परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घडवत असल्याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

परात्पर गुरु डॉ. आठवले मुंबईत असतांना त्यांनी साधकांना आरंभी टंकलेखन, ध्वनीचित्रीकरण, छायाचित्र काढणे आदी अनेक गोष्टी शिकवल्या. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घडवत असल्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

१. साधकांना गुरुकृपायोगानुसार साधनामार्गात आणणे, ही
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यातील एक सूक्ष्म स्तरीय महती !

वर्ष १९९६ मध्ये सौ. मधुवंती हिचे (माझ्या पत्नीचे) मामा श्री. पत्की (ते पनवेल येथील सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या सत्संगात जात असत.) यांच्या मुखातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी ऐकले. तेव्हा त्यांना भेटण्याची आंतरिक ओढ लागली. त्यामुळे केवळ सत्संगात जायला मिळेल आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होईल; म्हणून आम्ही पनवेल येथे गेलो. प्रत्यक्षात अन्य दायित्व पहाता (२ वर्षांपूर्वी शिक्षण चालू असतांनाच लग्न होऊन वैदेहीचा (मुलीचा) जन्म झाला होता.) नोकरी किंवा धन हातात असणे आवश्यक होते. अशा परिस्थितीतही आंतरिक ओढ निर्माण होऊन पनवेलला जाण्याचा निर्णय घेणे, ही परात्पर गुरु डॉक्टरांची अनन्य कृपा आणि प्रेरणा आहे, याची जाणीव होते. आम्ही निर्णय घेतल्याचे दृश्यतः दिसत असले, तरी ही केवळ त्यांचीच कृपा आहे. अनेक साधकांना अशा अनुभूती आल्या आहेत आणि येत आहेत. साधकांनी व्यावहारिक जीवनाचा त्याग करून त्यांचे आध्यात्मिक आणि निष्काम जीवनाकडे पाऊल पडणे, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक जन्मांपासून मुक्ती अन् मोक्ष यांची अपेक्षा करणार्‍या साधकांवर केलेली कृपा आहे. साधकांना गुरुकृपायोगानुसार साधनामार्गात आणणे, ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारी कार्यातील एक सूक्ष्म स्तरीय महतीच आहे.

२. बालपणी आणि युवा अवस्थेत केलेली साधना

मी वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी मुंज झाल्यापासून प्रतिदिन गायत्री मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करत असे. मी २० – २१ वर्षे गायत्री मंत्राचा जप केला.

३. कुलदेवतेचा नामजप केल्यावर काही दिवसांतच कुलदेवतेने प्रकाशस्वरूपात दर्शन देणे आणि
ही अनुभूती आल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष भेटले नसतांनाही त्यांच्यावरील श्रद्धा दृढ होणे

पुढे वर्ष १९९६ मध्ये मी सत्संगात सांगितल्यानुसार कुलदेवतेचा नामजप करू लागलो. त्यानंतर मला ८ ते १० दिवसांत प्रकाशस्वरूपात कुलदेवतेने दर्शन दिल्याची अनुभूती आली. ही अनुभूती आल्यानंतर मला काहीतरी वेगळे आणि आनंदी जाणवले. त्या वेळी ही कुलदेवतेच्या दर्शनाची अनुभूती आहे, हे मला ठाऊक नव्हते. ६ ते ८ मासांनंतर सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या साधकांच्या अनुभूती या ग्रंथात ती अनुभूती छापून आली. ही अनुभूती आल्यानंतर साधनामार्गात एक दृढता आली होती आणि परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष भेटले नसतांनाही त्यांच्यावरील श्रद्धा दृढ झाली होती. अनुभूती देऊन साधकाची श्रद्धा दृढ करून साधकांच्या साधनेला दिशा देणे, ही आध्यात्मिक स्तरावरील परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे, असे जाणवले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कृतीतून शिकवणे

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी पांढरा पायजमा आणि झब्बा या वेशात येऊन अन् निघतांना
उद्वाहकापर्यंत (लिफ्टपर्यंत) पोहोचवायला येऊन मनातील संतांविषयीच्या प्रतिमेला छेद देणे

वर्ष १९९६ मध्ये मी साधनेत येऊन १ – २ मास झाले होते. मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले नव्हते. माझ्या मनात संत म्हणजे वारकरी संप्रदायात असतात तसे किंवा दाढी, जटा असलेले अन् भगवे वस्त्रधारी अशी कल्पना होती. एकदा मुंबईत दादर येथे नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांविषयी अभ्यासवर्ग होता. त्या वेळी एक व्यक्ती पांढरा पायजमा आणि झब्बा या वेशात माझ्यासमोरून गेली. ती व्यक्ती व्यासपिठावर जाऊन बसली. दुसरे साधक ग्रंथाविषयी माहिती सांगत होते. काही वेळाने मी शेजारी बसलेल्या गडकरीकाकांना (आताचे पू. रमेश गडकरी यांना) विचारले, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आले नाहीत का ? ते कुठे आहेत ? त्यावर ते म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टर व्यासपिठावर बसलेले आहेत. माझ्या कल्पनेत असलेल्या संतांप्रमाणे ते न दिसल्याने मी पू. गडकरीकाकांना म्हणालो, हे परात्पर गुरु डॉक्टर आठवले आहेत ? हे संत आहेत ? प्रत्यक्षात त्या दिवशी माझ्या मनात संत आणि संन्यासी यांच्याविषयीचा भ्रम त्यांनी एकाच कृतीतून नाहीसा केला. प्रत्यक्षात ही त्यांची माझ्यावरील कृपाच होती. त्यांनी कुठल्याही शब्दांत संत कसे असतात किंवा नसतात ?, असे ज्ञान न देता स्वतःच्या आचरणातून माझ्या विचार आणि बुद्धी यांना एक दिशा दिली. अनेक साधकांच्या जीवनात असे घडलेे आहे. त्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम झाल्यानंतर मी सेवाकेंद्रात गेलो. तेव्हा मी निघतांना ते मला उद्वाहकापर्यंत (लिफ्टपर्यंत) पोहोचवायला आले. तेव्हा खरे संत किती प्रेमळ अणि साधे असतात !, याची मी अनुभूती घेतली.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समवेत जेवायला बसवणे, त्यांचे उच्छिष्ट ग्रहण करावे,
असा विचार आल्यावर त्यांनी स्वतःच्या ताटातील गुलाबजाम असलेली वाटी उचलून साधकाच्या
ताटात ठेवणे आणि या प्रसंगानंतर गुरूंना साधकाच्या मनात काय आहे ?, हे कळते, हे लक्षात येऊन भाववृद्धी होणे

त्यानंतर एक वर्षाने, म्हणजे वर्ष १९९७ मध्ये मी सौ. मधुवंती हिच्या आईच्या निवृत्ती वेतनाच्या कामासाठी मुंबई येथे गेलो असतांना मला सेवाकेंद्रात जाण्याचा योग आला. मी पूर्वसूचना न देता अकस्मात् सेवाकेंद्रात गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला जेवायला सांगितले. सर्व साधक बाहेरच्या खोलीत भूमीवर बसून जेवत होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला मात्र त्यांच्यासमवेत पटलावर बसून जेवायला सांगितले. मला एकदम ओशाळल्यासारखे झाले होते; परंतु काय करायला हवे ?, हे मला कळत नसल्याने मी त्यांच्यासमवेत जेवायला बसलो. माझ्या मनात जेवण झाल्यावर त्यांचे ताट उचलावे आणि त्यातील उच्छिष्ट ग्रहण करावे, असा विचार होता. त्यांनी तो जाणला. माझे जेवण संपत आले असतांना त्यांनी त्यांच्या ताटातील गुलाबजाम असलेली वाटी उचलून माझ्या ताटात ठेवली आणि म्हणाले, आमच्या गुरूंच्या आश्रमात नुकताच भंडारा झाला. तेथील प्रसाद म्हणून खव्याचे बनवलेले गुलाबजाम तुमच्यासाठी आहेत. मला कृतज्ञता वाटली आणि साधकाच्या मनातील प्रत्येक विचार परात्पर गुरु डॉक्टर जाणतात, हे माझ्या लक्षात आले. पुढे संस्थेच्या वतीने प्रकाशित शिष्य या ग्रंथात परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिले, गुरु शिष्याला अनेक प्रसंगांतून शिष्याच्या मनात येणारा प्रत्येक विचार गुरूंना कळतो, याची जाणीव करून देतात.

एक प्रकारे त्या दिवशी त्यांच्या ताटातील प्रसाद देऊन आणि माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट त्यांना कळत आहे, याची जाणीव करून देऊन त्यांनी त्यांच्याप्रती माझा भाव वृद्धींगत केला. अवतारी श्री गुरूंच्या सूक्ष्म स्तरावरील कार्याचा हा पैलू समजून घेणे, म्हणजेच श्री गुरूंच्या अव्यक्त शिकवण्याला समजून घेणे होय.

४ इ. साधक हात धूत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी टॉवेल हातात धरून मागे उभे रहाणे

जेवण झाल्यानंतर त्यांनी कृतीतून जे शिकवले, ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. मी हात धुऊन चूळ भरत होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर वेगाने जातांना दिसले. मला वाटले, हे गडबडीत का गेले ? मी आरामात चूळ भरून मागे वळल्यावर मला दिसले, परात्पर गुरु डॉक्टर माझ्यामागेे टॉवेल घेऊन उभे आहेत. हे पाहून मला लाजल्यासारखे झाले. या प्रसंगाचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की, जोपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी जशी आता सेवा केली, तशी जोपर्यंत माझ्याकडून होत नाही, तोपर्यंत स्वतःला साधक म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, हा विचार माझ्या मनावर बिंबला. त्यामुळे आता परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून कितीही सेवा करवून घेतली, तरी अद्यापही सेवेत अल्प पडतो, याची मला जाणीव असते.

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक (मे २०१७)

 

रामायणातील ‘हनुमंताने छाती फाडून अंतरातील प्रभु श्रीराम आणि सीता यांचे दर्शन घडवणे’, या प्रसंगाचा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना ईश्‍वराने सांगितलेला अर्थ अन् त्या वेळी त्यांना आलेली अनुभूती !

‘रामायणात एक प्रसंग आहे. ‘लंकेतून परत आल्यानंतर सीतामाता हनुमंताला भेट म्हणून मोत्यांची एक माळ देते. हनुमंत त्या मोत्यांच्या माळेतील मोती फोडून ‘आत राम आहे का ?’, ते शोधत असतो. तेव्हा सीतामाता त्याला विचारते, ‘‘तू असे का करतोस ? मोत्याच्या आत राम का शोधतोस ? तुला ‘तुझ्या अंतरंगात राम आहे’, हेे दाखवता येईल का ?’’ त्यावर हनुमंत आपली छाती फाडून सर्वांना स्वतःच्या अंतरातील प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे दर्शन घडवतो. या प्रसंगामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

१. स्वतःभोवती असलेल्या मायेच्या आवरणामुळे जिवाने आत्मस्वरूपाला
विसरणे आणि अवतारी पुरुषांना आत्मस्वरूपाची जाणीव असल्याने त्यांच्याभोवती कुठलेही आवरण नसणे

प्रत्यक्षात जिवाच्या (प्राणीमात्राच्या) आत्म्याभोवती प्रारब्ध आणि संचित कर्म, स्वभावदोष, अहंभाव अन् माया यांचे आवरण असते. या आवरणामुळे जीव स्वतःला देह समजतो आणि तो स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरतो. उच्च कोटीचे संत आणि अवतारी पुरुष यांना त्यांच्या स्वरूपाची पूर्णतः जाणीव असते; कारण त्यांच्या आत्म्याभोवती यांपैकी कुठलेही आवरण नसते.

२. हनुमंत हा अवतारी पुरुष असल्याने त्याला अंतरातील प्रभु श्रीराम आणि सीता यांच्या अस्तित्वाची अखंड अनुभूती असणे अन् ‘त्याचा अधिकार इतरांना कळावा’, यासाठी श्रीराम आणि सीतामाता यांनी ही प्रसंगरूपी लीला रचणे

हनुमंत हा अवतारी पुरुष असून नित्य आत्मस्वरूपात स्थित असल्याने त्याला त्याच्या अंतरातील प्रभु श्रीराम आणि सीता यांच्या अस्तित्वाची अखंड अनुभूती असते. सीतामाता सर्वज्ञानी असतांनाही तिने हा प्रश्‍न का विचारला ? ‘रामाच्या दरबारातील हनुमंताचा अधिकार इतरांना ठाऊक नसल्यामुळे त्यांना तो कळावा’, यासाठीच सीतामाता आणि श्रीराम यांनी ही प्रसंगरूपी दिव्य लीला रचली होती. रामाच्या दरबारातील अनेकांनी हनुमंताला विचारले होते, ‘‘तुझ्या अंतरात राम आहे का ? तो आम्हाला दाखव.’’

३. हनुमंताने अनाहतचक्रावरील मायेचे आवरण दूर करून अंतरातील श्रीराम-सीता यांचे इतरांना दर्शन घडवणे

तेव्हा हनुमंताने आपल्या अनाहतचक्रावरील मायेचे आवरण दोन्ही हातांनी बाजूला सारले, म्हणजेच त्या क्षणापुरते उपस्थितांच्या भोवतीचे मायेचे आवरण दूर होऊन त्यांना दिव्य दृष्टी लाभली आणि त्यांना हनुमंताच्या अंतरातील श्रीराम अन् सीता यांचे दर्शन झाले.

४. त्रेतायुगात आध्यात्मिक अर्थ जाणणारे सात्त्विक लोक असल्याने त्यांना वरील प्रसंगाचा अर्थ
कळणे; परंतु सध्या ‘छाती फाडणे’ याचा शब्दशः अर्थ लावून या प्रसंगास ‘दंतकथा’ संबोधण्यात येणे

‘हनुमंताने छाती फाडून श्रीराम आणि सीता यांचे दर्शन घडवले’, या त्रेतायुगातील रामायणातील प्रसंगाचा आध्यात्मिक अर्थ जाणणारे सात्त्विक लोक असल्याने त्यांना याचा अर्थ कळला; पण कालगतीत अल्प झालेली सात्त्विकता, तसेच वाढलेले रज-तम यांचे आवरण यांमुळे ‘छाती फाडणे’ हा शब्दशः अर्थ घेऊन (भावार्थ किंवा आध्यात्मिक क्रिया न जाणणारे) या सत्य इतिहासाला ‘दंतकथा’ संबोधत आहेत आणि ‘त्याला नाकारणे किंवा खोटे ठरवणे’, यांसाठी जोरकस प्रयत्न करत आहेत.

५. शिबिरात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्रासदायक आवरण हातांनी
काढायला सांगितल्यावर तसे करतांना ईश्‍वराने रामायणातील वरील प्रसंगाचा आध्यात्मिक अर्थ सांगणे

२६.०६.२०१८ या दिवशी ‘जिल्हासेवकांचे गुरुकार्य आणि साधनावृद्धी शिबिरा’त सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना त्यांच्याभोवतीचे त्रासदायक आवरण हातांनी काढायला सांगितले. तेव्हा मी माझ्या अनाहत चक्राभोवतीचे त्रासदायक आवरण काढू लागलो. बालपणापासूनच माझ्या मनात ‘रामायणातील वरील प्रसंगाचा आध्यात्मिक अर्थ काय असेल ?’, हा प्रश्‍न सुप्तावस्थेत होता. मी हातांनी माझ्या छातीवरील आवरण दूर सारतांना मला ईश्‍वराने रामायणातील वरील प्रसंंगाचा आध्यात्मिक अर्थ सांगितला.

६. ईश्‍वर वरील प्रसंगाचा अर्थ सांगत असतांनाच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘साक्षात हनुमंत
आपल्या देहाभोवतीचे आवरण काढत आहे’, असा भाव ठेवण्यास सांगितल्यावर ईश्‍वराने प्रचीती दिल्याचे जाणवणे

ईश्‍वर मला हे सांगत असतांनाच व्यासपिठावरून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण आवरण काढत आहोत’, असे समजू नका. ‘साक्षात हनुमंत आपल्या देहाभोवतीचे आवरण काढत आहे’, असा भाव ठेवा.’’ त्याच क्षणी माझ्या अंतरातील ईश्‍वर रामायणाच्या या प्रसंगाविषयी जो आध्यात्मिक अर्थ सांगत आहे, त्याची प्रचीती ईश्‍वराने मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या या वाक्यातून दिली.

माझ्यासाठी आणि सनातनच्या साधकांसाठी ईश्‍वर म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून ते परात्पर गुरुदेव डॉ. आठवलेच आहेत. त्यांच्या, तसेच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्या वेळी उपस्थित सर्व सद्गुरु अन् संत यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार !’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२९.६.२०१८)

(‘स्वतःवरील त्रासदायक आवरण कसे काढावे ?’, याविषयीचे विवरण ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’, या ग्रंथात दिले आहे.’ – संकलक)

‘आता आपले सगळे अंतिम टप्प्यातीलच सुरू आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन सातवे आहे, म्हणजेच आता आपण सूक्ष्मातून युद्ध करत सातव्या पाताळापर्यंत पोहोचलो आहोत आणि उर्ध्व दिशेला संगीतातून शेवटच्या टप्प्याची, म्हणजे आकाश तत्त्वाची नादोपासना सुरू केली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची काय ही कृपा !’

– सद्गुरु चारुदत्त पिंगळे (७.६.२०१८)