सुराज्य अभियानाच्या माध्यमातून सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा द्या ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

कोल्हापूर येथे हिंदु धर्माभिमान्यांसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन !

हिंदु राष्ट्र संघटक या कार्यशाळेत सहभागी झालेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर : येथील विश्‍वपंढरी कार्यालयात ३० आणि ३१ जुलैला हिंदु धर्माभिमान्यांसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील पारंगाव, इचलकरंजी, केर्ले, शिये, कागल, हुपरी आणि निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यशाळेचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी या शिबिराचा उद्देश सांगितला. कार्यशाळेत साधनेचे महत्त्व, गुरुकृपायोगानुसार साधना, स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया, प्रार्थनेचे महत्त्व, आदर्श धर्मशिक्षण वर्ग कसा घ्यावा, सुराज्य अभियान, प्रभावीपणे हिंदूंचे संघटन कसे करावे, या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच प्रायोगिक भागातून साधनेची माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विपुल भोपळे यांनी केले.

धर्मसभा आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलन हे हिंदू संघटनाचे प्रभावी
माध्यम ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

अल्पावधीत धर्मप्रेमींना जागृत आणि संघटित करण्यासाठी धर्मसभा हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून धर्मप्रेमींमध्ये राष्ट्र आणि धर्म या विषयी स्वाभिमान निर्माण होऊन ते कृतीशील झाले आहेत. आपल्याला अशा सभांचे आयोजन प्रत्येक गावात करायचे आहे. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक आणि राष्ट्रीय समस्यांविषयी वाचा फोडण्यात येते. प्रत्येक भागात हे आंदोलन करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करूया.

सुराज्य अभियानाच्या माध्यमातून सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या
विरोधात लढा द्या ! –  चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करतांना समाजातील प्रत्येक घटकाला संघटित करून दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देणे, ही काळाची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था या सर्वांचा अभ्यास केल्यास सर्वत्र अनैतिकता, अनाचार, अन्याय, भ्रष्टाचार पहायला मिळतो. वीज, अन्न, पाणी, रस्ते या मूलभूत आवश्यकतांसाठी देखील सामान्यांना लढावे लागत आहे. हे लोकशाहीचे अपयश आहे. आपल्याला सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक हित जपणारे राष्ट्र म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय समस्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी सिद्ध होऊया.

हिंदुत्वाचे कार्य करतांना साधना करणे आवश्यक आहे !
– आधुनिक वैद्या, सौ. शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प्रत्येक धर्मप्रेमीने साधना करून आत्मबळ वाढवायला हवे. आध्यात्मिक बळ असल्यास हिंदू संघटनाचे कार्य प्रभावीपणे करता येते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जलद आध्यात्मिक उन्नती होते.

हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेले मनोगत

दोन दिवसांच्या कार्यशाळेत अमूल्य धर्मशिक्षण
मिळाले ! – श्री. गोविंदराव देशपांडे (वय ७१ वर्षे), कोल्हापूर

मी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी असतो. ११ वर्षांपासून हे पुण्यकाम करण्याची संधी मिळाली आहे. स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन, हिंदू म्हणून माझे वर्तन कसे असायला हवे, हे या कार्यशाळेत शिकायला मिळाले. हिंदूंना नामजप, प्रार्थना आणि आरती कशी करावी, याचे अमूल्य शिक्षण कुठेही मिळत नाही; मात्र कार्यशाळेत हे मिळाले.

दोन दिवसांच्या कार्यशाळेतून दैनंदिन जीवनातील अडचणी
समजल्या ! – श्री. अमोल चेंडके (निपाणी, जिल्हा बेळगाव), श्री संप्रदाय

गेल्या १२ वर्षांपासून हिंदु धर्माच्या कार्यात मी सहभागी आहे. वर्ष २००५ पासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातही मी जाऊन आलो आहे. धर्मकार्य करतांना येणार्‍या अडचणींमुळे मी कार्य करायचे थांबवले होते. मी चुकीच्या दिशेने कार्य करत होतो. पूर्वी मी कार्य करतांना संघटना आणि समाजातील लोकांना काय वाटेल, असे विचार येत होते; मात्र आता मी ईश्‍वराला काय वाटेल, असा विचार करतो. मी ग्रामीण भागातून आलो आहे. माझे वागणे आणि बोलणे वेगळे असले, तरी सर्वांनी मातृत्वाच्या भावनेतून मला सांभाळले. येथे येऊन साधनेचे महत्त्व कळले. दैनंदिन जीवनातील अडचणी कोणत्या आहेत, याची जाणीव झाली. तसेच कार्यशाळेतून भावजागृती झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात