सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा द्वैत भावाकडून अद्वैताकडे होत असलेला प्रवास !

सद्गुरुपदी विराजमान झाल्यानंतर आनंदावस्थेतील सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘प्रसारात सेवा करतांना माझ्यावर वाईट शक्तींची आक्रमणे होतात. त्यामुळे देहावर आवरण आणि जडत्व आल्यासारखे जाणवते. त्यामुळे मागील २ वर्षांत ‘प्रत्येक ३ – ४ मासांनी रामनाथी आश्रमात चैतन्य मिळवण्यासाठी उपायांना जावे’, असे वाटत असे, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होईल’, अशी ओढही मनात असे.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आध्यात्मिक उपायांसाठी रामनाथी आश्रमात
येण्याविषयी विचारणे आणि त्यांच्याशी बोलत असतांनाच त्रास नाहीसा होऊन हलकेपणा जाणवणे

मी उपायांसाठी रामनाथी आश्रमात येऊ का ?’ असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ३ – ४ वेळा विचारलेे. यावर ते म्हणायचे, ‘‘आध्यात्मिक उपायांसाठी इकडे येण्याची काय आवश्यकता ? तुम्हाला प्रसार करायचा आहे.’’ तेव्हा ‘ते बोलत असतांनाच त्रास नाहीसा होणेे आणि जडत्व जाऊन हलकेपणा जाणवणे’, असे घडायचे. शेवटी ते विचारायचे, ‘‘आता कसे वाटते ?’’ त्या वेळी ज्या कारणांसाठी रामनाथी आश्रमात जायचा विचार मनात यायचा, तो त्रास नाहीसा झाल्याचे अनुभवायला यायचे. यामुळे मधेमधे रामनाथी आश्रमात जाण्याची आवश्यकता भासली नाही.

२. रामनाथी आश्रमात जाण्याचा विचार आल्यावर श्री गुरुतत्त्वाने दिलेली शिकवण !

अनुमाने २ मासांपूर्वी पुन्हा मनात विचार आल्यावर श्री गुरुतत्त्वाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आतूनच सांगितले, ‘तुम्ही सगुणात अडकला आहात. रामनाथी आश्रम आणि तेथे होणारी माझी भेट’, हे सर्व सगुण असून सान्निध्यात असेपर्यंतच ते मर्यादित असते. याउलट ‘तेथे नसतांनाही आपण सतत रामनाथी आश्रमात आहोत’, असा भाव ठेवायला हवा आणि त्याची अनुभूती घेतली पाहिजे. तुम्ही मला प्रत्यक्ष भेटला नाही, तरी ‘माझे अस्तित्व सतत तुमच्यासमवेत आहे’, याची अनुभूती घेतली पाहिजे. प्रत्यक्ष सगुणाच्या सान्निध्यात नसतांना सगुणाची सूक्ष्मातून सतत अनुभूती घेणे, म्हणजे निर्गुणाची अनुभूती घेतल्यासारखी आहे. या योगेच ‘सगुण-निर्गुण हे एक असते’, याची अनुभूती घेता येते.’

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतःच्या ठायी कार्यरत आहेत’, अशी अनुभूती येऊन पूर्वी असलेली
वेगळेपणाची जाणीव, त्यामुळे असलेले द्वैत आणि निर्माण होणार्‍या अपेक्षा नष्ट झाल्याचे जाणवणे

यामुळे आता ‘रामनाथी आश्रम हा स्थूल नसून मी जेथे आहे, तेथेही तो सूक्ष्मातून आहे’, असा भाव असतो. तेव्हापासून परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ समवेतच नाहीत, तर ‘ते माझ्या ठायी कार्यरत आहेत’, अशी अनुभूती येते. एवढेच नव्हेे, तर ‘रामनाथी आश्रम, सनातनचे संत आणि सनातनचे विविध स्तरांवरील कार्य जे बाहेर घडत आहे, ते माझ्या आतही घडत आहे. मी ते प्रत्यक्ष अनुभवत आहे’, अशी अनुभूती येते. प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार असून त्या घटनेतील व्यक्ती आणि प्रसंग यांच्याशी एकरूपता असल्याचे जाणवते. पूर्वी असलेली वेगळेपणाची जाणीव आणि त्यामुळे असलेले द्वैत, तसेच त्यापायी निर्माण होणार्‍या अपेक्षा नष्ट झाल्या.

काही प्रसंगांत कधीतरी हा भाव नसल्यास वेगळेपणा किंवा द्वैत जाणवते; परंतु काही वेळातच परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुन्हा एकरूपता जाणवून आनंद अनुभवायला येतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २ वर्षांत माझ्या अपेक्षा आणि द्वैत यांत हळूवारपणे पालट करून आहे त्या स्थितीत एकरूपता अन् आनंद मिळवण्यास शिकवले. त्यांच्या कृपेमुळे आम्हा सर्व साधकांचा उद्धार होत आहे. त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे, तसेच रामनाथी आश्रम, सद्गुरु (सौ.)
अंजलीताई आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांचे स्मरण झाल्यावर अष्टसात्त्विक भाव जागृत होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण झाल्यावर, म्हणजेच त्यांच्याविषयी कुणी बोलत असतांना भावजागृती होऊ लागते. तेव्हा मन निर्विचार होऊन डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहातात किंवा डोळ्यांत एखादाच अश्रू येतो. त्या वेळी मनात कृतज्ञताभाव दाटून आलेला असतो. त्यानंतर काही क्षण मन निर्विचार असल्याने काय बोलावे किंवा काय करावे, ते कळत नाही. रामनाथी आश्रमाविषयी बोलणे चालू असतांना किंवा रामनाथी आश्रमातून एखाद्या साधकाचा निरोप घेणे किंवा देण्यासाठी भ्रमणभाष आला असता डोळ्यांतून अश्रूपात होऊन भावजागृती होते. कधी कधी शरिरात कंपने निर्माण झाल्याने भ्रमणभाषवर बोलणेही अशक्य होते. सद्गुरु (सौ.) अंजलीताई किंवा सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या स्मरणाने किंवा त्यांच्याशी बोलत असतांनाही भावजागृती होते. त्या वेळी डोळ्यांतून अश्रू येतात किंवा स्वर फुटल्यासारखा होतो.’

– पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२९.३.२०१७)

पू. पिंगळेकाकांची भावजागृती झाल्याने साधकावर उपाय होणे

‘ही सूत्रे टंकलेखन करण्यापूर्वी सद्गुरु (सौ.) अंजलीताईंचा भ्रमणभाष आला होता. त्या वेळीही पू. पिंगळेकाकांची भावजागृती झाली आणि आवाजात वैस्वर्ण्य (स्वर फुटल्यासारखा होणे) होते. या वेळी माझ्यावर उपाय झाले.’

– श्री. प्रणव मणेरीकर (२९.३.२०१७)

गुरु शिष्याचे बोट पकडून साधनेत पुढे नेत
असल्याने त्यांचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असणे

‘साधनेत प्रगती करू इच्छिणार्‍यांना ‘गुरूंविना तरणोपाय नाही’ अथवा पुढचा मार्गच नाही. गुरूंविना साधना, म्हणजे माहिती नसलेल्या गंतव्याच्या शोधार्थ कोलूच्या बैलाप्रमाणे (म्हणजे तेल काढतांना घाण्याभोवती बैलाला गोल गोल फिरवले जाते.) एकाच सूत्राभोवती गोल-गोल फिरण्यासारखे आहे.

आध्यात्मिक साहित्य वाचून चित्तशुद्धीची प्रक्रिया कळेल; पण गुरु प्रायोगिक भाग करून घेतात, हे त्यांचे महत्त्व आहे. सूक्ष्म, योग्य-अयोग्य, सत्य-मायावी आदी केवळ गुरूच ओळखू शकतात. ते शिष्याचे बोट पकडून साधनेत पुढे नेतात.’

– पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२९.३.२०१७)

संत आणि साधक यांच्यावर वाईट शक्तींची सूक्ष्मातून जीवघेणी आक्रमणे होत
असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधक जिवंत राहून समष्टी सेवा करू शकणे

१. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘स्वतःभोवती
१ फूट संरक्षककवच आहे’, असे  जाणवून अल्प त्रास भोगायला लागणे

‘सनातनचे संत आणि साधक समष्टी सेवा करत आहेत. ज्या प्रमाणात वाईट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होत आहेत, ते पहाता संत आणि साधक जिवंत रहाणेही अशक्य आहे. काही साधकांना त्रास होतो. संतांवर वाईट शक्तींचे सूक्ष्मातून आक्रमण होते; मात्र अशा परिस्थितीतही ते समष्टी कार्य करतच आहेत. याचे कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा ! ‘त्यांच्या कृपेमुळे मला माझ्याभोवती १ फूट संरक्षककवच आहे’, असे जाणवते. माझ्यावर होणार्‍या आक्रमणांच्या तुलनेत मला अल्प त्रास भोगायला लागत आहे. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच शक्य आहे.

२. ‘एका अघोरी उपासकाने सोडलेली शक्ती १ फुटापर्यंत असलेल्या संरक्षक कवचावर
आदळून निष्भ्रम झाली’, असे सूक्ष्मातून दिसणे  अन् झोपेतही झटका लागून दचकून उठणे

वर्ष २०१२ – २०१३ च्या प्रयाग सिंहस्थ पर्वात एकदा रात्री ‘एका अघोरी उपासकाने एखाद्यावर मूठ मारतात, त्याप्रमाणे एक शक्ती माझ्यावर सोडली आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. प्रत्यक्षात ती शक्ती माझ्यावर येऊन आदळल्याचे मला अनुभवायलाही आले होते. ती शक्ती माझ्या दिशेनेे येत असतांना ती माझ्यापासून १ फुटापर्यंत लांब असलेल्या संरक्षककवचावर आदळली आणि निष्भ्रम झाली’, असे दिसले. त्या वेळी मला झोपेतही झटका लागून मी दचकून उठून बसलो होतो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेचे कवच नसते, तर तेव्हा माझा मृत्यूच झाला असता’, असे वाटले. ‘गुरुकृपेचे किती महत्त्व आहे आणि गुरुकृपेचे कवच साधकांचे कसे रक्षण करते’, हे अनुभवायला आले. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती, ही त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.

– पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे (२९.३.२०१७)

 

१. दास्यभावात रहाणे

‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका यांचा माझा पहिला संपर्क १९९९-२००० या वर्षी आला. तेव्हा आम्ही काही साधक गोवा येथे सेवेसाठी येतांना वाटेत मिरजला थांबलो होतो. तेव्हा मला आठवते की, सद्गुरु काका उच्चविद्याविभूषित (कान, नाक, घसा यांचे डॉक्टर) असूनही आम्हा युवा साधकांची काळजी ‘जणुकाही गुरु घरी आले आहेत’, या भावाने घेत होते. डॉ. (सौ.) मधुवंतीताईंनी (त्यांच्या पत्नीने) घरच्यासाठी तयार केलेला सर्व स्वयंपाक आम्हाला प्रवासात खायला बांधून दिला. सद्गुरु काका प्रत्येक कृती विनम्रपणे अन् दास्यभावात राहून करत होते. तेव्हा मला साधकांकडून कळले की, सद्गुरु काकांना सूक्ष्मातीलही पुष्कळ चांगल्या प्रकारे कळते; परंतु सद्गुरु काकांनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यासंदर्भात आम्हाला काही जाणवू दिले नाही.

 

२. दास्यभाव आणि क्षात्रतेज यांचा सुंदर संगम असणे

सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाकांमध्ये दास्यभाव आणि क्षात्रतेज यांचा सुंदर संगम आहे. ते साधकांशी आणि हिंदुत्वनिष्ठांशी जितक्या नम्रतेने बोलतात, तितक्याच क्षात्रतेजाने ते भाषण करतांना धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही यांची कानउघाडणी करतात. त्या वेळी ‘साधकांशी बोलणारे सद्गुरु काका हेच का ?’, असा प्रश्‍न पडतो. एकदा एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना ‘काही सामाजिक प्रकरणात हिंदु जनजागृती समिती काय करते ?’, असा उपहासात्मक प्रश्‍न विचारला. त्या वेळी सद्गुरु काकांनी प्रतिप्रश्‍न विचारून पत्रकारालाच ‘तुम्ही त्या प्रकरणांमध्ये काय करता ?’, असे विचारले. त्याच वेळी त्यांनी पत्रकाराला कठोर शब्दांत जाणीव करून दिली की, पत्रकार म्हणून केवळ प्रश्‍न विचारणे, हे तुमचे दायित्व नाही. तुम्ही लोकशाहीचा एक स्तंभ आहात, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये तुमचेही सामाजिक दायित्व तितकेच आहे, जितके हिंदु जनजागृती समितीचे ! त्यानंतर तो पत्रकार अंतर्मुख झाला आणि त्याने उपहास करणे बंद केले. पत्रकार परिषदेत शक्यतो पत्रकार स्वतःला राजे समजत असल्याने आणि परिषद घेणारे त्यांना दुखावू शकत नसल्याने पत्रकार परिषद एकतर्फीच होत असते. अशा वेळी सद्गुरु काकांनी पत्रकारालाच प्रतिप्रश्‍न विचारून एक नवीन पायंडा रुजू केला.

 

३. पोलीस खात्यातील व्यक्तींनीही सद्गुरु काकांचे महत्त्व जाणणे आणि साहाय्य करणे

एकदा मिरज येथे दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाच्या गाडीला अपघात झाल्याने आम्ही एक-दोन साधक आणि सद्गुरु काका मध्यरात्री २ – २.३० वाजता उठून सांगली येथे गेलो. तेव्हा समोरची व्यक्ती पुष्कळ अरेरावी करत होती. ते पाहून काकांमधील क्षात्रतेज जागृत झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला चांगलेच खडसावले. त्यांचा मोठा आवाज ऐकून तेथे शेजारीच रहाणारा एक पोलीस कर्मचारी उठून बाहेर आला. त्याने सद्गुरु काकांना पहाताक्षणी ओळखले आणि समोरच्या व्यक्तीला समज देऊन प्रकरण मिटवले. त्यानंतर त्या पोलीस कर्मचार्‍याने मला सांगितले की, त्याच्या मुलीला कानाचा त्रास होता. त्यासाठी त्याने पुष्कळ डॉक्टरांकडे औषधोपचार केले; परंतु तिला गुण आला नाही; परंतु सद्गुरु काकांनी तिला तपासून औषधे दिल्यावर तिला नंतर एकदाही त्रास झाला नाही. ती आठवण त्या पोलिसाला सद्गुरु काकांना पाहून झाली. त्यानंतरही एका गुंडाने अन्य साधकाच्या अपघाताच्या प्रसंगात जिवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा एका मुसलमान पोलीस अधिकार्‍याने सद्गुरु काकांची विनम्रता पाहून काकांना ओळखले आणि त्या गुंडाचा बंदोबस्त केला.

 

४. अखंड आत्मनिवेदन करणे

आरंभी मिरज येथील आश्रमात आणि नंतर रामनाथी आश्रमात आम्ही एकत्र होतो. तेव्हा सद्गुरु काकांना आध्यात्मिक त्रास होत असल्याने ते बर्‍याचदा लवकर झोपण्यासाठी येत. आरंभी मला वाटायचे, ‘काका, लढायचे सोडून का झोपतात ?’ एक दिवस मी काकांना जेवणाचे विचारण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो. तेव्हा मला ‘परम पूज्य, परम पूज्य …’ असा जप ऐकू येऊ लागला. त्या वेळी सद्गुरु काका परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीने तळमळत होते. त्यानंतर मी पाहिले की, सद्गुरु काकांचा हा नित्यदिनक्रम होता. ते लवकर झोपण्याच्या निमित्ताने खोलीत यायचे आणि परात्पर गुरूंच्या चरणी अखंड आत्मनिवेदन करायचे.’

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात