भारतात सर्वत्र दिसणार्‍या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे फल

१. ग्रहाची स्थिती

प्रत्येक ग्रह आपापल्या गतीने स्वतःच्या कक्षेतून (स्वतःभोवती फिरत फिरत) सूर्याभोवती फिरतो. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यास तिची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो.

 

२. ग्रहणांचे प्रकार

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचे खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती, असे तीन प्रकार आहेत.

२ अ. खग्रास चंद्रग्रहण : पृथ्वीची सावली पूर्ण चंद्रावर पडणे

२ आ. खंडग्रास चंद्रग्रहण : पृथ्वीची सावली चंद्राच्या थोड्या भागावर पडणे

२ इ. कंकणाकृती चंद्रग्रहण : पृथ्वीची सावली चंद्राभोवती वर्तुळाकृती पडणे

सोमवार, ७.८.२०१७, श्रावण पौर्णिमा या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. ग्रहणकालात केलेल्या साधनेचे फळ सहस्त्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते. यासाठी ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

१. चंद्रग्रहण दिसणारे प्रदेश : भारतासह संपूर्ण आशिया खंड, युरोपसह आफ्रिका खंड, रशियाचा दक्षिणेकडील प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अ‍ॅटलांटिक महासागर, ऍन्टार्क्टिका

२. संपूर्ण भारतामधील चंद्रग्रहणाच्या वेळा

२ अ. स्पर्श (आरंभ) : २२.५२ (रात्री १०.५२)

२ आ. मध्य : २३.५१ (रात्री ११.५१)

२ इ. मोक्ष (शेवट) : ००.४९ (रात्री १२.४९)

२ ई. पर्व (टीप १) (आरंभापासून शेवटपर्यंतची एकूण वेळ) : १.५७ मिनिटे

टीप १ – पर्व म्हणजे पर्वणी, पुण्यकाल होय. ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे.

१. शुभ काल : विविध सण

२. अशुभ काल : अमावास्या, पौर्णिमा, ग्रहण, श्राद्ध, व्यतिपात योग (व्यत्यय आणणे. हा २७ योगांपैकी १७ वा अशुभ योग आहे.), वैधृती योग (तोडणे. २७ योगांपैकी शेवटचा अशुभ योग आहे.) आणि संक्रांत (१२ राशींपैकी रवि ग्रहाच्या प्रत्येक राश्यांतराला संक्रांत म्हणतात, उदा. रवि ग्रह मकर राशीत गेल्यास त्याला मकरसंक्रांत, असे म्हणतात.)

वरील शुभ आणि अशुभ कालांमध्ये ईश्‍वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो, असे शास्त्रात सांगितले आहे; म्हणून या दिवसांना पर्व किंवा पर्वणी, असे म्हणतात.

 

३. ग्रहणाचे वेध लागणे

३ अ. अर्थ : ग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या छायेत येऊ लागल्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले, असे म्हणतात.

३ आ. कालावधी : या वर्षीचे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसर्‍या प्रहरात (टीप २) आहे, म्हणजेच सूर्यास्तानंतर ३ तास ४२ मिनिटांनी ग्रहणस्पर्श (रात्री १०.५२ वाजता) होणार आहे. (अनेक ठिकाणी सूर्यास्ताची वेळ वेगवेगळी असल्याने त्या दिवशीच्या पंचांगात ती वेळ पहाता येईल.) रात्रीच्या दुसर्‍या प्रहराच्या तीन प्रहर आधी, म्हणजे ग्रहणापूर्वी ९ तास, म्हणजेच दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत (रात्री १२.४९ पर्यंत) वेध पाळावेत.

टीप २ – दिवसाचे ४ प्रहर आणि रात्रीचे ४ प्रहर मिळून एका दिवसात एकूण ८ प्रहर असतात. ३ तासांचा एक प्रहर असतो.

३ इ. नियम : वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. बाल, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी ५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

३ इ १. वेधाचे नियम पाळण्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व

३ इ १ अ. शारीरिक : वेध काळात जिवाणू वाढत असल्याने अन्न लवकर खराब होते. या काळात रोगप्रतिकारशक्ती न्यून असते. त्यामुळे ज्याप्रमाणे रात्रीचे अन्न दुसर्‍या दिवशी शिळे होते, त्याप्रमाणे ग्रहणापूर्वीचे अन्न ग्रहणानंतर शिळे मानण्यात येते. ते अन्न टाकून द्यावे. वेध दुपारी १ वाजता लागणार असले, तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अन्न ग्रहण करू शकतो; मात्र त्यानंतर उरलेले अन्न टाकून द्यावे. ग्रहण संपल्यानंतर, म्हणजे रात्री १२.४९ नंतर ते अन्न खाऊ नये. केवळ दूध आणि पाणी यांना हा नियम लागू नाही. ग्रहणापूर्वीचे दूध आणि पाणी ग्रहण संपल्यावरही वापरू शकतो.

३ इ १ आ. मानसिक : वेध काळात मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. काही व्यक्तींना निराशा येणे, ताण वाढणे इत्यादी मानसिक आजारही होत असल्याचे मानसोपचारतज्ञ सांगतात.

३ इ १ इ. उपाय : वेधारंभापासून ग्रहण संपेपर्यंत नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास लाभ होतो.

 

४. ग्रहणातील कृत्ये

ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरश्‍चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे अनंत पटींनी फळ मिळते. ग्रहणकालामध्ये झोप, मलमूत्रविसर्जन, अभ्यंग (संपूर्ण शरिराला कोमट तेल लावून ते शरिरात जिरेपर्यंत मर्दन करणे) भोजन आणि कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे.

 

५. ग्रहणाचे राशीपरत्वे फल

५ अ. शुभ फल : मेष, सिंह, वृश्‍चिक आणि मीन

५ आ. अशुभ फल : मिथुन, तूळ, मकर आणि कुंभ

५ इ. मिश्र फल : वृषभ, कर्क, कन्या आणि धनु

ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये.    (संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०१७)

 

रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे ?

या वर्षी ७.८.२०१७ या दिवशी रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकत्र असल्यामुळे समाजामध्ये रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांनी वेधकाळात, म्हणजेच रात्री १० वाजेपर्यंत रक्षाबंधन करावे, अशी माहिती पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांनी दिली आहे.

१. ग्रहण आणि वेधकाळ : ७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजल्यापासून ग्रहणमोक्षापर्यंत पाळावेत.

२. उपवास असल्यास काय करावे ? : पौर्णिमा किंवा श्रावणी सोमवारचा उपवास असल्यास दुपारी एक वाजण्यापूर्वीच फलाहार करावा. सायंकाळी सोमवारची नित्य पूजा करून उपवास सोडत आहे, अशी प्रार्थना करून केवळ तीर्थ घेणे उचित होईल; कारण वेधकाळात भोजन निषिद्ध आहे.

३. रक्षाबंधन करण्याची योग्य वेळ : सकाळी ७.३० ते ९.०० वाजेपर्यंत राहूकाळ आणि पहाटेपासून सकाळी ११.०८ मिनिटांपर्यंत विष्टीकरण (भद्रा) असा अशुभ काळ आहे, तसेच वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने सकाळी ११.०८ पासून रात्री १० वाजेपर्यंत रक्षाबंधन (राखी बांधणे) करता येईल.

४. यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी असणारी ग्रहणे : यापूर्वी सोमवार ६.८.१९९० आणि शनिवार १६.८.२००८ या दिवशी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते, असे पंचांगकर्ते श्री. दाते यांनी सांगितले आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०१७)