सद्गुरु झालेल्या ४ संतांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले

ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या
तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करणारे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

‘बहुतेक संत एकाच योगमार्गाने वाटचाल करतात. याउलट सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगमार्गांनी वाटचाल करणारे आहेत ! त्यांची जलद प्रगती होण्याचे एक कारण म्हणजे अध्यात्मातले जे समजले, ते त्यांनी तत्काळ कृतीत आणले, उदा. त्यांना धोतराचे महत्त्व कळल्यावर त्यांनी १५ वर्षांपूर्वीच पँट घालणे बंद करून धोतर नेसण्यास आरंभ केला. या गुणामुळे वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही त्यांनी सद्गुरुपद प्राप्त केले. त्यांच्यात साधकांबद्दल प्रेमही आहे. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो. साधकांबद्दल प्रेम असले, तरी ते पत्नी आणि मुलगी यांच्यात अडकले नाहीत. ते आवश्यकतेनुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज अशा कोणत्याही स्तरावर भाषण करतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्स्फूर्त भाषणांमुळे अनेक हिंदुत्वनिष्ठ आपल्या कार्याला जोडले जात आहेत. साधकांप्रमाणेच धर्मप्रेमी व्यक्तींनाही त्यांच्याविषयी आदर, तसेच त्यांचा आधार वाटतो. त्यांनी साधनेत केलेल्या मार्गदर्शनामुळे आज अनेक हिंदुत्वनिष्ठांची साधना आणि कार्य वेगाने चालू आहे.

अशा ‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करणारे पू. नंदकुमार जाधव सद्गुरुपदी विराजमान !

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याशी बोलतांना ‘घरातल्यांशीच बोलत आहोत’, असे वाटते; कारण ते सर्वांशी खेळीमेळीने बोलतात आणि वागतात. त्याचबरोबर धर्मजागृती सभांत क्षात्रवृत्तीने बोलणारे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्यामुळेच जळगाव जिल्हा आणि परिसर येथील कार्य महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांपेक्षा खूप अधिक पटींनी वाढत आहे. स्थिर, मितभाषी स्वभावाचे सद्गुरु नंदकुमार जाधव सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करत असल्याने आज अनेक साधक त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून साधनेत मार्गदर्शन घेतात. साधकांना त्यांच्याशी बोलल्यावर अनेक प्रकारच्या अनुभूती येतात. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात कठीण प्रसंग आले, तरी ते त्याकडे साक्षीभावाने पहातात. त्यांनी गायलेली काही गाणी भावजागृती करणारी, काही क्षात्रवृत्ती जागृत करणारी, तर काही वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणारी आहेत.

अशा सद्गुरु नंदकुमार जाधव यांची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

ज्ञान आणि भक्ती यांचा अपूर्व संगम असलेले पू. अप्पा सद्गुरुपदी विराजमान !

‘माझे ज्येष्ठ बंधू डॉ. वसंत आठवले म्हणजेच अप्पा ! ते एक प्रख्यात बालरोगतज्ञ म्हणून नावाजलेले होते. उच्चशिक्षित असूनही एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे निरिच्छ भावनेने मनापासून त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांनी विविध विषयांवर पुष्कळ लिखाण केले. विज्ञानाला भक्तीची जोड असल्यामुळे त्यांचे लिखाण रसाळ आणि भाव जागृत करणारे असायचे. अध्यात्म वैज्ञानिक परिभाषेत मांडणारे ते आगळेवेगळे संत होते.

नम्रता, निगर्वीपणा, सहजता, सदैव शिकण्याची स्थिती अन् प्रेमभाव या गुणांमुळे त्यांनी वर्ष २०१० मध्ये ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानंतर अवघ्या २ वर्षांत म्हणजेच वर्ष २०१२ मध्ये ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते संतपदी विराजमान झाले. ९.११.२०१३ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. देहत्यागाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते अखंड सेवारत होते. आज सांगण्यास अतीव आनंद होत आहे की, ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते ‘सद्गुरु अप्पा’ झाले आहेत.

त्यांची पुढील प्रगती जलदगतीने होवो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

साधकांचे त्रास दूर व्हावेत; म्हणून चंदनाप्रमाणे
झिजणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी सद्गुरुपदी विराजमान !

‘मुळातच शांत, संयमी आणि मितभाषी असणार्‍या पू. सखदेवआजींचा ईश्‍वराप्रती अव्यक्त भाव होता. त्यांचा हसतमुख तोंडवळा पाहूनच साधकांना उत्साह वाटायचा. त्या समष्टीसाठी अहोरात्र प्रार्थना करायच्या. वयोपरत्वे त्या साधकांशी बोलू शकत नसत; परंतु त्यांचा प्रेमभरा तोंडवळा पाहूनच सर्वांना त्यांचा आधार वाटायचा.

दिवसभर एका खोलीत असूनही आश्रमातील कोणत्या साधकाला काय त्रास होत आहे, याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. साधकांवर रात्री अपरात्री कधीही आध्यात्मिक उपाय करायला त्या सिद्ध असायच्या. ‘साधकांवर कोण उपाय करणार’, ही माझी काळजी त्यांच्यामुळे दूर झाली आणि मी निर्धास्त व्हायचो.

काही वेळा त्यांना रात्री पुष्कळ त्रास व्हायचा. तेव्हा त्या स्वतःचे स्वतः उपाय शोधायच्या आणि त्याचा त्यांना लाभ व्हायचा. साधकांसाठीही त्या अचूक उपाय शोधून काढायच्या.

साधकांचे त्रास दूर व्हावेत; म्हणून चंदनाप्रमाणे झिजणार्‍या आजींनी वर्ष २०१० मध्ये ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली अन् त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी संतपद प्राप्त केले. एवढ्या अल्पावधीत संतपदी आरूढ होणार्‍या त्या पहिल्याच संत होत. त्यांच्यातील समष्टीसाठीची तळमळ आणि साधकांवरील निरपेक्ष प्रीती यांमुळे रुग्णाईत स्थितीतही भगवंताने त्यांची झपाट्याने उन्नती करून घेतली.

१७.८.२०१६ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागापूर्वी साधकांना त्यांच्यातील निर्गुण तत्त्वाच्या अनुभूती येत होत्या. आता त्यांची निर्गुण तत्त्वाकडे झपाट्याने वाटचाल होत असून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या आहेत.

अशा सद्गुरु आजींची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती व्हावी, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले