गुरूंच्या अमृतमय आणि चैतन्यमय वाणीचा, तसेच आनंद अन् शांती यांची अनुभूती देणार्‍या भजनांचा समष्टीसाठी संग्रह करणारे शिष्यरूपी प.पू. डॉक्टर !

१. प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनांचे श्रेष्ठत्व
ओळखून ती ध्वनीमुद्रित करण्याचे महत्त्व ओळखणे

(सद्गुरु) श्री. सत्यवान कदम

संत तुकाराम महाराजांचे अभंग, संत तुलसीदास यांनी गायलेले दोहे हे ध्वनीमुद्रणाच्या सोयीअभावी काळाच्या पडद्याआड गेले. मानवजातीची आध्यात्मिकदृष्ट्या हानी झाली. तसे प.पू. बाबांच्या भजनांविषयी होऊ नये, यासाठी प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या सर्व भजनांचा संग्रह करून ती ध्वनीमुद्रित केली. ‘रामायण बोले, महाभारत बोले, भागवत बोले, तो ये भजनही बनेंगे तेरे ।’ ‘गीता बोले, तो यही मिलेगी । ज्ञानेश्‍वरी, भागवतका सार इन भजनोमेंही मिलेगा ।’ प.पू. अनंतानंद साईशांनी प.पू. बाबांच्या भजनांच्या संदर्भात काढलेल्या या उद्गारांतून भजनांचे श्रेष्ठत्व लक्षात येते.

 

२. अनेक भक्तांनी प.पू. भक्तराज महाराजांच्या
भजनांच्या ध्वनीफिती ध्वनीमुद्रणास देण्यास नकार देणे

प.पू. बाबांच्या भक्तांकडे त्यांच्या पूर्वीच्या भजनांच्या कार्यक्रमाच्या ध्वनीफिती असायच्या. प.पू. डॉक्टर विनंती करायचे, ‘‘आम्हाला प.पू. बाबांच्या भजनाच्या ध्वनीफिती द्या’’; परंतु बरेच भक्त नकार देऊन म्हणत, ‘‘तुम्ही बाबांची भजने विकता.’’ एकाने तर ‘‘तुम्ही बाबांची छायाचित्रे (फोटो) विकता; म्हणून मी तुमच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करीन’’, असेही सांगितले. प.पू. बाबांच्या एका भक्ताकडे त्यांच्या भजनाच्या ध्वनीफितींचा संग्रह होता. तो देतच नव्हता. तो म्हणाला, ‘‘तुम्हाला हवे असल्यास घरी या आणि त्याच्या प्रती काढा. मी मूळ प्रती तुम्हाला देणार नाही.’’ ध्वनीफितींच्या प्रती काढण्यासाठी एका साधकाला प्रतिदिन ६० कि.मी. प्रवास करावा लागायचा. एक आठवडा असे चालू होते. भक्तांच्या ध्वनीफितींच्या संचातून जवळजवळ ३०० ते ४०० हून अधिक ध्वनीफिती ऐकून त्यातील चांगली भजने प.पू. डॉक्टरांनी निवडलेली होती.

३. प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराज भजने
म्हणतांना त्यांचे ध्वनीमुद्रीकरण करतांना आलेल्या अडचणी

३ अ. ध्वनीमुद्रणाचे साहित्य नसणे

प.पू. बाबांनी गायलेली सर्व भजने भक्तांकडून मिळाली नाहीत. ती मिळावीत, यासाठी प.पू. डॉक्टरांनी ती प्रत्यक्ष प.पू. बाबा म्हणतांना ध्वनीमुद्रित करण्याचे ठरवले. जेव्हा ते प.पू. बाबांकडे भंडार्‍याला जात, तेव्हा मुंबईहून ध्वनीमुद्रणाची सामग्री घेऊन जात. ते साहित्यही त्यांनी अनेकांकडून मागून आणलेले असे. कोणाकडून ध्वनीक्षेपक, ध्वनीमुद्रक (कॅसेट रेकॉर्डर) घेतलेला असायचा.

३ आ. ऐनवेळी प.पू. भक्तराज महाराजांनी जागा पालटल्याने धावपळ उडणे

प.पू. बाबा जेथे बसून भजन गाणार असतील, त्याच्या जवळपास आम्ही ध्वनीमुद्रणाचे साहित्य लावून ठेवायचो; परंतु प.पू. बाबा दुसरीकडेच बसायचे. त्यामुळे आम्ही सर्व सामग्री घेऊन पळत प.पू. बाबा जेथे बसतील, तेथे लावायचो; परंतु बाबांसमोर ध्वनीक्षेपक (‘माईक’) लावायचा म्हणजे शरिराला दरदरून घाम फुटायचा. अशा वेळी आम्ही दीनवाणी होऊन प.पू. डॉक्टरांकडे पहायचो. ते भक्तवत्सल आमच्या साहाय्याला धावून येत आणि ध्वनीक्षेपक लावत.

३ इ. सूचीप्रमाणे भजने म्हणण्यास वेळ अपुरा पडणे

भजनाचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी प.पू. डॉक्टर हवी असलेल्या भजनांची सूची देत. प.पू. बाबा सूचीप्रमाणे भजने गात. एखादे भजन गायल्यानंतर ते प.पू. डॉक्टरांना विचारायचे, ‘‘भजन चांगले झाले का ? नाहीतर परत गातो.’’ प.पू. बाबा भक्तांना म्हणायचे, ‘‘मुंबईहून ध्वनीक्षेपक (‘माईक’) आला आहे. कोणाला बोलायचे असल्यास बोला. परत माईक येणार नाही.’’ मग काही जण ध्वनीक्षेपकावर येऊन बोलायचे. भजने बाजूलाच रहात. त्यामुळे प.पू. बाबांची दिलेल्या सूचीप्रमाणे सर्व भजने गाऊन होत नसत. उरलेली भजने पुढच्या भंडार्‍यात ध्वनीमुद्रित करावी लागायची.

 

४. प.पू. डॉक्टरांनी ध्वनीमुद्रिकांच्या
संकलनासाठी इतरांकडून सामान मागून
आणणे आणि रात्रभर स्वतः जागून संकलनाची सेवा करणे

ज्या भजनांचे ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण झालेले असायचे, त्यांचे संकलन करण्यासाठी प.पू. डॉक्टर घ्यायचे. आपल्याकडे संकलनाचे साहित्य नसल्याने ते इमारतीमधे रहाणार्‍या शेजार्‍यांकडून सर्व साहित्य रात्री जमा करायचे आणि रात्रभर बसून संकलन करावयाची सूत्रे काढून द्यायचे. संकलन करणार्‍या साधकासमवेत ते रात्रभर बसून सेवा करायचे. काही वेळेला सेवा एका रात्रीत पूर्ण होत नसल्यामुळे ज्यांच्याकडून सामान आणलेले असे, ती व्यक्ती सकाळी यायची आणि ‘‘माझ्या मुलाला चित्रपट पहायचा आहे किंवा गाणे ऐकायचे आहे’’, असे सांगून सर्व साहित्य परत घेऊन जायची. त्यामुळे राहिलेली सेवा पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्या व्यक्तीकडे जाऊन प.पू. डॉक्टरांना सामान देण्याची विनंती करावी लागायची. यावरून आपणा सर्व साधकांना सहज उपलब्ध झालेल्या या भजनांच्या ध्वनीफीती आणि चित्रफिती बनवण्यामागे प.पू. डॉक्टरांनी घेतलेले अपार कष्ट लक्षात येतात. आजही साधकांना वातावरणातील अनिष्ट शक्तींचा त्रास होत असल्यास प.पू. बाबांच्या भजनांमुळे त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय होतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्यातील चैतन्याचा लाभ आजही सर्व साधक घेत आहेत. केवळ प.पू. डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि कृपा यांमुळेच आम्हा सर्व साधकांना प.पू. बाबांची ही अमृतमय, चैतन्यमय, आनंद आणि शांती यांची अनुभूती देणारी भजने ऐकण्यासाठी मिळाली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे.

– (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम, मंगळुरू, कर्नाटक.