हिदु संतांवरील अन्यायाच्या विरोधात सर्व संप्रदायांनी संघटित होऊन कार्य करावे ! – सहाव्या अखिल भारतीय हिदू अधिवेशनातील मान्यवरांचे आवाहन

केंद्रशासनाने हिंदूंची अवहेलना न थांबवल्यास हिंदूच संघटितपणे
हिंदु राष्ट्र स्थापतील ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

अभय वर्तक

श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : केंद्रामध्ये हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे शासन यावे, याकरता सनातन संस्थेच्या साधकांनीही भावपूर्णपणे प्रार्थना केली होती. सनातन संस्थेवर होणारा अन्याय हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या शासनकाळात दूर होईल, अशी साधकांची अपेक्षा होती. एवढेच नव्हे, तर देशभरातील हिंदू स्वतःवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी मोदींचे शासन यावे, यासाठी प्रार्थना करत होते. केंद्रात बहुमत असूनही गेली ३ वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सर्वसामान्य हिंदू यांच्यावर होणार्‍या अन्यायात कोणताही पालट झालेला नाही. जे काँग्रेस शासनाच्या काळात होत होते, तोच अन्याय, तीच अवहेलना हिंदूंना आजही भोगावी लागत आहे. लक्षात घ्या, हिंदूंचा विश्‍वासघात हा देवाचा अवमान आहे. हे असेच होत राहिले, तर काय करावे, याविषयीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन स्वतः हिंदूच संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील, असे जाज्वल्य प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ते संत, संप्रदाय आणि हिंदूसंघटना यांचे शासनाकडून होत असलेले दमन या उद्बोधन सत्रात बोलत होते. या वेळी चेन्नईतील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन्, कर्णावती, गुजरात येथील संतश्री आसारामजी आश्रमाच्या साध्वी रेखा बहेनजी यांनीही मार्गदर्शन केले. श्री. वर्तक यांच्या अनेक विधानांना उपस्थितांनी घोषणा आणि टाळ्या यांच्या कडकडाटात मोठा प्रतिसाद दिला.

श्री. वर्तक म्हणाले की,

१. काँग्रेसने उठवलेली हिंदु आतंकवादाची आवई पुसून टाकण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.

२. या सगळ्या गोष्टींमुळे हिंदूंचा भ्रमनिरास झाला आहे. त्यावर उपाय म्हणून भाजप शासनाने निवडणुकीपूर्वी सांगितल्याप्रमाणे गोहत्याबंदी, काश्मीरमधून ३७० कलम हटवणे, समान नागरी कायदा लागू करणे, या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात.

संतांवरील अन्याय आणि अत्याचार यांविरुद्ध
सर्व हिंदु संप्रदायांचे संघटन आवश्यक ! – साध्वी रेखा बहनजी

साध्वी रेखा बहनजी

कांची कामकोटीपिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी  श्री जयेंद्र सरस्वतीजी यांच्या अटकेनंतर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या षड्यंत्राचा उल्लेख केला होते. जगद्गुरु शंकराचार्यांच्या मुक्ततेसाठी त्यांनी संतांना संघटित केले होते. गेली ४ वर्षे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू कारागृहात आहेत. त्यांच्या मुक्ततेसाठी आम्ही अनेक प्रयत्न करूनही दाद घेतली जात नाही. हिंदूंच्या अन्य संतांवर असे अत्याचार होऊ नयेत, यासाठी हिंदु संतांवरील अन्याय आणि अत्याचार यांच्या विरुद्ध समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन कर्णावती (अहमदाबाद), गुजरात येथील संतश्री आसारामबापू  आश्रमाच्या साध्वी रेखाबहनजी यांनी केले. त्या संत, संप्रदाय आणि हिंदूसंघटनांचे शासनाकडून होत असलेले दमन या विषयावरील उद्बोधन सत्रात बोलत होत्या.

साध्वीजींनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संतश्री आसारामबापू यांच्या संदर्भातील साध्वी पूजा पाण्डेय आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामीजी यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. साध्वी पूजा पाण्डेय यांनी आवाहन केले की, निवडून येण्यापूर्वी सातत्याने संतश्री आसारामजी बापू यांची भेट घेणारे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी तत्परतने लक्ष घालून त्यांना सोडवले पाहिजे. डॉ. स्वामी म्हणाले होते की, संतश्री आसारामजी बापू यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. प्रसारमाध्यमांनी मोठा कांगावा केला आहे; मात्र या खटल्यातील मुख्य ६ साक्षीदार सुरक्षित आहेत. कथित पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, तिला साधे खरचटलेलेही नाही, असा अहवाल आला आहे. त्यामुळे संतश्री आसारामजी बापू निर्दोष आहेत, असे मला वाटते; म्हणून मी खटला चालवण्यास घेतला आहे.

साध्वीजींच्या मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे हिंदु साधु-संतों का अवमान, नहीं सहेगा हिंदुस्थान ! अशा घोषणा देऊन त्यांना अनुमोदन दिले.

आता हिंदूरक्षण हाच हिंदूंचा मंत्र बनला पाहिजे ! – जी. राधाकृष्णन्, शिवसेना, चेन्नई

जी. राधाकृष्णन्

तमिळनाडू राज्यात १२८ हिंदु नेत्यांची वेचून हत्या करण्यात आली. राज्यातील कन्याकुमारी जिल्हा ख्रिस्तीबहुल झाला आहे. आणखी २ जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत. हिंदु धर्माला विरोध करणारे नास्तिक लोक हिंदु धर्मातच जन्माला आले आहेत. अशा वेळी हिंदूरक्षण हाच हिंदूंचा मंत्र बनला पाहिजे, असे मार्गदर्शन चेन्नई येथील शिवसेनेचे श्री. जी. राधाकृष्णन् यांनी केले. ते संत, संप्रदाय आणि हिंदूसंघटनांचे शासनाकडून होत असलेले दमन या उद्बोधन सत्रात बोलत होते.

श्री. जी. राधाकृष्णन् पुढे म्हणाले की,

१. एका नास्तिक संघटनेने श्रीरामाचे चित्र जाळून टाकण्याची घोषणा केली होती. तेव्हा आम्ही त्याला विरोध करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. त्यांना सांगितले की, हे हिंदु धर्म आणि राज्यघटना यांच्या विरोधात आहे. पोलीस ऐकेनात. तेव्हा आम्ही त्यांना शांतपणे सांगितले की, जर श्रीरामाचे चित्र जाळले, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पोलिसांना अधर्मियांचे कुकृत्य थांबवणे भाग पडले.

२. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या सर्व हिंदूंमध्ये बंधुत्वाची भावना असली पाहिजे. हिंदूंच्या अधिकारासाठी तमिळनाडूमध्ये ३० हिंदु संघटना कार्यरत आहेत. अशा सर्व संघटना एकत्र आल्या, तर मग रस्त्यावर गाय कापण्याचे कुणाचेही धैर्य होणार नाही.

३. हिंदुत्वाचे कार्य करतांना आत्मबळ वाढावे, यासाठी आम्ही सनातनचे ग्रंथवाचन करतो. सनातनची उत्पादने घेतो आणि नामजपही करतो.

हिंदुत्वामुळे भाषेच्या अडथळ्यावर
मात करून सर्वांशी संवाद साधणारे श्री. राधाकृष्णन् !

श्री. राधाकृष्णन् म्हणाले, मला तमिळ भाषा येते. हिंदी आणि इंग्रजी फारसे चांगले येत नाही; मात्र मला हिंदुत्वाची भाषा चांगली येते अन् मी ती संपूर्ण देशभरात बोलतो. मला त्यामुळे सर्व हिंदूंशी सहजसंवाद साधता येतो. त्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक म्हणाले, आम्हाला तुमची भाषा समजते आणि हिंदु राष्ट्रात हिंदुत्वाची भाषा हीच राष्ट्रभाषा असेल !

स्रोत : सनातन प्रभात हिन्दी