संगीताच्या माध्यमातून साधना करतांना कु. तेजल पात्रीकर यांना आलेल्या अनुभूती

 

१. गाणे आणि नृत्य यांच्या माध्यमातून भावावस्था अन् आनंदावस्था अनुभवणे

‘मे २०१५ मध्ये एका सायंकाळी मी रामनाथी आश्रमातील रहात्या खोलीची स्वच्छता करत होते. स्वच्छता करून झाल्यावर सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास अकस्मात् मी नृत्यामध्ये शिकवलेले शिव आणि कृष्ण यांचे गाणे गुणगुणायला लागले. त्यावर स्थुलातून नृत्यही करायला लागले. (लहानपणी मी कथ्थक आणि भरतनाट्यम् या नृत्यप्रकारांच्या २ – २ परीक्षा दिल्या आहेत.) त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रूंच्या धारा वहात होत्या. मी गाणे आणि नृत्य यांच्याशी पूर्णपणे एकरूप झाले होते. मला माझे स्वतःचे अस्तित्वच जाणवत नव्हते. नृत्य करतांना ‘प्रभुद्वार चली, प्रभु की दासी । एक आस लिए, एक प्यास लिए ।’, हे गीत गात मी खरोखर पार्वती बनून शिवाला आळवत होते, तर ‘वृंदावन का कृष्ण कन्हैया, सबकी आंखों का तारा..’ या गीतावर राधा बनून कृष्णासाठी नृत्याविष्कार करत होते. बर्‍याच वेळाने नृत्यातील गिरक्या घेऊन मी पलंगावर पडले आणि हमसाहमशी रडायला लागले. त्या भावावस्थेत काही वेळ गेल्यावर अश्रू थांबून मला पुष्कळ शांत वाटू लागले. त्या वेळी गाणे आणि नृत्य यांतील एक वेगळीच अवस्था मी अनुभवली.

ही अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तू संगीत साधनेतील भावावस्था आणि आनंदावस्था अनुभवलीस.’’

 

२. भक्तीगीत गातांना ‘हे स्वर देवापर्यंत पोहोेचावेत’, असे आर्ततेने वाटणे आणि काही दिवसांतच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीताविषयीच्या ग्रंथाची सेवा आरंभ करण्याचा निरोप देणे

२.४.२०१६ च्या रात्री एका सेवेच्या वेळी भ्रमणभाषमध्ये मी माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) केलेले ‘भाव भोळ्या भक्तीची ही एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी…’ हे भक्तीगीत ऐकत होते आणि नंतर म्हणतही होते. हे भक्तीगीत म्हणत असतांना प्रत्येक शब्दाला माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते आणि ‘हे स्वर देवापर्यंत पोहोचावेत’, असे मला आर्ततेने वाटत होते. हे भक्तीगीत मी २ – ३ वेळा म्हटले. प्रत्येक वेळी तोच भाव आणि तीच आर्तता मला जाणवत होती अन् माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.

त्यानंतर १९.४.२०१६ या दिवशी अकस्मात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीताच्या माध्यमातून साधनेअंतर्गत संगीताविषयीच्या ग्रंथाची सेवा आरंभ करण्याचा निरोप दिला. हा निरोप म्हणजे माझे स्वर त्यांच्यापर्यंत पोेहोचल्याची जणू पावतीच होती ! याचे कारण म्हणजे हे मला आणि सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविना कुणालाच ठाऊक नव्हते.

 

३. सर्व राग-रागिण्या हात जोडून उभ्या असलेल्या दिसणे आणि संगीताच्या माध्यमातून साधना करवून घेण्यासाठी माध्यम बनवल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले ‘संगीत’ या विषयावर संगीताच्या माध्यमातून साधना करणार्‍या साधकांना मार्गदर्शन करणार होते. त्या स्थळी मी पोेहोचले, तेव्हा तेथे अजून कुणीच आले नव्हते. मी एकटीच त्या ठिकाणी नामजप करत बसले होते. त्या वेळी खोलीत मला विविध राग आणि रागिण्या यांच्या धूसर वर्णाच्या आकृत्या हात जोडून अवतीभोवती उभ्या दिसल्या. ‘आता परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला जे मार्गदर्शन करणार, त्याप्रमाणे आम्ही संगीत या विषयाकरता कार्य करणार’, असाच जणू त्यांच्या तोंडवळ्यावरचा भाव होता. यावरून ‘सर्व राग-रागिण्या, स्वर त्या श्रीमत् नारायणाच्या अवतारस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अधीनच आहेत. संगीताच्या माध्यमातून आमची साधना करवून घेऊन अध्यात्मात आम्हाला पुढे घेऊन जात आहेत’, असे लक्षात आले. आम्हाला माध्यम बनवल्याबद्दल त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. (सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमत् नारायणाचे अवतार आहेत, असे म्हटले आहे – संकलक)

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या
वर्षारंभादिनानिमित्त लिहिलेली कविता आयुष्यात प्रथमच चाल लावून म्हणता येणे

मे २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या वर्षारंभाच्या निमित्ताने एका दृश्यपटासाठी श्री. प्रतीक जाधव यांनी ‘धन्य धन्य हम हो गए गुरुदेव…’ ही कविता लिहिली होती. ‘ती कशी म्हणता येईल ?’, हे विचारण्याकरता त्यांनी मला बोलावले. मी आयुष्यात आजपर्यंत चाल ठाऊक असलेले गाणे म्हटले होते; पण गाण्याला चाल मात्र कधीच लावली नव्हती. श्री. प्रतीक यांनी विचारले, त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच कृपेने त्या कवितेच्या ओळी वाचल्यानंतर १५ ते २० मिनिटांच्या कालावधीतच त्या कवितेला चाल लावली गेली. कवितेचा आरंभ आणि शेवटही आपोआप झाला. या वेळी ‘दैवी संगीत कसे असतेे ?’, हे प्रत्यक्ष अनुभवले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवात आपलीही संगीतसेवा त्यांच्या चरणी रुजू व्हावी’, एवढी एकच प्रार्थना मनातून होत होती. दृश्यपट पाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाही ती चाल आवडल्याचे त्यांनी सांगितले.

 

५. स्वप्नात एका सत्पुरुषांच्या मूर्तीच्या चरणांवर डोके टेकवल्यावर त्या सत्पुरुषांनी आशीर्वाद देणे आणि नंतर सर्व कृतींचा अर्थ उलगडणे

५ अ. स्वप्नात एका सत्पुरुषांची मूर्ती दिसणे आणि त्यांची कृपा
झालेल्या व्यक्तीसमोर पाय पुढे करून ते आशीर्वाद देत असल्याचे समजणे

३.७.२०१६ या दिवशी दुपारी विश्रांती घेत असता साधारण ३.३५ वाजता मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी आणि एक साधिका पलंगावर झोपलो होतो. त्याच खोलीत समोर एका सत्पुरुषांची ३ – ४ फूट उंचीची पितळ्याची एक मूर्ती होती. काही भक्त येऊन त्या मूर्तीचे दर्शन घेत होते. मला (स्वप्नातच) त्या मूर्तीबद्दल असे कळले होते की, ते ज्यांच्यावर कृपा करतात, त्याच्यासमोर ते स्वतः मूर्तीच्या माध्यमातून आपले चरण पुढे करून आशीर्वाद देतात.

५ आ. ‘मूर्तीसमोर गाऊन नृत्य करावे’, असे वाटणे, मूर्तीने जवळ बोलावणे
आणि जवळ गेल्यावर मूर्तीने दोन्ही पाय समोर केल्याचे पाहून भावजागृती होणे

काही वेळाने ‘त्या मूर्तीसमोर गाऊन आपण नृत्य करावे’, असे मला अकस्मात् वाटू लागले. त्या आनंदात (स्वप्नातच) मी उठून बसले आणि तोंडवळ्यावर हास्य आणून त्या मूर्तीकडे एकटक पाहू लागले. ती मूर्तीही माझ्याकडे पहात होती. तेवढ्यात त्या बाबांच्या दर्शनाची वेळ संपली; म्हणून त्यांचे भक्त त्या मूर्तीचा तोंडवळा झाकायला लागले. तेवढ्यात त्या मूर्तीने ‘झाकू नका’, असे म्हणून आपले डोके हलवले आणि दृष्टीनेच खुणावून मला त्यांच्याकडे बोलावले. त्याप्रमाणे मी उठले आणि मूर्तीजवळ जाऊ लागले. तोच त्या मूर्तीने तिचे दोन्ही पाय माझ्यासमोर केले. तेव्हा माझी भावजागृती झाली.

५ इ. भ्रूमध्य मूर्तीच्या चरणाच्या अंगठ्यावर
टेकवताच आतून हलल्यासारखे जाणवणे आणि जाग येणे

मी त्या चांदीच्या खडावा असलेल्या चरणांवर डोके टेकवले. तेव्हा त्या मूर्तीने आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर ठेवला. मी भ्रूमध्य चरणाच्या अंगठ्यावर टेकवताच जणू माझ्या आत भूकंपच झाल्याप्रमाणे आतून प्रचंड हलल्यासारखे आणि गोल फिरल्यासारखे मला जाणवले. काही क्षण मी त्याच स्थितीत होते. त्यानंतर आपोआप माझे डोळे उघडून मी जागी झाले.

५ ई. गुरुतत्त्वाने या स्वप्नाद्वारे संगीतसाधनेसाठी कुंडलिनी जागृत
करून दिली असल्याचे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे

वरील स्वप्न सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना सांगितल्यावर त्यांनी या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि ही अनुभूती असल्याचेही सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘या अनुभूतीच्या माध्यमातून गुरुतत्त्वाने संगीताच्या पुढील साधनेसाठी तुझी कुंडलिनी जागृत करून दिली. त्यामुळे तुला हलल्यासारखे जाणवले. आता पुढे पुढे संगीतामध्ये तुला कार्य करायचे आहे. त्यासाठी आतून उत्तर येणे, सूक्ष्म जाणणे इत्यादी गोष्टी यामुळे साध्य होऊ शकतील. गुरुपौर्णिमाही जवळच आहे. त्यामुळे गुरुतत्त्वानेेच तुला दिलेली ही पुष्कळच छान अनुभूती आहे. या ठिकाणी मूर्तीरूप गुरु म्हणजे गुरुतत्त्वाचे निर्गुण रूप आहे.’’

५ उ. उपाय करतांना अनुभूतीचे स्मरण होऊन अनुभूतीतील कृतींचा अर्थ लक्षात येणे

उपायांकरता २६.७.२०१६ या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा अकस्मात् स्वप्नात एका सत्पुरुषांच्या मूर्तीच्या चरणांवर डोके टेकवल्यावर त्या सत्पुरुषांनी आशीर्वाद दिल्याच्या अनुभूतीचे मला स्मरण झाले. त्या वेळी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी कुंडलिनीजागृतीविषयी सांगितलेले आठवले आणि या अनुभूतीतील कृतींचा अर्थ आपोआप लक्षात आला. आरंभी मी पलंगावर झोपलेे होते, म्हणजे कुंडलिनी निद्रिस्त अवस्थेत होती. मूर्तीसमोर गायन आणि नृत्य करावे, असे वाटणे, म्हणजे संगीत-साधनेसाठी पूर्ण प्रयत्न करावेसेे वाटणे, कृतीशील होणे. हेे केवळ गुरूंच्या कृपेमुळेच होत असल्याने त्यांच्या चरणी लीन झाल्यामुळे त्यांनी पुढील साधनेसाठी शक्ती जागृत करून दिली.

संक्षेपाने माझ्या झोपण्याच्या कृतीपासून उठून बसणे, गायन-नृत्य करणे आणि चरणांवर डोके ठेवणे, या कृती निद्रिस्त अवस्थेतील कुंडलिनीजागृतीच्या स्थूल दृष्टीशी साधर्म्य दाखवते, असे वाटले.

 

६. संगीत साधनेतील विविध टप्प्यांच्या आलेल्या अनुभूती

६ अ. नामजप श्‍वासाला जोडल्याप्रमाणे जाणवणे

सध्या बर्‍याचदा काही रागांचे स्वर-समूह गुणगुणत असतांना माझे मन एकदम एकाग्र होते. माझे लक्ष श्‍वासावर केंद्रित होते. शांत वाटते. त्या वेळी मनातून तीव्रतेने जाणवते, या स्वरांमध्ये पूर्णपणे मिसळून जावे. आपले आता अस्तित्वच उरायला नको. नामजप श्‍वासाला जोडल्यावर जाणवते, तसेच इथे जाणवते.

तेजल : नामजप आणि संगीत दोन्ही आकाश तत्त्वाशी निगडित असल्याने असे जाणवते का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो

तेजल : नामाप्रमाणेच स्वराचे कार्य निर्गुण अधिक असल्याने असे जाणवते का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : हो

६ आ. स्वर आळवतांना जेमतेम चार-पाच स्वर आळवल्यावर
कंठ दाटून येणे आणि स्वरांमधील आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात येणे

काही वेळा स्वर आळवतांना जेमतेम चार-पाच स्वर आळवल्यावर कंठ दाटून येतो आणि पुढचे स्वरच उच्चारता येत नाहीत. अशी भावावस्था मला बर्‍याचदा अनुभवायला येते. यावरून स्वरांमध्ये असलेले आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात येते.

या अनुभूतींविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, संगीत ही आकाश तत्त्वाची साधना आहे. त्यामुळे आपल्याला या स्वरांमध्ये हरवून जायला होतं. या अनुभूती म्हणजे संगीत साधनेतील विविध टप्पेच आहेत.

 

७. नुसते स्वर, शब्दांतील अर्थ आणि नुसते शब्द यांमधील अनुभवलेला भेद

७ अ. केवळ स्वर आळवतांना भावजागृती लगेच होणे

मी एक प्रयोग केला. या प्रयोगात आरंभी काही वेळ मी मालकंस रागाचे स्वर आळवले. तेव्हा काही वेळातच माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. स्वरांशी निर्गुणातून एकरूप व्हावेसे वाटायला लागले.

७ आ. गीतातील शब्दांच्या अर्थाकडे
लक्ष देऊन गीत गातांना काही प्रमाणात भावजागृती होणे

त्यानंतर काही वेळ गेल्यावर मन तडपत हरिदर्शन को आज… हे त्याच (मालकंस) रागातील गीत गुणगुणले. या वेळी स्वरांच्या आळवण्याच्या तुलनेत स्वरांकडे लक्ष अल्प गेले आणि गीतातील शब्दांच्या अर्थावर लक्ष एकाग्र होऊन काही वेळाने भावजागृती झाली.

७ इ. केवळ शब्दांकडे लक्ष दिल्याने भावजागृती न होणे

शेवटी मालकंस रागातील कोयलीया बोले अंबुवा के डाल पर.. ही बंदीश म्हटली. या वेळी भावजागृती झाली नाही.

हा प्रयोग झाल्यावर असे वाटले, केवळ शब्दांमध्ये जडत्व अधिक आहे. त्यापेक्षा अर्थासह शब्दांमध्ये हे जडत्व अल्प प्रमाणात आहे, तर स्वर सर्वांत सूक्ष्म आहे. त्यामुळे सूक्ष्म स्वर आळवतांना भावजागृती सहजपणे झाली. यातूनच स्वरांचे सामर्थ्यही लक्षात आले.

 

८. शिवपिंडीवर नामजपाच्या अभिषेकाचा भावप्रयोग करतांना आलेल्या संगीताविषयीच्या अनुभूती आणि त्यांचा जाणवलेला अर्थ

८ अ. सूक्ष्मातून सप्त स्वरांची पुष्पे घेऊन कैलास पर्वतावर पोहोेचणे, ही पुष्पे आपल्या
चरणी अर्पण करवून घ्यावीत, अशी शिवाला प्रार्थना होणे आणि शिवाने ते सात स्वर स्वीकारल्याचे जाणवणे

८.१.२०१७ या दिवशी झालेल्या भावसत्संगात शिवपिंडीवर नामजपाच्या अभिषेकाचा एक भावप्रयोग करायला सांगितला होता. हा प्रयोग करण्यासाठी डोळे मिटल्यावर सूक्ष्मातून मी हातात ७ स्वररूपी पुष्पे घेऊन कैलास पर्वतावर पोहोचलेली दिसले. त्या वेळी भगवान शिव ध्यानस्थ बसला होता. त्याला पहाताच ही पुष्पे आपल्या चरणी अर्पण करून घ्यावीत, अशी मी त्यांना आर्तभावाने प्रार्थना केली. त्याच भावस्थितीत मी नृत्यही करू लागले. अत्यंत भावविभोर अवस्था होती ती ! ते ७ स्वर आणि नृत्य यांत माझे अस्तित्वच नव्हते. अकस्मात् कानांवर शब्द आले, आता कृतज्ञता व्यक्त करूया. तेव्हा नृत्य थांबवून मी ती सप्त स्वरांची ओजळ भगवान शिवाच्या चरणी अर्पण केली. त्याबरोबर शिवाने ध्यानातून जागृतावस्थेत येऊन माझे सप्त स्वर स्वीकारल्याचे जाणवले.

८ आ. त्याच वेळी माझ्या कानांमध्ये अकस्मात् मुरलीचे सुमधुर स्वर ऐकायला येऊ लागले. तेव्हा मी एका वेगळ्याच भावस्थितीत होते.

८ इ. अनुभूतींचा जाणवलेला अर्थ

८ इ १. शिव ही सर्व कलांची देवता असल्यामुळे स्वरांनीच तिला आळवले जाणे 

या अनुभूतीचा नंतर विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आता संगीताच्या माध्यमातून साधना करायला सांगितले आहे. शिव ही संगीतासह सर्व कलांची देवता आहे. त्यामुळे स्वरांनीच तिला आळवले गेले.

८ इ २. संगीतामध्ये गायन, वादन आणि नृत्य या तिन्हींचा समावेेश असल्यामुळे नृत्य करणे

नंतर विचार आला, मी नृत्याऐवजी केवळ गाऊन का नाही शिवाला आळवले ? त्याचे उत्तर आले, संगीतामध्ये गायन, वादन आणि नृत्य या तिन्हींचा समावेेश आहे. त्यामुळे या तीनही गोष्टी एकत्रित करून संगीताच्या माध्यमातून शिवाला आळवले गेले.

८ इ ३. बासरीचा नाद हा अनाहत नाद असून संगीत-साधनेच्या माध्यमातून अनाहत नादाचीच अनुभूती घ्यायची असते, असे देवाने सांगणे

त्यानंतर माझ्या मनात आणखी एक प्रश्‍न आला, शिवाच्या ठिकाणी कृष्णाच्या बासरीचे स्वर मला कसे ऐकू आले ? त्याचे उत्तर देवाने सांगितले, बासरीचा नाद हा अनाहत नाद आहे. संगीत साधनेच्या माध्यमातून आकाश तत्त्वाची, अनाहत नादाचीच अनुभूती घ्यायची असते. ती या अनुभूतीतून शिवाच्या कृपेमुळे मला घेता आली.

८ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी सांगितलेल्या वाक्याचे स्मरण होऊन भावजागृती होणे

एकदा संगीत या विषयावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निरोप पाठवला होता, आतापर्यंत कृष्णाच्या विविध अनुभूती आल्या. आता संगीतातून त्याच्या बासरीचे सूरही ऐकायचे आहेत ना ! त्यांच्या या वाक्याची मला या वेळी प्रकर्षाने आठवण होऊन माझी भावजागृती झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान शिव यांच्या कृपेमुळेच ही अनुभूती आली, यासाठी त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता !

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात