पुणे येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेची यशस्वी सांगता

अंतरंगासह विश्‍वभरात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी धर्मनिष्ठ मावळे वचनबद्ध !

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीमाता आणि संत यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा !, असा त्यांचा भाव होता. तो आदर्श समोर ठेवून आताच्या काळातही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झटणार्‍या धर्मप्रेमींनी हे धर्मकार्य ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून करण्याचा दृढनिर्धार हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या निमित्ताने केला. देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या जोडीला प्रत्येकामध्ये असलेल्या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून अंतरंगातही हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निश्‍चय हिंदुत्वनिष्ठांनी केला. हिंदुत्वाचे कार्य अधिक चांगले आणि आध्यात्मिक स्तरावर करण्याविषयी दिशादर्शन करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ आणि ६ ऑगस्ट या दिवशी हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ५ ऑगस्ट या दिवशी सिद्धार्थ सभागृह येथे, तर ६ ऑगस्ट या दिवशी रघुनंदन सभागृह येथे ही कार्यशाळा पार पडली. निवासी कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण झाली.

यात हिंदुत्वाचे कार्य आध्यात्मिक स्तरावर कसे करावे ? स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ? हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी कालानुरूप कोणते उपक्रम राबवावेत, अनिष्ट शक्तींचे त्रास म्हणजे काय ?, त्यांच्या निवारणार्थ कोणते आध्यात्मिक उपाय करावेत ?, प्रार्थना कशी करावी ?, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कशी राबवावी?, सुराज्य अभियान कसे राबवावे ?, धर्मप्रसारासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हिंदुत्वाचे कार्य करतांना पोलिसांना कसा संपर्क करायला हवा ?, साधनेचा प्रसार कसा करावा ?, हिंदु राष्ट्र हा विषय समाजामध्ये कसा प्रभावीपणे मांडावा यांविषयी प्रायोगिक भाग घेण्यात आला. श्रीकृष्णाची मानस पाद्यपूजा, प्रभु श्रीरामचंद्र आणि हनुमान यांची भेट हे भावजागृतीचे प्रयोगही करण्यात आले. पंचज्ञानेंद्रियांच्या पलीकडील गोष्टी जाणण्याची क्षमता विकसित व्हावी, यासाठी सूक्ष्मातील प्रयोगही घेण्यात आले. दोन्ही दिवशी सकाळी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग झाला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात सामूहिकरित्या नामजप करण्यात आला. दुसर्‍या दिवसाचा समारोप संपूर्ण वन्दे मातरम्ने झाला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या उत्स्फूर्त घोषणांमुळे सभागृह दणाणून गेले. कार्यशाळेला ३५ धर्माभिमानी उपस्थित होते.

समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले मनोगत

संजय इंगळे

ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतीविना स्वातंत्र्य कोणा मिळाले ? असे सांगितले होते, त्याप्रमाणे या कार्यशाळेनंतर साधनेविना हिंदु राष्ट्र कुणाला मिळाले ? असेच म्हणावे लागेल. कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायला मिळाले, ही पूर्वपुण्याईच !

सर्जेराव ढोकरे

मला पूर्णवेळ धर्मप्रसाराचे कार्य करण्याची इच्छा आहे. म्हणजे मी स्वतःची प्रगती साध्य करू शकेन आणि समाजाला समवेत घेऊन जाईन.

विकास सुर्वे

श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताला ज्याप्रमाणे गोप आणि गोपी यांनी काठ्या लावल्या, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार.

सुयोग गोंधळेकर

आदर्श कार्यकर्ता कसा असावा, निःस्वार्थीपणे कसे कार्य करावे, हे शिकायला मिळाले. भगवंतप्राप्ती हाच मूळ उद्देश असून तो समजून दिल्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.

सुहासिनी गावडे

सनातन हे कुटुंब असल्याचे अनुभवायला मिळाले. हा एक मोठा सागर असून त्यामधून जितके घेता येईल, तितके अल्पच आहे.

सिद्धार्थ सभागृहाचे मालक श्री. गणेश कुलकर्णी, दुर्गा स्नॅक्सचे श्री. विलास साळवी यांचे या कार्यशाळेसाठी सहकार्य लाभले.

रघुनंदन सभागृहाचे मालक श्री. विनय ओक यांचा सत्कार !

दोन दिवसीय कार्यशाळेसाठी रघुनंदन सभागृहाचे मालक श्री. विनय ओक यांनी रघुनंदन सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते म्हणाले, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यावर मी अलोट प्रेम करतो. त्यामुळे हे विषय घेऊन येणार्‍यांसाठी हे सभागृह नेहमी उपलब्ध असेल. (हिंदुत्वाच्या कार्यासाठी सहकार्य करणार्‍या धर्मनिष्ठांमुळेच एक दिवस हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सभागृहावर दोन दिवस गरुडाचे दर्शन झाल्याविषयी श्री. ओक यांना अवगत केल्यावर समितीच्या एका कार्यकर्त्याला ते म्हणाले, तुमचे कार्य मोठे आहे. या वास्तूत हा कार्यक्रम झाला, हे माझे भाग्य आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही, याचे वाईट वाटते. सभागृहाच्या भाड्याविषयी त्यांना विचारणा केल्यावर या कार्यक्रमासाठी अर्पणमूल्य घेणे म्हणजे समर्थ रामदासस्वामींच्या पादुका आल्या असतांना त्यांच्या दर्शनासाठी पैसे मागण्यासारखे आहे.

गरुडाच्या रूपाने शुभसंकेत

कार्यशाळेच्या दोन्ही दिवशी सकाळी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू असतांना सभागृहाच्या वरच्या बाजूला एक गरुड १५ ते २० मिनिटे बसलेला होता. गरुड हे श्रीविष्णूचे वाहन असून गरुडाचे दर्शन हा शुभसंकेत मानला जातो. त्यामुळे एक प्रकारे गरुडाच्या रूपाने श्रीविष्णूचेच आशीर्वाद साधकांना आणि कार्याला मिळाल्याचे जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात