आगामी काळात हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

सहाव्या अखिल भारतीय हिंदू
अधिवेशनाचा हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात समारोप !

  • अधिवेशनस्थळ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या जयघोषाने दुमदुमले !
  • भावपूर्ण वातावरणात हिंदुत्वनिष्ठांचा एकमेकांना निरोप
धर्माभिमान्यांसमवेत हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतांना १. पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे २. पू. नंदकुमार जाधव ३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ ४. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर ५. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी (गोवा) : हिंदु राष्ट्र स्थापनेचे सोनेरी ध्येय उराशी बाळगून देशभरात, तसेच विदेशातही अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निःस्वार्थीपणे धर्म अन् राष्ट्र रक्षणाचे कार्य करत आहेत. हिंदुत्वासाठी लढणार्‍या या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे शिल्पकार आहेत. हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक आणि मानसिक ऊर्जा पुरवणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन गेल्या ५ वर्षांप्रमाणे याही वर्षी हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले. १४ जून ते १७ जून या कालावधीत झालेल्या या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका येथील १३२ हून अधिक संघटनांचे ३४२ हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये देश आणि देशाबाहेरील समस्या अन् धर्मावर होणारे आघात हे स्वत:च्या कुटुंबातीलच आहेत, असा कुटुंबभाव सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये निर्माण झाला.

अधिवेशनाच्या समारोप सत्रात देशविदेशातील धर्मबंधूंचा भावपूर्ण वातावरणात निरोप घेत उपस्थितांनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या जयघोषात आगामी काळात धर्म आणि राष्ट्र कार्य अधिक व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा संकल्प केला. सौ. सायली करंदीकर आणि सौ. स्वराली पाध्ये यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम्ने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी किडलेली
व्यवस्था हटवणे आवश्यक ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्या संघटित गुन्हेगारीचा अनुभव नागरिक प्रतिदिन घेत आहोत. अशा परिस्थितीत निवडणुका लढवून किंवा राजकीय कार्य करून हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा विचार करणे अयोग्य ठरेल. या शोषण करणार्‍या वर्तमान व्यवस्थेचा पराभव केल्याविना हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य नाही, हे वास्तव आम्ही समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्याला धर्मक्रांती करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

या वेळी पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले…

१. ज्याप्रमाणे आर्य चाणक्य यांनी पायात काटा लागल्यावर तो इतरांना लागू नये म्हणून ते झाड मुळासकट काढून टाकण्याचा विचार केला त्याप्रमाणे कोणत्याही समस्याच्या मुळाशी जाऊन त्या समस्येचे निराकरण केले पाहिजे.

२. एक दिवस असा येणारच आहे की, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीचे स्वरूप राष्ट्रव्यापी होईल. त्या दिवसाची आजपासून सिद्धता केली पाहिजे.

३. येणार्‍या काळात आम्हाला विरांची, तसेच विजयी होणार्‍या पिढीची आवश्यकता आहे.

हिंदु राष्ट्रासाठी सध्याची संपूर्ण व्यवस्थाच पालटावी लागेल ! –
अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री विद्याधिराज सभागृह (रामनाथी) : सध्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये धर्मांधांच्या देशविरोधी कारवाया, आतंकवाद, भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या यांचे प्रमाण वाढत आहे. सध्या सत्तेत असलेले शासन निवडणुकीपूर्वी दिलेली राममंदिर उभारणी, समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे ही आश्‍वासने विसरून सत्ता चालवत आहे. हा प्रकार म्हणजे नव्या वेष्टनात जुन्याच वस्तू देण्यासारखे असून सत्ता मिळाल्यावर सर्व विसरून कामकाज करणे, हे काँग्रेसी तंत्र आताचे शासन राबवत आहे. देशातील शासनकर्ते पालटले; परंतु प्रशासन पालटलेले नाही. त्यामुळेच हिंदूंना देशात अपेक्षित असे पालट दिसत नाहीत. आपल्याला हिंदु राष्ट्र आणायचे असून केवळ शासनकर्ते पालटून चालणार नाही, तर सध्याची संपूर्ण व्यवस्थाही पालटावी लागेल. त्यासाठी धर्मद्रोही आणि अन्य यांचे भ्रष्टाचार बाहेर काढावे लागतील आणि त्या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल. अशा मार्गांनी हिंदु राष्ट्राची वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी व्यक्त केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या वेळी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सनातनचे उत्तर महाराष्ट्र धर्मप्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे हे व्यासपिठावर उपस्थित होते.

अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर पुढे म्हणाले,

१. देशात शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला जातो, त्यावरूनच देश कुठे चालला आहे, हे दिसून येते.

२. विदेशातील गुन्ह्यांची पद्धत, अमली पदार्थ आणि पोर्न हे या देशात तात्काळ येतात; पण अन्य चांगल्या गोष्टी येथे लवकर येत नाहीत.

३. शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, न्याययंत्रणा अशा विविध क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार होत आहे.

४. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यावर कंठशोष करणारे लोक शेतकर्‍यांच्या संपाच्या वेळी रस्त्यावर दूध ओतत होते. एका हिंदी सिनेमामध्ये शिवलिंगावर दुधाचा अभिषेक नको, असे सांगणारा अभिनेता या संपाच्या वेळी दूध वाया घालवले जात असतांना कोठे होता ? अभिषेक म्हणून दुधाचा वापर न करण्याविषयी संदेश देणार्‍या बॉलिवूडवर १० वर्षे बंदी आणून त्यासाठी वापरले जाणारे पैसे शेतकरी आणि राष्ट्र यांच्यासाठी दिले पाहिजे.

अधिवेशनामध्ये संदेशांचे वाचन

१. नेपाळ येथील हिंदुत्वनिष्ठ प्रा. डॉ. माधव भट्टाराय यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

२. कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांची कायदेशीर बाजू मांडणारे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

हिंदुत्वनिष्ठांनी संतांसमवेत दिल्या उत्स्फूर्त घोषणा

अधिवेशनाची सांगता झाल्यावर सर्व हिंदुत्वनिष्ठ एकमेकांचा सस्नेह निरोप घेत होते. हा निरोप घेत असतांना अनेक हिंदुत्वनिष्ठ हे संतांसमवेत छायाचित्रे काढून घेत होते. हे चालू असतांनाच सर्व हिंदुत्वनिष्ठ पुन्हा एकत्र आले आणि संतांसमवेत सलग १० मिनिटे विविध उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या. या घोषणांमुळे वातावरणात पुन्हा एकदा वीररस निर्माण झाला होता. त्याद्वारे हिंदुत्वनिष्ठांनी संतांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची ललकारीच दिली.

१७ राज्यांत ८ भाषांत सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी प्रसिद्धी !

असा झाला समारोप…

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख यांनी वृत्तपत्रे, संकेतस्थळ यांनी सहाव्या अखिल भारतीय अधिवेशनाला दिलेल्या प्रसिद्धीचा आढावा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दिला. या अधिवेशनाला केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली आहे. १७ राज्यांत ८ भाषांत, तसेच ७५ स्थानिक वृत्तवाहिन्या यांनी सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रसिद्धी मिळाली आहे. १५० लोकांनी थेट संपर्क करून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत, असे सांगितले.

यानंतर महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे व्याख्याता श्री. प्रवीण नाईक यांनी शासकीय अधिवेशन आणि हिंदु अधिवेशन यांचा तौलनिक अभ्यास पिप प्रणालीद्वारे प्रोजेक्टरच्या साहाय्याने सादर केला. यानंतर धर्मनिष्ठांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात