डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्यासाठी लक्ष घालणार ! – गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वत:हून डॉ.
झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालणे अपेक्षित आहे !

डावीकडून श्री. हंसराज अहिर, श्री. अभय वर्तक, सनातन संस्था, श्री. कार्तिक साळुंके आणि श्री. श्रीराम काणे

नवी देहली : हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने येथे गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर यांची भेट घेऊन डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्याची मागणी केली. डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारत सरकारने यूएपीए कायद्याद्वारे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संस्थेने प्रचार-प्रसार करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असूनही सामाजिक माध्यमांद्वारे डॉ. झाकीर संपूर्ण भारतात प्रचार आणि प्रसार करत आहेत. फेसबूक, टि्वटर  खाते आणि अवैध केबल वाहिन्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रसार चालू आहे, हेेे गृहराज्यमंत्र्यांना पुराव्यासह लक्षात आणून देण्यात आले. डॉ. झाकीर यांच्या प्रसाराचे अंग बनलेल्या सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या प्रसारावर तत्परतेने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी समितीने निवेदनाद्वारे केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, देहलीचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंके, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि श्री. संजीव कुमार हे उपस्थित होते.

सनी लिओन यांच्या संकेतस्थळावर बंदी
घालण्याची रणरागिणी शाखेची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

डावीकडून श्री. हंसराज अहिर, सौ. माला कुमार आणि कु. टुपुर भट्टाचार्य, श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेनेही या वेळी गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर यांची भेट घेतली. सनी लिऑन या अश्‍लील चित्रपटात काम करणार्‍या अभिनेत्रीने भारतात अवैधरित्या संकेतस्थळ चालू ठेवले आहे. सनी लिऑन ही स्त्रीजातीसाठी कलंकच आहे, अशी भावना रणरागिणी शाखेच्या देहली येथील सौ. माला कुमार आणि कु. टुपुर भट्टाचार्य यांनी मंत्रीमहोदयांकडे व्यक्त केली.

सनी लिऑनच्या विरोधात अश्‍लीलता पसरवल्याविषयी ठाणे जिल्ह्यात गुन्हा नोंदवण्यात येऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे या वेळी गृराज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सनी लिऑन या संकेतस्थळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे.

या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात यावी, या व्यवहारात गुन्हेगारी संबंध आहेत का ?, हेदेखील तपासावे आणि तिला या अवैध कार्यात साहाय्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आणि सर्व पुराव्यांसह सरकारकडे करण्यात आली आहे. ‘या प्रकारणी गांभीर्याने लक्ष घालू’, असे आश्‍वासन श्री. हंसराज अहिर यांनी दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात