धुळे येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना
अपमानास्पद वागणूक देणार्‍या पाकला कायमचा धडा शिकवा !

धुळे – पाकच्या कह्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन मानवतेला काळीमा फासला आहे. त्याच्या निषेधार्थ ३० डिसेंबर या दिवशी धुळे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने करत ‘पाकला कायमचा धडा शिकवावा’, अशी मागणी भारत सरकारकडे केली. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या धुळे येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदू एकता आंदोलन, सनातन संस्था आणि अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

या वेळी मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवतांना आईला साडी पालटून अन्य वस्त्रांमध्ये येण्यास, तसेच कुंकू पुसण्यास सांगण्यात आले. यातून पाकिस्तानचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो. भेट झाल्यानंतरही जाणीवपूर्वक त्यांना पत्रकारांच्या समोर काही काळ थांबवण्यात आले आणि पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांना अवमानकारक प्रश्‍न विचारून त्यांचा अवमान करण्यात आला. आजवर भारतात शेकडो पाकिस्तानी हेर, आतंकवादी, घुसखोर, दंगलखोर, तसेच आय.एस्.आय.चे हस्तक सापडले आहेत. तसेच सहस्रोंच्या संख्येने विना व्हिसा वा व्हिसा संपलेल्या स्थितीत असणारे पाकिस्तानी उजळ माथ्याने देशात फिरत आहेत. अशा प्रत्येक पाकिस्तान्याला पकडून त्यांच्यावर देशविरोधी कृत्ये केल्याच्या कलमांखाली सरकारने कठोर कारवाईला आरंभ करावा. भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ हा दर्जा तात्काळ काढून टाकावा. भारतीय लष्कर आणि नागरिक यांवर आक्रमण करणारे पाकचे लष्कर, तसेच पाक पुरस्कृत अतिरेकी यांच्यावर कठोर सैन्यकारवाई करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात