गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष भावसत्संग
आपत्काळ जसा जवळ येऊ लागला आहे, तशी सर्व साधकांची भावजागृती होऊन त्यांना अधिक काळ भावावस्थेत रहाता यावे आणि साधकांची शीघ्रातीशीघ्र आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी दयाळू, कनवाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रती आठवड्याला २ घंटे भावसत्संग चालू करण्यास सांगितले. सर्व साधकांना याचा लाभ घेता यावा, यासाठी हे सत्संग संस्था स्तरावर ऐकवले जातात. या सत्संगांतून भावपूर्ण प्रार्थना करवून घेतल्या जातात, भावजागृतीसाठी भावाचे प्रयोग करवून घेतले जातात आणि स्वभावदोषांवर योग्य दृष्टीकोन देऊन शंकानिरसन अन् मार्गदर्शन केले जाते. यातून साधकांना साधनेची दिशा मिळते. सत्संगात घेतलेल्या भावाच्या प्रयोगांमुळे साधकांची भावजागृती होते आणि साधक दिवसभरात भावजागृतीसाठी प्रयत्न करतात. याचा लाभ घरी राहून साधना करणारे साधक, अर्धवेळ सेवा करणारे साधक, प्रसारात राहून पूर्णवेळ सेवा करणारे साधक आणि आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारे साधक करून घेत आहेत. या सत्संगातून साधकांना सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचे अनमोल मार्गदर्शन मिळाले आहे. ७.६.२०१७ या दिवशी झालेला भावसत्संग सौ. कीर्ती जाधव, कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे, कु. योगिता पालन आणि कु. वैष्णवी वेसणेकर या साधिकांनी घेतला.

७. अर्धवेळ सेवा करणार्या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे
७ अ. भान हरपून सेवा करूया !
आपल्याला जेवढा वेळ सेवेसाठी मिळाला आहे, त्या वेळेत मनापासून सेवा कशी करायची ? भान हरपून सेवा कशी करायची ?, असे आपल्याला वाटायला हवे. श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी केवळ साधकच नव्हे, तर चराचर सृष्टीही आतुर झाली आहे, तत्पर झाली आहे, हे आपण अनुभवलेच आहे. मग प्रत्यक्ष श्रीगुरूंनीच त्यांच्या सेवेसाठी आपल्याला आणले आहे, तर आपण किती भाग्यवान जीव आहोत ? आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार श्रीगुरूंच्या या कार्यात सहभागी होतच आहोत. प्रत्येक जण गुरुसेवेतील भरभरून आनंद घेत आहे.
७ आ. आपण जेथे नोकरी करतो, तेथे काम म्हणून न
पहाता तीही गुरुसेवाच आहे या भावाने करण्याचा प्रयत्न करूया !
यापुढे आपल्याला जेवढा वेळ श्रीगुरूंनी दिला आहे, तेवढा वेळ मनापासून गुरुसेवा करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. श्रीगुरूंच्या कृपेने मिळालेला प्रत्येक क्षण गुरूंना अर्पण करून आपल्या सेवेची आणि वेळेची फलनिष्पत्ती वाढवण्याचा प्रयत्न करूया. आपल्यातील भावामुळे ती फलनिष्पत्ती वाढणार आहे. त्यागात मिळणार्या आनंदामुळे आपल्या मनाला सतत सेवा करूया असे वाटत असते; परंतु काही अडचणींमुळे आपल्याला हे शक्य होत नाही. अशा वेळी आहे ती स्थिती स्वीकारून मिळालेल्या सेवेतून आनंद घेऊया. आपण जिथे नोकरी करतो, तिथे पहाण्याचा दृष्टीकोन पालटायला हवा. तिथे काम म्हणून न पहाता तीही गुरुसेवाच आहे या भावाने करण्याचा प्रयत्न करूया.
८. प्रसारातील सेवा अथवा प्रसारात
पूर्णवेळ सेवा करणार्या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे
८ अ. मनावर नामाचा संस्कार करणे
गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या मनावर कृतज्ञतेचा संस्कार बिंबवण्याचा हा दिवस आहे. तो संस्कार आपल्या मनावर कसा होणार ? त्यासाठी काय करायला हवे ?, ते आपण आता पाहूया. नामजपाचे उदाहरण पाहूया. आपण नामजप करत असतो, तेव्हा आपला नामजप होत नाही. त्याचा आपल्याला विसर पडतो किंवा तो प्रयत्नपूर्वक करायला लागतो. मग आपण जपमाळ अथवा काऊंटर घेऊन पुटपुटत जप करतो. असे नियमितपणे केल्याने आपला जप सातत्याने होऊ लागतो. पुढे पुढे नामाचा विसर न पडता आपोआप जप व्हायला लागतो. त्याही पुढे जाऊन सेवा किंवा कोणतीही कृती करत असतांना आपल्या लक्षात येते की, आपला जप चालू आहे. सातत्याने प्रयत्न केल्याने आपल्या मनावर नामाचा संस्कार होतो.
८ आ. प्रत्येक कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे
त्याचप्रमाणे कृतज्ञतेचा संस्कार आपल्या मनावर होण्यासाठी या क्षणापासूनच आपल्याला आरंभ करायचा आहे. काहींनी प्रयत्न चालू केले असतील, तर त्यांना गती द्यायची आहे. प्रत्येकच कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या गुरुपौर्णिमेचे नियोजन या व्यापक अशा श्रीविष्णूनेच केले आहे. पृथ्वीवरील जिवांपर्यंत तोच आपल्याला नेणार आहे.
८ इ. भगवंताने दिलेली कृतज्ञता पुष्पे समवेत घेऊन प्रसाराला जाऊया !
प्रसारात जाण्यासाठी आपल्याला चैतन्यमय अशी सात्त्विक उत्पादने, नियतकालिके, ग्रंथ हे सर्व दिले आहे. त्याच वेळी त्यांनी आपल्याला आणखी काय दिले आहे ? आपल्याला ब्रह्मांडनायक श्रीविष्णूने या भावसत्संगाच्या माध्यमातून पुष्कळ सुंदर अशी कृतज्ञता पुष्पे दिली आहेत. ती कृतज्ञता पुष्पे घेऊनच आपल्याला सेवेसाठी बाहेर पडायचे आहे, कृतज्ञता पुष्पे न विसरता घेऊन जाऊया, नाहीतर कर्तेपणा लगेच जागृत होईल. भगवंताने आपल्याला असंख्य, न संपणारी फुले दिली आहेत.
८ ई. सेवेअंतर्गत प्रत्येक सूत्र झाल्यावर कृतज्ञता पुष्पे देवाच्या चरणी अर्पण करूया !
भगवंताने ईश्वराची स्तुती समाजाला सांगण्यासाठी आपली निवड केली. प्रसारात एका घरात माहिती सांगून झाली की, आपल्याला कृतज्ञता पुष्पे अर्पण करायची आहेत. सेवेअंतर्गत प्रत्येक सूत्र झाल्यावर, वितरण झाले, काही अर्पण मिळाले की, लगेच आपल्याला कृतज्ञता पुष्पे देवाच्या चरणी अर्पण करायची आहेत. जे जे साहित्य, उत्पादने आपल्याला साहाय्य करत असतात, त्यांनाही आपल्याला ही फुले अर्पण करायची आहेत.
८ उ. ही कृतज्ञता पुष्पे जेवढ्या भावाने आपण
अर्पण करू, तेवढा तेथे ईश्वराचा दैवी सुगंध दरवळणार आहे !
कृतज्ञता पुष्पे भगवंताच्या चरणी अर्पण केल्यावर दरवळणारा दैवी सुगंध आपल्यातील आत्म्याला स्पर्श करून आपल्यातील कृतज्ञताभाव वाढणार आहे. श्रीविष्णूने दिलेले ही दैवी कृतज्ञतेची पुष्पे आपण अर्पण न करता स्वतःजवळच ठेवली, तर ती फुले कोमेजतील. ती स्वकोश आणि स्वविचार यांत अडकून रहातील. आपल्याला ही फुले कोमेजू द्यायची नाहीत, असे वाटत असेल, तर ती फुले टवटवीत रहाण्यासाठी एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे ती फुले भगवंताच्या चरणी अर्पण करणे.
८ ऊ. येणार्या प्रत्येक प्रसंगात स्थिर राहून
ते स्वीकारूया आणि तेथेही कृतज्ञता पुष्पे अर्पण करूया !
एखाद्याच्या जीवनात गुरु येतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काहीच वाईट घडत नाही. जे काही घडते, ते शिष्याच्या केवळ हितासाठीच घडत असते. प्रसाराला जातांना आपल्या समवेत सहसाधक असो वा नसो, तरी प्रसाराला जाण्यातच आपले हित आहे. हे नियोजनही श्रीविष्णूनेच केलेले आहे, या भावाच्या स्तरावर राहून जी काही परिस्थिती आपल्यासमोर येईल, जे काही प्रसंग आपल्यासमोर येतील, त्यांमध्ये तसेच स्थिर राहूया, त्यांना स्वीकारूया आणि तेथेही आपण कृतज्ञता पुष्पे अर्पण करूया.
९. श्रीमन्नारायणाच्या कृपेविषयी मनात
अखंड कृतज्ञता रहाण्यासाठी करावयाची प्रार्थना !
साक्षात् श्रीमन्नारायण या भूतलावर परात्पर गुरुदेवांच्या रूपात अवतरले आहेत. त्यांच्या चरणी शरण जाऊन आर्ततेने प्रार्थना करूया. हे दयाघना, तू पुष्कळ दयाळू आणि कृपाळू आहेस. तू आमच्यासाठी सर्वकाही अखंड करतच असतोस. तू करत असलेल्या कृपेविषयी, तू आमच्यासाठी घेत असलेल्या कष्टाविषयी आमच्या मनात अखंड कृतज्ञता राहू दे. ही कृतज्ञता आमच्या अंतर्मनात कोरली जाऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रसारात जाऊन सेवा करणार आहोत. समाजातल्या प्रत्येक घराघरात जाऊन आपल्याला हा प्रसार करायचा आहे. आपण हे प्रतिवर्षी करतच असतो. या वर्षी आणखी काय भाव ठेवूया ?
१०. प्रसाराला जातांना भाव कसा ठेवावा ?
अ. प्रसाराला जातांना ‘प्रसार म्हणजे गुरुचैतन्याचा प्रसार करायचा आहे’, हा भाव मनात ठेवून आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचूया.
आ. ‘प्रत्येक घरापर्यंत गुरूंचे चैतन्य आणि गुरूंची महती (कार्याची महती, अवतारत्वाची नव्हे) सांगायची आहे’, या भावाने जाऊया.
इ. श्रीगुरु अवतारी रूपात सार्या सृष्टीचा उद्धार करण्यासाठी आले आहेत. आपल्या सर्वांना हे समजू लागले आहे. हेच आपल्याला समाजाला समजावण्यासाठी एक दूत बनून जायचे आहे.
ई. गुरूंची ही महती विश्वभर पोहोचवण्यासाठी गुरूंनी आपल्याला माध्यम केले आहे. हा कृतज्ञताभाव ठेवून जाऊया.
उ. गुरूंनी आपल्याला प्रसारात जातांना त्यांचे चैतन्य आणि त्यांचा ज्ञानाचा ठेवा आपल्याला समवेत दिला आहे. त्यांनी दिलेला हा मोलाचा ठेवा समाजाला जागृत करण्यासाठी आपण अत्यंत कृतज्ञताभावाने समवेत घेऊन जाऊया.
ऊ. प्रत्येक जिवाला आपण जी काही माहिती सांगणार आहोत, आपण ग्रंथ आणि उत्पादने दाखवणार आहोत, ती अत्यंत नम्रपणे, गुरूंप्रतीच्या भावाने ओतप्रोत भरलेल्या वाणीने दाखवूया.
ए. ज्या भगवंताने सृष्टीची निर्मिती केली, त्याच्या चरणी सर्वस्व अर्पण करायचे आहे. श्रीगुरूंच्या कृपेने आपल्याला ‘त्यागामध्ये काय आनंद आहे’, ते कळलेलेच आहे. तो आनंद समाजाला कळावा, यासाठी आपण त्यांना गुरूंच्या कार्यासाठी अर्पण देण्याचे महत्त्व सांगूया.
११. समाजात प्रसाराला जातांना अनुसंधान कसे साधता येईल ?
११ अ. प्रसाराला समाजात गेल्यावर प्रत्येक
प्रसंगात मन स्थिर आणि श्रीगुरूंच्या अनुसंधानात ठेवावे !
हे सांगत असतांना काही ठिकाणी आपल्याला चांगले अनुभव येतील, तर काही ठिकाणी कटू अनुभव येतील. या प्रत्येक प्रसंगात आपले मन स्थिर आणि श्रीगुरूंच्या अनुसंधानात राहील, यासाठी प्रयत्न करूया.
११ आ. श्रीकृष्णाला भेटण्यासाठी सुदामा ज्या
आर्ततेने आणि व्याकुळतेने गेला, तो भाव मनी बाळगूया !
आपल्या सर्वांना द्वापरयुगातील एक गोष्ट ठाऊक आहे. श्रीकृष्णाचा परम मित्र असलेला सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जातांना त्याला अनेक अडथळे आले. आताच्या कलियुगामध्येही भगवंताकडे जाण्यात अनेक अडथळे आहेत. भगवंताकडे घेऊन जाणार्या आपल्या सेवेमध्येही अनेक अडथळे येतील. सुदाम्यामध्ये व्याकुळता होती, त्यामुळे त्याचा श्रीकृष्णसखा त्याच्या भावभेटीसाठी सारे काही विसरून धावत आला होता. तीच व्याकुळता, तीच आर्तता आपण आपल्या मनात ठेवूया. ही आर्तता वाढल्यावर आपल्या मनात आनंदस्वरूप भगवंत हळूच येणार आहे. त्याचे ते आनंदस्वरूप अस्तित्व भरभरून घेऊया.
११ इ. मध्येमध्ये कृतज्ञता व्यक्त करूया !
प्रत्येक जिवापर्यंत जात असतांना आपल्याला देह, मन, बुद्धी आणि वाणी या गुरूंच्या चरणी झिजवण्याची संधी मिळाली आहे. आपल्या उद्धारासाठी मिळालेल्या या संधीबद्दल आपण सेवा करतांना मध्येमध्येे कृतज्ञता व्यक्त करूया.
११ ई. आपल्याकडून झालेल्या प्रत्येक सेवेचे कर्तेपण श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करूया !
११ उ. दिवसभरातील केलेल्या सेवेचे चिंतन करूया ! : दिवसभरात श्रीगुरूंनी आपल्याकडून जी काही सेवा करवून घेतली, त्यासाठी अखंड कृतज्ञताभावात राहूया. सेवा संपल्यावर आश्रमात, सेवाकेंद्रात किंवा घरी येऊन दिवसभरातील प्रसंगांमध्ये आपल्याला कसा आनंद मिळाला, प्रत्येक प्रसंगाने आपल्याला कसे घडवले, याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करूया.
१२. आश्रमात अथवा सेवाकेंद्रात राहून
पूर्णवेळ सेवा करणार्या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे
आश्रमात पूर्णवेळ रहाणार्या साधकांनी भाव ठेवून भगवंताला कसे अनुभवायचे, हे आता आपण बघूया.
१२ अ. भगवंताने साधकांना सर्व सोयींनी युक्त आश्रम देणे
भगवंताने साधकांना साधना करण्यासाठी या घोर कलियुगातही चैतन्यमय आश्रम आणि सेवाकेंद्रे निर्माण केली आहे. या आपत्काळात भगवंताने आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून भगवंताने साधकांच्या उद्धारासाठी चैतन्याचे पवित्र व्यासपीठ दिले आहे. या पवित्र अशा व्यासपिठाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने कृती करूया.
१२ आ. सहसाधक
त्याच वेळी भगवंताने आपल्याला सहसाधक दिले. ‘साधक म्हणजे गुरूंचे रूप’, हा भाव ठेवून त्यांच्याविषयी कोणताही पूर्वग्रह, कोणतीच अपेक्षा न ठेवता त्यांच्याशी बोलूया. साधकांप्रती मनात सकारात्मकता ठेवून त्यांच्याशी बोलूया.
१२ इ. संत
आपल्याला आश्रमात संतांचा सहवास मिळतो. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळते. त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. या कलियुगात संतांचे दर्शन होणे किती कठीण असते; पण आपल्याला देवाने हे किती सहज उपलब्ध करून दिले, यासाठी मनात कृतज्ञता वाढवूया. दिवसभर त्यांचे चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना वाढवूया.
१२ ई. वस्तू
या आश्रमामध्ये गुरुदेवांनी आपल्याला सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्याच वस्तूची, कोणत्याच गोष्टीची कधीही आपल्याला उणीव भासू दिली नाही. त्यामुळे त्या वस्तू कृतज्ञताभावाने आणि काळजीपूर्वक हाताळूया.