात. त्यावर स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतून मात करता येऊ शकते, हे शिकायला मिळाले. व्याख्याने, प्रायोगिक भाग यांमधून विषयाची व्यापकता लक्षात आली आणि मार्गदर्शन मिळाले.

समारोपाच्या प्रसंगी श्री. संदीप जायगुडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची गीते उपस्थितांकडून म्हणवून घेतली.

 

सहकार्य

अष्टविनायक मंगल कार्यालयाचे मालक श्री. राजेंद्र थोरात यांनी सभागृह अल्प दरात उपलब्ध करून दिले. शिवराज ढाब्याचे मालक श्री. नामदेव थोरात यांनी दोन्ही दिवसांचे भोजन विनामूल्य दिले. व्यासपीठ आणि खुर्च्या श्री. गोरख (बापू) करपे यांनी, गाद्या-उशा श्री. सतीश सारडा यांनी, तर श्री. शशिराज करपे यांनी ध्वनीक्षेपक व्यवस्था उपलब्ध करून दिली. समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी सर्वांचे आभार मानले.

 

कार्यशाळेची फलनिष्पत्ती !

  • १४ गावांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करणार
  • ५ गावांमध्ये धर्मबैठकांचे आयोजन करणार
  • ८ गावांमध्ये एक वक्ता हिंदु धर्मजागृती सभा घेणार
  • २ ठिकाणी शौर्यजागरण शिबिरांचे आयोजन करणार
  • २० कार्यकर्ते माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडणार
  • १८ जण नियमित धर्मशिक्षणवर्ग घेऊन धर्मप्रसार करणार
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात