रामजन्मभूमी प्रकरणी ५ डिसेंबरला सुनावणी होणार

लवकरात लवकर याची सुनावणी होऊन ही समस्या सोडवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

नवी देहली : अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी येत्या ५ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ११ ऑगस्टला या संदर्भात झालेल्या सुनावणीत ५ डिसेंबरला पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय झाला. खटल्याशी संबंधित असलेल्या सगळ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आवश्यक ती सर्व ऐतिहासिक कागदपत्रे घेऊन येण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. काही ऐतिहासिक कागदपत्रांच्या भाषांतराचेही आदेश देण्यात आले आहेत. या खटल्याशी संबंधित ९ सहस्र पानी कागदपत्रे आहेत. या व्यतिरिक्त ९० सहस्र पानांमध्ये अयोध्येशी संबंधित विविध माहिती आणि अनेक महत्त्वाचे जबाब आहेत. ही माहिती संस्कृत, पाली, फारसी, अरबी आदी भाषांमध्ये आहे. या माहितीचा संदर्भ घेऊन पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाची मागणी मान्य करून कागदपत्रांच्या भाषांतरासाठी न्यायालयाने वेळ दिला आहे.

११ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. खटल्याशी संबंधित काही जण आता जिवंत नाहीत. अशा परिस्थितीत या पक्षकारांना खटल्याच्या कामातून वगळण्याची मागणी सिब्बल यांनी केली. या वेळी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी अयोध्येचा खटला हा एक सार्वजनिक हिताशी संबंधित खटला आहे. त्यामुळे त्याची वेगाने सुनावणी घेण्याची मागणी केली. डॉ. स्वामी यांच्या मागणीला आक्षेप घेत न्यायालयाने प्रक्रियेचे योग्यप्रकारे पालन करावे, झटपट निर्णय घेण्याची घाई करू नये, असे सिब्बल म्हणाले. तीन न्यायाधिशांचे खंडपीठ रामजन्मभूमी प्रकरणी खटल्याची प्रतिदिन सुनावणी घेऊन भूखंडाच्या मालकीहक्कावर निर्णय घेणार आहे. या सुनावणीसाठी न्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नजीर काम पहाणार आहेत.


११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात
रामजन्मभूमी खटल्यावर प्रतिदिन सुनावणी होणार

नवी देहली : येत्या ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालय अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यावर प्रतिदिन सुनावणी करणार आहे. या संदर्भात न्यायालयाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. ३ न्यायाधिशांचे खंडपीठ दुपारी २ वाजल्यापासून ही सुनावणी करणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात