विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एका व्यासपिठावर आणणारे आणि त्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर करणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे विचारमंथन !

१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने विचारमंथन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) येथे १४ ते १७ जून या कालावधीत अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या ४ दिवसांत अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने विचारमंथन करण्यात आले. विविध प्रांतांतील हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या प्रांतातील समस्या, हिंदुत्वरक्षणासाठी केलेले प्रयत्न आदींविषयी उपस्थितांना आर्ततेने अवगत केले.

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या उद्बोधन सत्राद्वारे विचारमंथनाला आरंभ झाला. या वेळी ‘गोरक्षण आणि गोमांस यांवर बंदीची आवश्यकता’, ‘वैचारिक आक्रमणापासून हिंदु धर्माचे रक्षण करणे’ आणि ‘जिहादी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण’, आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. या अधिवेशनात झालेले ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ हे सत्र वैशिष्ट्यपूर्ण ठरले. यात बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ येथील हिंदूंच्या प्रतिनिधींनी हिंदूंच्या व्यथा मांडल्या. यावर उपस्थित हिंदूंनी एकमुखाने जगभरातील हिंदूंच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्यापाठोपाठ ‘काश्मिरी हिदूंचे पुनर्वसन’ या विषयावरील सत्रात विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या प्रतिनिधींची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या व्यतिरिक्त हिंदूंना भेडसावणारे लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील अन्याय आदी विषयांवरही सविस्तर ऊहापोह करण्यात आला. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ याविषयावरील चर्चा प्रेरणादायी ठरली. मध्यप्रदेश येथील साध्वी सरस्वतीजी, तेलंगण येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी हिंदु धर्माविषयी मांडलेले रोखठोक विचार उपस्थितांना प्रेरणा देणारे ठरले.

या अधिवेशनात उद्बोधन सत्र, फलकप्रदर्शन, गटचर्चा आदी माध्यमांतून प्रत्यक्ष कृती योजना, संत-मान्यवर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, अनौपचारिक चर्चा आदी माध्यमांद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा जागर केला गेला. त्याचा सचित्र आढावा…

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनस्थळी लावण्यात आलेला हिंदूंना ते स्वतः वाघ असल्याची जाणीव करून देणारा लक्षवेधी आणि वीरश्री जागृती करणारा फलक
मान्यवरांच्या अनौपचारिक चर्चेतील एक क्षण ! सर्वांसमवेत चर्चेत सहभागी झालेले सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक (उजवीकडे)
क्रांतीकारकांचे फलकप्रदर्शन कुतुहलाने पहातांना हिंदुत्वनिष्ठ
मान्यवरांच्या अनौपचारिक चर्चेतील एक क्षण
वक्त्यांचे ओजस्वी भाषण ऐकतांना हिंदुत्वनिष्ठ
गटचर्चेत हिंदूंच्या समस्यांवर चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात