धर्म आणि राष्ट्र कार्य करण्यासाठी, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी संघटित व्हावे या उद्देशाने प्रसार

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमांद्वारे धर्मप्रसार

धर्मकार्यासाठी समाजातून भरभरून प्रतिसाद !

पुणे – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिल्ह्यात ७ ठिकाणी आणि पुण्यालगत शिरवळ (जिल्हा सातारा) येथे गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठीचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे. धर्मावर आलेली अवकळा दूर करून धर्माधिष्ठीत समाजाच्या निर्मितीसाठी गुरु-शिष्य परंपरेने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. याच परंपरेला स्मरून अधिकाधिक जण धर्म आणि राष्ट्र कार्य करण्यासाठी, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करून आदर्श समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी सक्रीय व्हावेत, या उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणे या सोहळ्यांचे आयोजन केले आहे. सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच हिंदुत्वनिष्ठ घरोघरी जाऊन निमंत्रण देणे, हस्तपत्रकांचे वाटप करणे, फलकप्रसिद्धी, बैठका, प्रवचने आदी माध्यमांतून प्रसार करत आनंद अनुभवत आहेत. त्या निमित्ताने नामसाधनेचाही प्रसार केला जात आहे.

‘सोशल मीडिया’च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधनाविषयक मार्गदर्शनांच्या ध्वनीफितीतील काही भाग प्रतिदिन प्रसारित करण्यात येत आहे. त्याला समाजातूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, तसेच त्या निमित्ताने केल्या जाणार्‍या सेवांसाठी गुरुतत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते. अनेक साधक गेले एक मास प्रसारसेवा करत असून काही ठिकाणी ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमानी ही तळमळीने प्रसारसेवा करत आहेत.

प्रसारातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना

१. आनंदनगर येथील भाजीमंडईमध्ये भाजीविक्रेत्यांना गुरुपौर्णिमा, तसेच अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर सर्वांनी यथाशक्ती अर्पण दिले. एका भाजीविक्रेत्याला विषय सांगितल्यावर शेजारी असणारा भाजीवालाही अर्पण काढून ठेवत असे.

२. सिंहगड रस्ता येथील गुरुपौर्णिमा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी एका संस्कृतीविरोधी संघटनेचे कार्य मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र असे असूनही समाजातून सनातनच्या कार्याला पुष्कळ सकारात्मक प्रतिसाद अनुभवायला मिळत आहे.

३. गेल्या २ मासांपासून समितीशी जोडले गेलेले राजगुरुनगर येथील सर्वश्री नवनाथ पाचर्णे आणि विशाल पाचर्णे प्रसारासाठी नियमित येत असून सेवेच्या सिद्धतेसाठी त्यांनी काही दिवस रजाही घेतली आहे. मंचर येथील धर्मप्रेमी श्री. एकनाथ वाघ हेही प्रसारकार्यात सहभागी झाले होते.

४. सिंहगड रस्ता, तानाजीनगर (चिंचवड) येथे गुरुपौर्णिमा असलेल्या परिसरात वाचक, तसेच साधक संख्येने न्यून असूनही समाजातूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे साधकांना अनुभवायला आले. चिंचवड येथील उपासनेआजींनी सनातनच्या साधकांना ‘दुपारच्या जेवणासाठी आमच्या घरी बसत जा’, असे सांगितले. दुपारी काही वेळ थांबण्यासाठी समाजातूनच कुणाचे ना कुणाचे तरी नियोजन होत होते.

अशा प्रकारे भगवंताच्या कार्यामध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहून अधिकाधिक जणांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काळानुसार आवश्यक हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात