‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा वातावरणावर होणारा परिणाम !

परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या
उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘समाजात विवाह, उपनयन यांसारखे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असे धार्मिक विधी, एखाद्या आस्थापनाने त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेली कार्यशाळा, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेले कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. या सगळ्यांचा वातावरणावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. वातावरणावर सकारात्मक परिणाम करणारे कार्यक्रम व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी, तर नकारात्मक परिणाम करणारे कार्यक्रम हानीकारक असतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत गोव्यातील फोंडा तालुक्यातील रामनाथ देवस्थानच्या ‘विद्याधिराज सभागृहा’त सहावे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. याच सभागृहात १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पाचवे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आणि ‘हिंदु राष्ट्र कार्यकर्ता निर्मिती अधिवेशन’ झाले होते. गत वर्षीच्या या अधिवेशनाचा वातावरणातील ऊर्जेवर होणार्‍या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

१ अ. पहिले परीक्षण – १७.६.२०१६

अधिवेशनाचे उद्घाटन होण्यापूर्वी २ दिवस, म्हणजे १७.६.२०१६ या दिवशी अधिवेशनाचे स्थळ पूर्वसिद्धतेसाठी उपलब्ध झाले. पूर्वसिद्धतेला आरंभ करण्यापूर्वी कार्यस्थळाचे परीक्षण करण्यात आले.

१ आ. दुसरे परीक्षण – १९.६.२०१६

कार्यस्थळी अधिवेशनाच्या दृष्टीने सात्त्विक सजावट करण्यात आली. यात व्यासपीठ उभारणीपासून सभागृहात विविध माहितीपर फलक लावणे आदींचा अंतर्भाव होता. सर्व सिद्धता पूर्ण झाल्यानंतर १९.६.२०१६ या दिवशी अधिवेशनाच्या आरंभी उद्घाटनापूर्वी १ घंटा दुसरे परीक्षण करण्यात आले.

१ इ. तिसरे परीक्षण – २७.६.२०१६

अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर तिसरे परीक्षण करण्यात आले.

या तीनही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या संदर्भातील माहिती

२ अ १. उद्देश : आज हिंदूंसमोर असलेल्या विविध राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील उपाय म्हणून ‘भारतात धर्माधिष्ठित ‘सनातन धर्म राज्य (हिंदु राष्ट्र)’, म्हणजेच विश्‍वकल्याणासाठी कार्यरत सत्त्वगुणी जनतेचे राष्ट्र स्थापन करणे’, हा ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा उद्देश आहे.

२ अ २. आयोजक : परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांच्या आशीर्वादाने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी कार्यकर्ते, तसेच अध्यात्मप्रसाराद्वारे समाजाची सात्त्विकता वाढावी, यासाठी कार्यरत असणार्‍या सनातन संस्थेचे साधक एकत्रितपणे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे आयोजन गेली ५ वर्षे करत आहेत.

२ अ ३. अधिवेशनस्थळ : गोवा राज्यातील फोंडा तालुक्यातील रामनाथी गावातील सुप्रसिद्ध अन् जागृत अशा ‘श्री रामनाथ देवस्थाना’च्या सभागृहात वर्ष २०१२ पासून प्रतिवर्षी अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत आहे.

२ अ ४. अधिवेशनाचे स्वरूप : हिंदु धर्म, राष्ट्र आणि समाज यांच्याशी संबंधित समस्या (उदा. धर्मांतर, गोरक्षण, गंगारक्षण, लव्ह-जिहाद, दंगली) आणि त्यांवरील परिणामकारक उपाययोजना निश्‍चित करता यावी, तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता, स्वरूप आदींविषयी मार्गदर्शन मिळावे अन् हिंदुत्वनिष्ठांमध्ये परस्पर सहकार्य निर्माण व्हावे, या दृष्टीने उपयुक्त असणारी उद्बोधने अन् चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येते.

२ अ ५. अधिवेशनात सहभागी होणारे हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवेशनाची फलनिष्पत्ती : अधिवेशनात देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते सहभागी होतात.

२ अ ५ अ. प्रथम अधिवेशन : १० ते १४ जून २०१२ या कालावधीत झालेल्या या अधिवेशनानंतर १० राज्यांत भाषा, प्रांत आणि संघटना यांचे भेद दूर सारून अनेक हिंदु संघटना राष्ट्र अन् धर्म रक्षणाचे कार्य संघटितपणे करू लागल्या. अधिवेशनास उपस्थित असलेल्या अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी स्वतः साधनेलाही आरंभ केला.

२ अ ५ आ. द्वितीय अधिवेशन : ६ ते १० जून २०१३ या कालावधीत यशस्वीरित्या पार पडलेल्या या हिंदू अधिवेशनाला २० राज्यांतून, तसेच श्रीलंका, बांगलादेश आणि मलेशिया या देशांतील ७० हिंदु संघटनांचे ३२० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या अधिवेशनानंतर हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रितपणे २५ प्रांतीय अधिवेशनांचे आयोजन केले, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठांनी साधनेत चांगली उन्नतीही केली.

२ अ ५ इ. तृतीय अधिवेशन : २० ते २६ जून २०१४ या कालावधीत झालेल्या या अधिवेशनाला भारतातील २० राज्ये, तसेच बांगलादेश आणि नेपाळ येथील एकूण १२५ संघटनांचे ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित राहिले होते. त्यांच्यापैकी काही हिंदुत्वनिष्ठांनी साधनेतही लक्षणीय उन्नती केली.

२ अ ५ ई. चतुर्थ अधिवेशन : ११ ते १७ जून २०१५ या कालावधीत झालेल्या या अधिवेशनाला भारतातील २१ राज्ये, तसेच बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ येथील एकूण २०० संघटनांचे ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित राहिले होते. त्यांच्यापैकी अनेकांनी चांगली आध्यात्मिक उन्नती केली, तसेच हिंदूसंघटनही अधिक बळकट झाले.

२ अ ५ उ. पंचम अधिवेशन : १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत झालेल्या या अधिवेशनाला भारतातील २१ राज्ये, तसेच श्रीलंका आणि नेपाळ येथील एकूण १६१ संघटनांचे ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित राहिले होते. यांपैकी अनेक हिंदुत्वनिष्ठांनी आध्यात्मिक उन्नती केली, तसेच भारतभरात क्रियाशील असलेल्या प्रमुख हिंदु संघटनांच्या नेत्यांनी त्रैमासिक बैठकांचे आयोजन करून आधीच्या ३ मासांतील (महिन्यांतील) हिंदुत्वाच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील ३ मासांच्या कार्याचे नियोजन केले.

३. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.

३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ इ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.

३ इ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ इ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी. या चाचणीतील प्रभावळ मोजण्यासाठी अधिवेशनाच्या कार्यस्थळाच्या धुळीचा नमुना म्हणून वापर केला आहे.

३ ई. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत : चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘३ इ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

५. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

६. निरीक्षणांचे विवेचन

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील
निरीक्षणांचे विवेचन – कार्यस्थळी नकारात्मक ऊर्जा मुळीच न आढळणे

कार्यस्थळी अधिवेशनाच्या पूर्वसिद्धतेला आरंभ करण्यापूर्वी, तसेच अधिवेशनाची सिद्धता झाल्यानंतर आणि अधिवेशनाच्या समारोपानंतर नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. याविषयी अधिक स्पष्टीकरण सूत्र ‘८’ मध्ये दिले आहे.

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – अधिवेशनाच्या कार्यस्थळाची
पूर्वसिद्धता पूर्ण झाल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि अधिवेशनाच्या समारोपानंतर त्यात पुष्कळ वृद्धी होणे

सर्वच व्यक्ती, वस्तू अथवा वास्तू यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येतेच, असे नाही. अधिवेशनाच्या कार्यस्थळी पूर्वसिद्धतेला आरंभ करण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. अधिवेशनाच्या उद्घाटनापूर्वी स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजेच त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आढळली आणि तिची स्पंदने ३.०५ मीटर दूरपर्यंत पसरली आहेत. अधिवेशनाच्या समारोपानंतर कार्यस्थळी सकारात्मक ऊर्जेची स्पंदनेही पुष्कळ अधिक, म्हणजे ४.०७ मीटर आहेत. याविषयी अधिक स्पष्टीकरण सूत्र ‘८’ मध्ये दिले आहे.

६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन –
अधिवेशनाच्या समारोपानंतर कार्यस्थळाची प्रभावळ पुष्कळ अधिक वाढणे

सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. १७ जून २०१६ या दिवशी ‘विद्याधिराज सभागृह’ मिळाल्यानंतर सेवेला आरंभ करण्यापूर्वी कार्यस्थळाची प्रभावळ २.६९ मीटर एवढी आहे. त्यानंतर साधकांनी तेथे पूर्वसिद्धता केल्यानंतर ती वाढली आणि ३.८९ मीटर झाली, तर अधिवेशनाच्या समारोपानंतरची प्रभावळ ५.३७ मीटर झाली आहे, म्हणजे पुष्कळ अधिक वाढली. याविषयी अधिक स्पष्टीकरण सूत्र ‘८’ मध्ये दिले आहे.

७. निष्कर्ष

‘अधिवेशनाच्या कार्यस्थळाची पूर्वसिद्धता केल्यानंतर तेथील वातावरणातील सकारात्मकता वाढली आणि अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर त्यात पुष्कळ वृद्धी झाली’, हे या चाचणीतून लक्षात येते.

८. अधिवेशनाशी संबंधित घटक सत्त्वप्रधान
असल्यामुळे कार्यस्थळी सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ वाढणे

‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’साठी असणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, संतांची उपस्थिती, हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित झालेले राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी आयोजक, वक्ते, श्रोते, मंदिराचे सभागृह असलेले कार्यस्थळ, तसेच कार्यस्थळाची सात्त्विक सजावट आदी अधिवेशनाशी संबंधित सर्वच घटक सत्त्वप्रधान होते. यामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ वाढले.

थोडक्यात सांगायचे, तर ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असणारे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ हे वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणारे असल्याने समाजासाठी आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायक आहे’, असे या चाचणीतून दिसून आले.’

– आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (२८.५.२०१७)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात