महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान – वर्तमान आधुनिक युग में अनुप्रयोग’ विषयावर शोधप्रबंध सादर

नवी देहली येथे ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान’ या विषयावर कार्यशाळा

शोधप्रबंध सादर करतांना डावीकडून सौ. संदीप कौर मुंजाल आणि कु. कृतिका खत्री

नवी देहली : येथे अश्‍विन ट्रस्ट आणि वेदश्री ट्रस्ट यांच्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान’ या विषयावर २ दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी लिहिलेला ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान – वर्तमान आधुनिक युग में अनुप्रयोग’ (प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाचा वर्तमान आधुनिक युगात होणारा व्यावहारिक उपयोग) या विषयावरील शोधप्रबंध सादर करण्यात आला.

‘वेदश्री वैदिक विज्ञान विश्‍वविद्यालया’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होेते. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कु. कृतिका खत्री यांनी हा शोधप्रबंध सादर केला. या शोधप्रबंधाच्या माध्यमातून ‘प्राचीन काळात ऋषिमुनींना प्राप्त झालेले ज्ञानच आजच्या काळात श्रेष्ठ असल्याचे पुन्हा विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध होत आहे’, हे स्पष्ट करण्यात आले. शोधप्रबंध सादर करतांना अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. संदीप कौर मुंजाल याही उपस्थित होत्या.

क्षणचित्रे
१. श्री. पी.व्ही.एन्. मूर्ती यांनी हा शोधप्रबंध सादर करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला संधी दिली.

२. या वेळी मेणबत्ती आणि देशी गायीच्या तुपाचा दिवा यांचा प्रयोग करून घेण्यात आला. या समवेतच मांसाहारी आहारापेक्षा शाकाहारी आहार सात्त्विक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

३. उपस्थितांना शोधप्रबंध अतिशय आवडला. याविषयी त्यांनी जिज्ञासापूर्वक प्रश्‍न विचारले. काही विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक विषय ऐकून ‘अध्यात्माचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो’, याविषयी चर्चा केली.

४. या कार्यशाळेत ‘वैदिक वैज्ञानिक ज्ञान’ या नियतकालिकाचे अनावरण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात